राजवाड्यांची नगरी म्हैसूर

0
863

– सौ. पौर्णिमा केरकर 

नैसर्गिक, सांस्कृतिक, धार्मिक वारशासाठी दक्षिण भारतातील कर्नाटक विशेष प्रसिद्ध. भारताच्या इतिहासाचे असंख्य क्षण या राज्याने अनुभवले. दक्षिण भारतात सत्तास्थानी आलेल्या असंख्य राज्यकर्त्यांनी आपल्या खुणा कर्नाटकातल्या इतिहास आणि संस्कृतीवरती कोरलेल्या आहेत.
कर्नाटकातील ‘म्हैसूर’ हे जरी आज शहर असले तरी एकेकाळी हे एक संस्थान होते. भारतीय लोकशाहीच्या माध्यमातून येथे असलेली संस्थाने खालसा झाली. राजे-सरदार यांची सत्ता लोप पावली. परंतु असे असले तरी मंदिरे, राजवाडे, किल्ले आणि अन्य ऐतिहासिक वास्तूंच्या माध्यमातून काळाच्या उदरात गडप झालेल्या असंख्य बाबी प्रकाशात येतात. कर्नाटकात जिल्ह्याचे मुख्यालय म्हणून म्हैसूरची आज ओळख असली तरी एकेकाळी ते स्वतंत्र संस्थान होते. आपल्या पराक्रमाच्या जोरावरती सत्तास्थानी आलेल्या राज्यकर्त्यांनी म्हैसूर संस्थानच्या लौकिकात वेळोवेळी जी भर घातली, त्याच्या असंख्य खाणाखुणा म्हैसूरमध्ये पाहायला मिळतात. विजयादशमीचा सण आजही म्हैसूर संस्थानच्या जुन्या इतिहास आणि संस्कृतीची झलक दर्शवितो.
लोकशाहीने राजेशाहीच्या अस्तित्वाला नाहीसे केले असले तरी ऐतिहासिक वास्तू आणि विजयादशमीसारख्या सण-उत्सवांच्या प्रसंगी संपन्न होणार्‍या विधी-रीतीरिवाजातून आपणाला जुन्या वैभवाची प्रचिती येते. आधुनिकीकरण, शहरीकरण आणि औद्योगिकीकरण प्रक्रियेने म्हैसुरात आमूलाग्र बदल घडविलेला असला तरी या शहरात असलेली असंख्य वारसास्थळे आपणाला शहराने अनुभवलेल्या शेकडो वर्षांच्या परंपरेची जाणीव करून देतात.
म्हैसूर शहर हे म्हैसूर संस्थानची राजधानी होती. इ.स. १४ व्या शतकात म्हैसूरचा समावेश विजयनगर साम्राज्यात होत होता. १४ व्या शतकाच्या अखेरीस यदुवंशीय राजकुमार विजय याने ‘करुगहळ्ळी’ प्रदेशावरती ताबा मिळविला आणि तो महिष देशाचा ‘वोडेयर’ म्हणजे ‘राजा’ झाला. कधीकाळी निलगिरीचे ‘तोड’ हे महिषपालक होते, तर यादव ‘गोपालक’ होते. या दोन्ही जमातीत युद्ध सुरू झाले. गोपालक हे जगदंबेचे उपासक. तिच्या कृपेने आपण महिषपालकांचा पराभव केला म्हणून त्याने आपली प्रणेती महिषासुरमर्दिनीची स्थापना केली व नंतर तीच त्यांची कुलस्वामिनी झाली. म्हैसूरमध्ये सत्तास्थानी आलेले वोडेयार घराणे कला व संस्कृतीप्रेमी होते. परंतु नंतरच्या काळात सत्तेवर आलेल्या वोडेयार राजघराण्याच्या वंशजांना आपला दबदबा टिकवता आला नाही. त्याचा गैरफायदा हैदरअली या वोडेयारांच्या सेनापतीने घेतला आणि म्हैसूरवरती आपली सत्ता स्थापन केली. १७८२ मध्ये हैदरअलीचा आकस्मिक मृत्यू झाला आणि त्याचा थोरला मुलगा टिपू सुलतान सत्तेवर आला. याच कालखंडात म्हैसूर संस्थानच्या आसपास दोन युरोपीयन सत्ता कार्यरत होत्या. ब्रिटिशांची भारतातील आगेकूच थोपविण्यासाठी