राजधानीत कांदा ६० रु. किलो

0
125

>> उत्पादन कमी झाल्याने दर वाढल्याची माहिती

राजधानी पणजीतील मार्केटमध्ये कांद्याचा दर प्रति किलो ६० रुपयांवर पोहोचला आहे. मार्केटमध्ये कांद्याच्या दरात अचानक मोठी वाढ झाल्याने ग्राहक अचंबित झाले आहेत.
पणजी येथील गोवा मार्केटिंग फेडरेशनच्या भाजी विभागात शनिवारी कांद्याचा दर प्रति किलो ४० रुपये असा होता. तर, रविवारी कांद्याचा दर प्रतिकिलो ६० रुपये झाला. पणजी महानगरपालिकेच्या मार्केटमध्ये प्रतिकिलो ६० रुपये दराने कांद्याची विक्री केली जात होती. सोमवारी कांद्यांचा प्रति किलो दर किती असेल हे सांगता येत नाही. मार्केटमध्ये कांद्यांची आवक घटल्याने कांद्यांच्या दरात वाढ झाल्याचा दावा मार्केटमधील विक्रेत्यांनी केला आहे.

महाराष्ट्र, कर्नाटकातील विविध भागात जोरदार पाऊस पडल्याने पिकांसह भाजीपाला उत्पादनाला ङ्गटका बसला आहे. कांदा, लसूण आदी पिके जमिनीखाली असल्यामुळे अतिवृष्टीने कुजली. त्यामुळे त्यांचे उत्पादनही कमी झाले आहे. जादा पाऊस पडल्याने सप्टेंबर महिन्यात बाजारात दाखल होणारा कांदा यावेळी साधारण एक महिना उशिराने येणार आहे. बाजारात कांद्याची आवक कमी झाल्याने दर वाढला आहे, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली.

शनिवारी कोल्हापूर येथील मार्केटमध्ये कांद्याचा दर ५५ रुपये प्रतिकिलो असा होता. कांद्यांचा दर ८० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यापार्‍यांनी व्यक्त केली होती. कांद्याचे उत्पादन घटल्याने दरवाढ झाली आहे, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली.