राजस्थानातले वादळ

0
268

राजस्थानच्या राजकारणामध्ये वादळी हवा वाहू लागली आहे. मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांनी जे केले, त्याचीच पुनरावृत्ती करायला तेथील तरुण तुर्क नेते सचिन पायलट निघाले आहेत अशी चिन्हे दिसत आहेत. ज्योतिरादित्य काय किंवा सचिन पायलट काय, कॉंग्रेसमध्ये यापुढे भविष्य नाही हाच मूलभूत विचार या बंडाळीमागे आहे हे वेगळे सांगण्याची गरज नसावी. खरे तर मध्य प्रदेश आणि राजस्थान पक्षाने जिंकले – नव्हे पक्षाला आयते मिळाले होते – तेव्हा जी नवचेतना कॉंग्रेसमध्ये जागली होती, तिचा मागमूस आज राहिलेला नाही. उलट जुने ढुढ्ढाचार्य विरुद्ध नवे तरुण तुर्क हा संघर्ष जसा काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशामध्ये प्रत्ययाला आला तसाच तो आता राजस्थानमध्ये येतो आहे. सर्वांत आश्चर्याची बाब म्हणजे बंडाचे हे वारे पक्षश्रेष्ठींच्या कानी पोहोचूनदेखील त्याकडे संपूर्ण कानाडोळा करण्याची घोडचूक एकदा नव्हे, पुन्हा पुन्हा सोनिया आणि राहुल करीत आहेत. निदान मध्य प्रदेश गमावल्यानंतर तरी राजस्थानमध्ये ही चूक सुधारली जाईल असे वाटत होते, परंतु सचिन पायलट यांच्या म्हणण्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून तुम्ही चालते व्हा असेच जणू त्यांना सुनावण्यात आलेले आहे. येथे खरे तर गरजवंत सचिन पायलट नाहीत, तर कॉंग्रेस पक्ष आहे याचेच पक्षनेतृत्वाला विस्मरण झालेले दिसते.
मुळात सचिन पायलट यांनी हे बंडाचे झेंडे काही पहिल्यांदाच रोवलेले नाहीत. राजस्थानमध्ये सत्तास्थापनेची वेळ आली तेव्हाच मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य आणि राजस्थानात सचिन यांनी मुख्यमंत्रिपदासाठी आपापली दावेदारी पुढे केली होती, परंतु शेवटी पक्षातील ज्येष्ठत्व विचारात घेतले गेले आणि मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांना, तर राजस्थानात अशोक गहलोत यांना नेतृत्व देण्यात आले. मात्र, पक्षातील तरुण नेत्यांना सोबत घेऊन जाणे ना कमलनाथांना जमले, ना ते गहलोत यांना जमल्याचे दिसत आहे.
नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने सचिन यांच्यावर पक्षनिष्ठेला तिलांजली दिल्याचा दोषारोप करून वर त्यांना तपासणी पथकासमोर बोलावून घेऊन चौकशी करण्याचे आक्रमक पाऊल गहलोत यांनी उचलले. त्यामुळे सचिन पायलटांसारखा तरुण नेता बिथरणे साहजिक होते. तिकडे भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय नेतृत्व राजस्थान आपल्या कवेत घेण्यासाठी केव्हाचे देव पाण्यात घालून बसलेले आहे याचे भानही गहलोत यांना उरले नाही.  सचिन यांच्या बंडाळीची चाहुल लागताच भाजपकडून पुढची सूत्रे हलवली गेली आणि सचिन आपल्या समर्थक आमदारांसह दिल्लीमध्ये दाखल झाले. मात्र, गहलोत हेही काही कच्च्या गुरूचे चेले नाहीत. राजकारणातील अनेक पावसाळे त्यांनीही पाहिले आहेत. त्यामुळे तूर्त तरी आपल्यापाशी भक्कम बहुमत असल्याचा दावा गहलोत करीत आहेत आणि सचिन यांनी दावा केल्याप्रमाणे खरोखरच तीस आमदार त्यांच्या बाजूने आहेत का याबाबत साशंकता आहे. सचिन पायलट हे स्वतः भाजपात जाणार की भाजपाच्या पाठिंब्याने सरकार बनवण्याचा प्रयत्न करणार, वसुंधराराजे यांची यावेळी काय भूमिका राहणार या प्रश्नांची उत्तरेही लवकरच मिळतील. असे पेचप्रसंग उद्भवतात तेव्हा जे घडते ते ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’ आता राजस्थानमध्ये सुरू झाले आहे. लोकशाहीने दिलेल्या कौलाला हरताळ फासून कोरोनाच्या या कहरामध्ये देखील सत्तेसाठी हपापलेले राजकीय पक्ष, पदांसाठी उतावीळ झालेले नेते, इकडून तिकडे उड्या मारण्याच्या तयारीत बसलेले त्यांचे चेले हे सगळे अत्यंत उबगवाणे राजकारण राजस्थानात या घडीला चाललेले आहे. या संधीचा फायदा उठवून भाजपा बहुधा लवकरच राजस्थानमध्ये आपले सरकार स्थापन करण्यात सफल होईल, परंतु जनतेने नाकारले असताना अशा प्रकारे सरकार स्थापन करणे नैतिकतेला धरून असेल असे कसे म्हणायचे? परंतु राजकारणात आज नैतिकता राहिली आहे कोठे? सगळा सत्तेचा खेळ आहे आणि स्वार्थ हे त्याचे मूळ आहे. गहलोत गोटाला नमवण्यासाठी काल त्यांच्या दोघा सहकार्‍यांवर केंद्र सरकारने छापे मारले. या अशा घाणेरड्या राजकारणाने सत्ता हस्तगत करता येईल, परंतु पक्षप्रतिष्ठा मात्र मातीमोल झाल्यावाचून राहणार नाही. परंतु आजकाल अशा गोष्टींची फिकीर असते कोणाला? काहीही करून सत्ता हस्तगत करणे आणि जनसेवेच्या नावे तुंबड्या भरणे हाच आजकालच्या राजकारणाचा स्थायीभाव बनलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारची अनैतिक सत्तांतरे हा अशा घाणेरड्या राजकारणाचा एक अविभाज्य भाग ठरतो हेच सत्य पुन्हा एकवार समोर आले आहे.