फ्रान्सचा राज्यकर्ता नेपोलियन बोनापार्टला टिपू सुलतानची गरज भासली. दुसर्‍या अँग्लो-म्हैसूर युद्धात टिपू सुलतानने ब्रिटिशांचा पराभव केला. परंतु हा विजय जास्त काळ टिकला नाही. तिसर्‍या अँग्लो-म्हैसूर युद्धात ब्रिटिशांनी टिपूला पराभूत केले. असे असतानाही टिपूने ब्रिटिशांविरुद्धचा संघर्ष कायम ठेवला. शेवटी मराठे, हैदराबादचा निजाम यांच्या मदतीने ब्रिटिशांनी टिपूचा पराभव केला. ४ मे १७९९ मध्ये ब्रिटिशांशी लढताना श्रीरंगपट्टणम् येथे टिपूला मृत्यू आला. ‘म्हैसूरचा वाघ’ म्हणून एकेकाळी या संस्थानावरती त्याने निर्माण केलेला दबदबा आजही म्हैसूर शहरातल्या ऐतिहासिक वास्तूंतून अनुभवायला मिळतो. वोडेयार आणि त्यानंतर हैदरअली- टिपू सुलतान यांच्या सत्ताकाळात या शहराने असंख्य स्थित्यंतरे अनुभवली. सत्ता, स्वाभिमान यासाठी या राज्यकर्त्यांनी कैक लढाया लढल्या. त्यामुळे हा इतिहास या शहराच्या ठिकठिकाणी विखुरलेला पाहायला मिळतो.
‘म्हैसूर’ हा शब्द ‘म्हैस’ आणि ‘उर’ या दोन शब्दांच्या संयोगातून निर्माण झाला आहे. इ.स. ११ व्या व १२ व्या शतकात म्हशींचे प्राबल्य असलेल्या या प्रांताला महिषनाडू- महिषदेश म्हणून ओळखत असत. महिषासुरमर्दिनी म्हैसूर शहराची कुलदेवी असल्याने नवरात्र आणि दसरा उत्सव ही इथली खासीयत आहे. आश्‍विन शुक्ल पक्षातील पहिल्या दिवसापासून नवरात्रोत्सवाला येथे प्रारंभ होतो व महानवमी दिवशी या उत्सवाचा परमोच्च बिंदू असतो. दहाव्या दिवशी जेव्हा येथे विजयादशमीचा उत्सव साजरा केला जातो तेव्हा म्हैसूर संस्थानच्या गतकालीन खाणाखुणा, विधी-परंपरा यांचे दर्शन झाल्याशिवाय राहत नाही.
म्हैसूरच्या महाराजांचे वंशज दसर्‍या दिवशी हत्तीवरच्या हौद्यात आरूढ होतात. सोन्या-चांदीच्या अलंकारांनी व पुष्पमालांनी सजवलेल्या गजराजाच्या आगेमागेसुद्धा हत्ती असतात. सैनिक, घोडेस्वार, शरीररक्षक अशा थाटामाटात ही दसर्‍याची जंबूस्वारी निघायची. आज राजांचा पूर्वीचा थाट नसला तरी राजघराण्याचे वंशज शमी वृक्षाची पूजा करतात. केळ्यांचा घड किंवा नारळ यांच्यावर नेमबाजी करतात. मिरवणुकीतून परत येताना महाराज घोड्यावरती आरूढ होतात. म्हैसूरच्या दसर्‍याचा साज हा राजवैभवाला साजेल असाच असतो. वोडेयार घराण्याच्या राजवाड्यातून फिरताना त्या वास्तूचे भव्यत्व नजरेत भरते. सौंदर्याची अनुभूती, त्याला चिकटलेला इतिहास, संस्कृती, राजवैभव, दागदागिने, कपडेलत्ते, गाद्यागिरद्या सार्‍यांचीच उंची अनुभवता त्यातील लावण्याने मंत्रमुग्ध व्हायला होते. ‘म्हैसूर’ म्हटले की तेथील दसरोत्सवाचा थाट नजरेसमोर येतो. या वोडेयारांच्या राजवाड्यात दसरोत्सवासाठी हत्तींना सजविण्यासाठी वापरल्या जाणार्‍या सर्वच वस्तू सांभाळून ठेवलेल्या आहेत. त्यात एक शिस्त आहे. नेटकेपण मनाला भावते. वास्तूंचे दिव्यत्व अनुभवायचे तर म्हैसूरला जायला हवे.
