राजकारणात पुढे येण्यासाठी महिलांना प्रोत्साहनाची गरज

0
101

>> ‘डिफिकल्ट डायलॉग्ज’ परिसंवादात सूर

राजकारणामध्ये महिलांना पुढे येण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. केंद्र व राज्यस्तरावर ३३ टक्के आरक्षण मिळविण्यासाठी महिलांनी दबाव गट निर्माण केला पाहिजे, असे प्रतिपादन पवन के. वर्मा यांनी येथे काल केले.

दोनापावल पणजी येथील गोवा इंटरनॅशनल सेंटर आणि गोवा विद्यापीठ यांनी संयुक्त विद्ममाने आयोजित ‘डिफिकल्ट डायलॉग’ या विचार महोत्सवात राजकारणात महिला या विषयावरील चर्चेत वर्मा बोलत होते. या परिसंवादाचे संचालन मुकुलिका बॅनर्जी यांनी केले. यात जया जेठली, संजय कुमार, शामिका रवी, शाजिया इल्मी, दीपा नारायण, गिलिस व्हर्नेरीस यांनी सहभाग घेतला. महिलांचा मतदानात सहभाग वाढत चालला आहे, ही चांगली गोष्ट आहे. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आरक्षण देण्यात आल्याने संधी मिळू लागली आहे. केंद्र व राज्य स्तरावरील राजकारणामध्ये महिलांना योग्य स्थान मिळत नाही. प्रमुख राजकीय पक्षांकडून महिलांना पाठिंबा मिळत नाही, मोजक्याच महिलांना प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारी दिली जाते. त्यामुळे महिलांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरावे लागत आहे. योग्य पाठबळ मिळत नसल्याने महिला मागे पडत आहेेत, असेही वर्मा यांनी सांगितले.

महिलांना राजकीय पक्षाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात झोकून दिले पाहिजे. महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. राजकीय पक्ष महिलांना जास्त प्राधान्य देऊ पाहत नाही, असेही वर्मा यांनी सांगितले.

महिलांना राजकारणात मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागते, असे दीपा नारायण यांनी सांगितले. महिला मतदारांची मतदारांची टक्केवारी वाढत आहे. पुरूष मतदारांच्या बरोबरीने महिला मतदानात सहभागी होत आहे. महिलांचा सहभाग वाढल्यास राजकारणाचे शुध्दीकरण होण्यास मदत होऊ शकते. महिलांनी कुठल्याही पक्षाची व्होट बँक बनू नये, असे संजय कुमार यांनी सांगितले. लोकसभेत केवळ १२ टक्के महिलांची संख्या आहे. विविध राज्यांच्या विधानसभांमध्ये सुध्दा महिलांना योग्य प्रतिनिधीत्व मिळत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

महिलांचा राजकारण, समाजकारणातील सहभाग वाढविण्यासाठी जागृती करण्याची गरज आहे. महिला, युवती सर्व क्षेत्रात पुढे येत आहेत. कायदे, सुरक्षा या विषयाबाबत विचारमंथन होणे आवश्यक आहे, असे शाझिया यांनी सांगितले. महिलांनी लोकसभा, विधानसभांसाठी राजकीय आरक्षण मिळविण्यासाठी एकजुटीने कार्य करण्याची गरज आहे, असे शामिका रवी यांनी सांगितले.

हसण्यासाठी परवानगीची
गरज नाही : रेणुका चौधरी

हसण्यावर जीेेेएसटी नाही. मला हसण्यासाठी कुणाच्याही परवानगीची गरज नाही, असे टोला माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेसच्या खासदार रेणुका चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल हाणला.

पंतप्रधान मोदी यांनी खासदार चौधरी यांच्याविरोधात अलीकडेच संसदेत केलेली टिप्पणी वादाचा विषय बनला आहे. दोनापावल पणजी येथे एका कार्यक्रमानिमित्त खासदार चौधरी यांचे येथे आगमन झाले आहे. त्याठिकाणी पत्रकारांशी बोलताना खासदार चौधरी म्हणाल्या की, पंतप्रधान मोदी यांनी आपल्या विरोधात केलेली टिप्पणी ही त्यांच्या महिलांकडे बघण्याच्या मानसिकतेचे दर्शन घडविते. आपण पाच वेळा खासदार म्हणून निवडून येऊन कार्य करीत आहे. माझी नकारात्मक छबी दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. आज महिलांमध्ये बदल झालेले आहे. कसे बोलावे हे महिलांना चांगले ठाऊक आहे, असेही त्यांनी सांगितले.

कधी हसावे आणि कशा प्रकारे याबाबत कायदा नाही. हसण्यावर जीेेएसटी लागू करण्यात आलेली नाही. हसणे हे उत्स्फूर्त असते. परंतु आपण हसण्याबाबत आता सजग झाले आहे. माझ्या हसण्याने अधिकारीणीसमोर आव्हान उभे केले आहे. संसदेने कायदा तयार करावा. कायदा तयार करणार्‍यांना महिलांना समान वागणूक व अधिकार देण्याबाबत मार्गदर्शन करण्याची वेळ आली आहे, असेही चौधरी यांनी सांगितले.