राज्याच्या औद्योगिक स्थितीवर श्‍वेतपत्रिका काढण्याची मागणी

0
124

सरकारने राज्यातील औद्योगिक स्थितीबाबत श्‍वेतपत्रिका जारी करावी, अशी मागणी गोवा कामगार महासंघाचे अध्यक्ष ऍड. अजितसिंह राणे यांनी पत्रकार परिषदेत काल केली.
राज्यातील उद्योग क्षेत्रातील बर्‍याच कामगारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कुंडई औद्योगिक वसाहतीमध्ये कंपनीच्या बाहेर एका कर्मचार्‍याने आत्मदहन करून घेतले आहे. असा प्रकार पुन्हा कुठेही घडू नये म्हणून वेळीच योग्य पाऊल उचलावे, अशी मागणी ऍड. राणे यांनी केली.

कामगार वर्गाच्या तक्रारी लवकर निकालात काढण्यासाठी जलदगती औद्योगिक लवादाची स्थापना करावी. कामगार आयुक्त कार्यालयाकडे कामगारांनी केलेल्या तक्रारी वेळेवर निकालात काढण्यात येत नाही. तीन ते सहा महिन्यात प्रकरणे निकालात काढण्याची गरज असताना चार वर्षेपर्यंत प्रकरणे प्रलंबित ठेवली जातात, असा आरोप ऍड. राणे यांनी केला. कामगारांना संघटना स्थापन करून कामगार संघटनेशी संलग्न पूर्ण अधिकार आहे. परंतु, कामगारांना संघटना स्थापन करण्यास मान्यता दिली जात नाही. कामगार संघटना स्थापन करणासाठी पुढे येणार्‍या कामगारांवर व्यवस्थापनाकडून कारवाई केली जाते. सरकारने कामगार धोरण निश्‍चित करून स्थानिकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी ऍड. राणे यांनी केली. यावेळी स्वाती केरकर, भानुदास नाईक, आनंद शिरगावकर व इतरांची उपस्थिती होती.