राज्यातील वारसा हक्क स्थळांबाबत आजगावकर, सरदेसाईंची खोटी वक्तव्ये

0
137

>> गिरीश चोडणकर यांचा आरोप

राज्यातील सहा वारसा स्थळ दत्तक देण्याच्या प्रश्‍नावर पुरातत्त्व मंत्री विजय सरदेसाई आणि पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर खोटारडी वक्तव्ये करून जनतेची दिशाभूल करीत आहेत. या दोन्ही मंत्र्यांनी येत्या दोन दिवसात आपली चूक कबूल करून तमाम जनतेची माफी मागावी, अन्यथा आपणाला दोन्ही मंत्र्यांचा खोटारडेपणा चव्हाट्यावर आणवा लागेल, असा इशारा गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे नूतन प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत काल दिला.

केंद्र सरकारने राज्यातील सहा वारसा स्थळ दत्तक योजनेखाली खासगी कंपन्यांना देखभालीसाठी दिली आहेत. मंत्री विजय सरदेसाई आणि मंत्री आजगावकर यांनी वारसा स्थळ दत्तक योजनेबाबत अनभिज्ञ असल्याचे म्हटले आहे. राज्य सरकारच्या संबंधित खात्याच्या मान्यतेने केंद्र सरकारने सहा वारसा स्थळे दत्तक दिली आहेत. यासंबंधीचे पुरावे आपणाकडे आहेत. पुरावे उघड करण्यापूर्वी दोन्ही मंत्र्यांना आपल्या चुकीची दुरुस्ती करण्याची संधी देत आहे. दोन्ही खात्याच्या मान्यतेनंतरच केंद्र सरकारने याबाबत निर्णय घेतलेला आहे, असा दावा चोडणकर यांनी केला.
दरम्यान, राज्यपालांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत पूर्णवेळ मुख्यमंत्र्याची नियुक्ती करावी, अशी मागणी चोडणकर यांनी केली.

मागील अडीच महिन्यात सरकारी पातळीवरील कामकाज धीम्या गतीने सुरू आहे. मुख्यमंत्री पर्रीकर आजारावर उपचार घेण्यासाठी अमेरिकेत असल्याने विकासकामांना चालना मिळणे कठीण बनले आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांना आजारातून लवकर बरे होण्यासाठी तणावमुक्त वातावरण उपलब्ध करण्याची गरज आहे. राज्यपालांनी काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करावी. असेही चोडणकर यांनी सांगितले.

आज पदभार स्वीकारणार
दरम्यान, आज शुक्रवार दि. ४ मे रोजी संध्याकाळी ३.३० वाजता नूतन प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर पदभार स्वीकारणार आहे. यानिमित्त एका स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.