राजस्थानमधील दोन्ही लोकसभा पोट निवडणुकीत कॉंग्रेस विजयी

0
69

>> विधानसभेची एक जागाही कॉंग्रेसलाच

राजस्थानमध्ये लोकसभेसाठी दोन जागांच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपला धूळ चारीत दोन्ही जागा जिंकल्या आहेत. यामुळे या राज्यात लवकरच होणार्‍या विधानसभा निवडणुकाही भाजपसाठी संघर्षपूर्ण ठरण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केली आहे.

काल जाहीर झालेल्या निकालानुसार अलवर लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे डॉ. करणसिंह यादव यांनी भाजपचे डॉ. जसवंत सिंह यादव यांचा पराभव केला. डॉ. करणसिंह यांना ५ लाख २०,४३४ तर भाजपच्या उमेदवाराला ३ लाख ७५,५२० मते मिळाली.

लोकसभेच्या अजमेर मतदारसंघात कॉंग्रेसचे डॉ. रघू शर्मा विजयी झाले. त्यांनी भाजचे रामस्वरूप लांबा यांचा पराभव केला. राजकीय निरीक्षकांच्या मतानुसार अलवार मतदारसंघात कथित गोरक्षकांनी घातलेला हैदोस भाजपसाठी मारक ठरला. त्यामुळे मुस्लिम मतांचे धु्रवीकरण होऊन त्याचा लाभ कॉंग्रेसला झाला. जसवंतसिंह यांनी ‘तुम्ही हिंदू असाल तर मला मत द्या व मुस्लिम असाल तर कॉंग्रेसला द्या’ असे वादग्रस्त वक्तव्य केल्याचाही भाजपला फटका बसला.
दरम्यान राजस्थानमधील मांडलगढ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतही कॉंग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे.
कॉंग्रेसच्या विवेक धाकड यांनी भाजपचे उमेदवार शक्ती सिंह हाडा यांचा पराभव केला.
वरील तिन्ही ठिकाणी २९ जानेवारी रोजी मतदान घेण्यात आले होते.