राजस्थानमधील कॉंग्रेस सरकार संकटात

0
119

>> मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांत कलह, सचिन पायलट दिल्लीत

राजस्थानमधील कॉंग्रेसचे सरकार सध्या संकटात सापडले असून उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे २२आमदारांसह दिल्लीत दाखल झाले आहेत. कॉंग्रेसचे सरकार पाडण्यासाठी भाजप घोडेबाजार करत असल्याचा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला होता. तर या प्रकरणी भाजपच्या दोन नेत्यांना अटक करण्यात करण्यात आली. उपमुख्यमंत्री सचिन पायलट व मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्यानंतर वेगवान घडामोडी घडल्या असून, उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे २२ आमदारांसह दिल्लीत दाखल झाले आहेत. नोटीस पाठवण्यात आल्यामुळे ते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्री गेहलोत आणि उपमुख्यमंत्री पायलट या दोन्ही नेत्यांमध्ये एकमेकांविषयी प्रचंड अविश्वास आहे.

कॉंग्रेस पक्ष २०१८ मध्ये राजस्थानात सत्तेत आल्यानंतरच अशोक गेहलोत व सचिन पायलट यांच्यात वादसुरू झाला होता. कॉंग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी निवडलेल्या नेतृत्वापासून याची सुरूवात झाली होती. त्यानंतर गेहलोत यांची मुख्यमंत्रिपदी निवड केल्यानंतर पायलट हे प्रचंड नाराज झाले. राजस्थानमधील कॉंग्रेस प्रदेशाध्यपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सचिन पायलट यांनी पक्ष बांधणीसाठी मोठे काम केलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्रिपदी पायलट यांचा दावा होता. मात्र तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांची समजूत घालत त्यांना उपमुख्यमंत्रिपदी बसवले होते.

कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक
दरम्यान, आज सोमवारी सकाळी १०.३० वा. अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. कॉंग्रेसचे सर्व आमदार माझ्या संपर्कात आहेत. सरकार पूर्णपणे स्थिर असून पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा दावा कॉंग्रेसचे सरचिटणीस आणि राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे यांनी केला. सचिन पायलट यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

राजस्थानमधल्या घडामोडींची कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना माहिती देण्यात आली आहे. चौकशीला सर्वांनी सहकार्य करावे, असे पांडे यांनी सांगितले. दरम्यान, भाजप राजस्थानातील कॉंग्रेस सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.