म्हैसूरला लागून असलेली चामुंडादेवीची चामुंडा टेकडी. खरे तर चामुंडा हे महिषासुरमर्दिनीचेच दुसरे नाव. म्हैसूरमध्ये मर्दानी पुरुषांच्या शौर्याची गाथा जरी वेगवेगळ्या वास्तूंमधून प्रतिबिंबित होत असली तरी इथल्या इतिहास- संस्कृती- सौंदर्याला शक्तिरुपिणी मातांचे आश्‍वासक सुरक्षाकवच लाभलेले आहे. मग ती रिपूमर्दिनी महिषासुरमर्दिनी असो, नाहीतर चामुंडादेवी! भक्ती आणि शौर्य, संस्कृती, इतिहास, सौंदर्य यांच्या शोधात म्हैसूरपर्यंत जेव्हा आपण जातो तेव्हा म्हैसुरी चंदनाने आपले तनमन सुगंधित होऊन जाते. या सांस्कृतिक शहराने स्वतःची अशी वेगळी ओळख संपूर्ण जगाला करून दिलेली आहे. म्हैसूरपाक, म्हैसूर सॅण्डल सोप, म्हैसूर सिल्क साडी, म्हैसूर पेढा अशा उत्पादनांवर स्वतःच्या नावाची मोहोर उमटविलेली आहे. म्हैसूरचे अस्तित्व यातूनच अबाधित राहिलेले आहे. अशी मोजकीच स्थळे असतात की जिथे गेल्यावर त्याच प्रदेशाचा ठसा तेथील प्रत्येक कलाकृतीवर उमटलेला असतो. ती तिथल्या मातीची, तिथल्या संस्कृतीची अविभाज्य घटक बनून स्वतःचे वेगळेपण जतन करणारी ठरतात.
नेटके, सरळसोट शहरांतर्गत असलेले रस्ते, लघुउद्योगांना चालना देऊन पारंपरिक कलाकुसरीला आणि कलावंतांना असलेले प्राधान्य, आपल्या पारंपरिक कलेची, संस्कृतीची ओळख या भूमीत येणार्‍या प्रत्येक पर्यटकाला व्हावी ही इथल्या समाजमनात असलेली ओढ दिसते; आणि मनाला हे अनुभवून समाधान मिळते. प्रवासात अशी कितीतरी गावे, शहरे, प्रदेश आपण फिरत असतो. प्रत्येक ठिकाणी ती जागा आपल्या परीने वैशिष्ट्यपूर्ण अशीच असते. वर्तमानात जरी आपण हे सारे संचित अनुभवत असलो तरी इतिहासाची सोबत घ्यावीच लागते. इतिहासच मग साक्षीदार होतो सांस्कृतिक सौंदर्याच्या आविष्काराचा. असाच एक कलात्मक आविष्कार ‘वृंदावन उद्यान’ पाहताना आपल्याला अनुभवता येतो.
‘कृष्णराजसागर’ कावेरी नदीवरील धरणाचे नाव. या धरणाच्या भिंतीला लागूनच वृंदावन उद्यान तयार केलेले आहे. उद्यानात मधोमध असलेल्या तलावात विहार करण्याची सोय असल्याने हे उद्यान पर्यटकांना आकर्षित करून घेते. उद्यानात लावलेली फुलझाडे येणार्‍या-जाणार्‍यांना आकर्षित करून घेतात. फुलझाडांच्या रचनेतच एवढे सौंदर्य भरलेले आहे ते डोळे भरून पाहिले तरी ‘आता पुरे झाले’ असे मनाला वाटतच नाही. त्या विलोभनीय दृश्यात आपण स्वतःला विसरूनच जातो. उन्हे कलू लागली की उद्यानाची शोभा आणखीनच वाढते ती तेथे असलेल्या रंगबिरंगी कारंज्यांमुळे. कारंजी थुईथुई नाचू लागतात. त्या इंद्रधनुष्यी रंगांची सरमिसळ पाहता कृष्ण-राधेच्या मीलनाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. विस्तीर्ण निळ्याभोर आकाशाच्या छताखाली होणारे हे कारंज्यांचे नर्तन डोळ्यांचे पारणे फेडणारे असेच आहे. काळोख दाटून आला तरी उद्यानातून पावले बाहेर पडत नाहीत. सभोवतालच्या गर्दीतही आपली तंद्री लागते. एका वेगळ्या लावण्याच्या दुनियेत आपण जातो. तिथे फक्त सौंदर्यच अनुभवता येते.
