राज्यभरातील ५१०० पैकी २६०० आस्थापनांकडून पीएफ निधी जमा

0
83

>> नवे आयुक्त अश्‍विनीकुमार गुप्ता यांची माहिती

राज्यातील ५१०० आस्थापनांनी येथील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडे नोंदणी केलेली असली तरी त्यातील केवळ २६०० आस्थापनेच आपल्या कर्मचार्‍यांचा भविष्य निर्वाह निधी न चुकता जमा करीत आहेत तर अन्य आस्थापने केवळ अधुनमधूनच हा निधी जमा करीत असल्याचे आढळून आले आहे, असे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे नवे गोवा आयुक्त अश्‍विनीकुमार गुप्ता यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. नुकताच आपल्या पदाचा ताबा घेतलेल्या गुप्ता यांनी राज्यातील सर्व आस्थापनांचे सर्वेक्षण करून सर्व माहिती संकल्पित केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. जी आस्थापने आपल्या कर्मचार्‍यांचे पैसे भरत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

राज्यातील काही नगरपालिका व स्वायत्त संस्था तसेच नीम सरकारी आस्थापने आपल्या कर्मचार्‍यांचा भविष्य निर्वाह निधी जमा करीत नसल्याचे आढळून आले असल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्यातील ५ नगरपालिका आपल्या कर्मचार्‍यांचा भविष्य निर्वाह निधी जमा करीत नाहीत. तर अन्य तीन पालिका अनियमितपणे निधी जमा करीत असल्याचे आढळून आले आहे, असे ते म्हणाले. भविष्य निर्वाह निधीधारकांचे दावे हातावेगळे करण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगतानाच या वर्षी १२६७५ दावे हातावेगळे करण्यात आले. पैकी १२२२९ दावे हे केवळ २० दिवसांत निकाली काढण्यात आल्याचे ते म्हणाले. राज्यात २४१६२ एवढे पेन्शनधारक आहेत. त्यात दरवर्षी १५०० जणांची भर पडत असल्याची माहितीही त्यांनी दिली. ९२५.५२ लाख एवढी थकबाकी द्यायची असल्याचे ते म्हणाले.