राज्यातील खासगी कंपन्यांनी कर्मचार्‍यांना पूर्ण पगार द्यावा

0
157

>>  अन्यथा कायदेशीर कारवाई ः मुख्यमंत्र्यांचा इशारा

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत खासगी कंपन्या, आस्थापनांनी कर्मचार्‍यांना पूर्ण पगार द्यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासगी कंपन्या, आस्थापनांना पूर्ण पगार देण्याचे आवाहन केलेले आहे. सरकारच्या कामगार वर्गाला पूर्ण पगार वितरणाबाबतच्या सूचनेचे पालन न करणार्‍या कंपन्या, आस्थापनावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत काल दिला.

गोवा सरकारच्या कर्मचार्‍यांच्या पगाराचे वितरण दि. २ एप्रिल रोजी केले जाणार आहे. दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या लाभार्थीचे मानधन ५ एप्रिल आणि गृहआधार योजनेच्या लाभार्थीच्या मानधन ९ एप्रिल रोजी त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

रेशन दुकाने आजपासून सुरू

परराज्यातून विविध प्रकारचे सामान घेऊन सुमारे ३७४ मालवाहू ट्रक दाखल झाले आहे. साधारण ९० टक्के कडधान्य विक्रीची दुकाने सुरू करण्यात आली आहेत. राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकाने गुरुवार २ एप्रिलपासून सुरू केली जाणार आहेत. राज्यात कडधान्याचा मुबलक साठा उपलब्ध करण्यात येत आहे. नागरिकांनी घरात धान्याचा साठा करून ठेवू नये, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.

खलाशांना आण्यासाठी प्रयत्न

विदेशात असलेल्या सात ते आठ हजार खलाशांना परत आणण्यासाठी  पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्र पाठविण्यात आले आहे. विदेश मंत्रालयाकडून परदेशात असलेल्या गोमंतकीय खलाशांना परत आणण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.  राज्यात अडकून पडलेल्या १२०० विदेशी नागरिकांना आत्तापर्यत त्यांच्या देशात परत पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. येत्या २ ते ३ दिवसात आणखी १ हजार विदेशी नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

पतसंस्था आजपासून सुरू

राज्यातील पतसंस्थांचे व्यवहार २ एप्रिलपासून कमी कामगारांना घेऊन सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यात राष्ट्रीयीकृत बँकाना सुध्दा कामकाज करण्यास मान्यता देण्यात आली आहे. नागरिकांनी बँका, एटीएम, पतसंस्थांमध्ये एकाच वेळी गर्दी करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.

राज्यात लॉकडाऊन १४ एप्रिलपर्यंत आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्याबाबत अफवा पसरविण्यात येत आहे. त्या अफवेवर कुणीही विश्‍वास ठेवू नये. नागरिकांनी १४ एप्रिलपर्यंत घराबाहेर पडू नये. विनाकारण घराबाहेर फिरणार्‍यांवर कारवाई केली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

आजपासून स्वच्छता मोहीम

राज्यभरात २ ते १२ एप्रिल या काळात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. कचरा व्यवस्थापन मंडळ, नगरपालिका, पंचायत, पीडब्लूडी व इतर खात्याकडून स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

होम क्वारंटाईन केलेली व्यक्ती लोकांत फिरत असल्यास त्या व्यक्तीला सरकारच्या क्वारंटाईन केंद्रात ठेवले जाणार आहे. गोमेकॉतील व्हायरॉलॉजी लॅब पूर्णपणे कार्यान्वित करण्यात आले आहे. या लॅबमध्ये ७ नमुन्यांची तपासणी केली जात आहे. पुणे येथे ४८ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या ५५ नमुन्यांची तपासणी महत्त्वाची आहे. कोविड इस्पितळामधील कोरोना रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. आरोग्य खात्याने क्वारंटाईन केंद्रात ठेवलेल्या सर्वांची प्रकृती चांगली आहे. होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींच्या घरांवर स्टिकर्स लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

नवी दिल्ली येथे तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी कुणीही व्यक्ती १५ मार्च नंतर गोव्यात परतला नसल्याचा पोलिसांचा प्राथमिक अहवाल आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.