एखादी व्यक्ती, त्यातही ती जर लावण्याने गंधीत असलेली युवती असली तर तिला पाहणार्‍याच्या तोंडातून उद्गार बाहेर पडतात ते तिच्या सौंदर्याची प्रशंसा करणारे. मला वाटते की एखाद्या स्थळाला जर सौंदर्यप्रशस्ती द्यायची असेल तर ती म्हैसूर शहरालाच द्यावी लागेल. सरळसोट रस्ते, शहराच्या मध्यभागी चौकाचौकांत उभारलेले गत राजा-महाराजांचे पुतळे, रस्त्याच्या दुतर्फा किंवा मध्यभागी शोभिवंत असलेली छोटी-मोठी उद्याने, आकर्षक पारंपरिक कलाकृतीनी सजलेली दुकाने, अनेक वास्तूंमधून डोकावणारे इतिहास-संस्कृतीचे वैभव हे सारेच प्रेक्षणीय असे आहे.
हिंदू-मुस्लिम राजवटींची स्थित्यंतरे म्हैसूर शहराने पाहिलेली. मोठमोठे प्रेक्षणीय राजवाडे… काहींचे रूपांतर आता हॉटेलमध्येही करण्यात आलेले आहे. प्रत्येक वास्तू सांस्कृतिक वारशाची श्रीमंती मिरवताना दिसते. प्रत्येकाची एक स्वतःची अशी वेगळी परंपरा इथे आहे. आजूबाजूच्या परिसराची शिस्त, गुलमोहोराच्या झाडाची सोबत तर इथे प्रत्येक रस्त्याला, वास्तूलाही आहे. मे महिन्यातच म्हैसूरला जाण्याचा योग जुळून आल्याने गुलमोहोराचा गडद हिरवा व भगवा रंग ठळकपणे जाणवत होता. एकेकाळी राजेशाही थाट, डामडौल मिरविणार्‍या या वास्तू घोड्याच्या टापांनी, नोकरचाकरांच्या सलामींनी, हत्तीच्या अंबारीनी सजून गेलेल्या होत्या. कित्येक वर्षे या वास्तूनी सरंजामशाहीचे हिरवे चैतन्य अनुभवलेले होते. आज वैशाख वणव्यातील त्यांचे भगवेपण ठळकपणे नजरेत भरत असले तरी त्यातील हिरवी संवेदनशीलता कोठेतरी हरवल्यासारखी वाटते. सदा सतेज असलेल्या वास्तू इतिहास-संस्कृतीचे साक्षीदार बनून येणार्‍या पिढीसाठी मार्गदर्शक बनतील यात शंकाच नाही. म्हैसूरला स्वतःचा असा एक वेगळा चेहरा आहे, वेगळे अस्तित्व आहे. इतिहासाच्या पाऊलखुणांची जपणूक करतच हे शहर इथे येणार्‍या पर्यटकाला सौंदर्याशी समरस व्हायला लावते. चंदनासमान झिजून सहवासात येणार्‍यांना सुगंधित करण्याचे सामर्थ्य इथल्या सांस्कृतिक परंपरेत दिसते. चामुंडेश्‍वरीची टेकडी, महाबळेश्‍वराचे मंदिर, राजेंद्रविलास राजवाडा, त्याचप्रमाणे जगमोहन, ललितमहलसारखे प्रेक्षणीय प्रसाद, टेकडीवर दगडात कोरलेला मोठा नंदी अशी अनेक स्थळे आजूबाजूला आपल्याला पाहता येतात. आदिमाया, शक्तिरूपिणी महिषासुरमर्दिनी आणि चामुंडा यांच्या वरदहस्ताने ऐतिहासिक-सांस्कृतिक वारसा मिरविणारी ही भूमी चंदनगंधीत आहे.