राज्यातील खाण उद्योग १३ मार्चपासून बंद

0
151

>> खाण संचालनालयाचा आदेश

>> सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी

खाण संचालनालयाने दुसर्‍या टप्प्यात खाणपट्ट्यांचे नूतनीकरण केलेले खाण मालक व लीजधारकांना १३ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजल्यापासून खनिज उत्खनन बंद करण्याची सूचना एका आदेशाद्वारे केली आहे. दरम्यान, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला अनुसरून खाणींना जारी केलेले दुसर्‍या टप्प्यातील परवान्यांचे नूतनीकरण रद्द केले आहे, अशी माहिती मंडळाच्या सूत्रांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या राज्यातील ८८ खाणी बंदीच्या आदेशानंतर खाण खात्याने खनिज उत्खनन बंदीबाबत एक आदेश जारी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी खाण खात्याने साहाय्यक खाण संचालक व तांत्रिक कर्मचार्‍यांसाठी काही सूचना जारी केल्या आहेत.

यंत्रसामग्री हटवण्याच्या सूचना
खाण मालकांनी खाणींवरील यंत्रसामग्री १५ मार्च रोजी दुपारी १ वाजेपर्यंत हटवावी, अशी सूचना करण्यात आली आहे. १४ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजल्यानंतर खनिज वाहतूक करण्यास मान्यता दिली जाणार नाही. फक्त रॉयल्टी भरलेल्या खनिजाची १४ रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत स्टॉक यार्ड, जेटी किंवा प्रक्रिया प्रकल्पापर्यंत वाहतूक करण्यास मान्यता दिली जाणार आहे.

तपासासाठी चार पथके
खाण खात्याने खाणींची तपासणी करण्यासाठी चार पथके नियुक्त केली आहेत. राज्यातील कार्यरत खाणींवरील खनिज साठ्याचा आढावा घेतला जाणार आहे. या पथकाकडून ६ मार्चपासून खनिज साठ्यांचा आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे. येत्या १० मार्चपर्यंत खनिज साठ्याचा आढावा घेऊन अहवाल तयार केला जाणार आहे. दुसर्‍या टप्प्यात खाणपट्ट्यांचे नूतनीकरण करण्यात आलेल्या लीजधारक व खाण मालकांना उत्खनन केलेल्या खनिज तपशिलाची माहिती बोर्डावर नोंद करण्याची सूचना करण्यात आली आहे.

खाणींची तपासणी सुरू
राज्यातील बंद असलेल्या खाणींच्या तपासणीला ७ मार्चपासून सुरू केली जाणार आहे. खाणींच्या तपासणीबाबत दर दिवशी अहवाल तयार केला जाणार आहे. तसेच खनिजाचे उत्खनन, वाहतुकीवर देखरेख ठेवली जाणार आहे.
१५ मार्च रोजी दुपारी १ वाजल्यापासून खाणींच्या तपासणीला सुरुवात केली जाणार आहे. इंडियन ब्यूरो ऑफ माईन्स, खाण सुरक्षा संचालनालय, वन खाते, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमओईएफसीसी यांच्या संयुक्त विद्यमाने किंवा खाण खात्याच्या तांत्रिक कर्मचार्‍यांकडून तपासणी केली जाणार आहे. ७ ते १६ मार्च दरम्यान ई लिलाव कार्गोची वाहतूक थांबविली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.