राखीवतेबाबत गुदिन्होंनी स्पष्टीकरण द्यावे ः कॉंग्रेस

0
129

राज्य निवडणूक आयोग राज्यातील आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीची प्रभाग राखीवता कुठल्या कायद्यानुसार जाहीर करणार आहे, याबाबत पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी स्पष्टीकरण करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी काल केली.
पंचायत मंत्री मावीन गुदिन्हो यांच्या प्रभाग राखिवता व निवडणूक तारीख निश्‍चितीच्या वक्तव्यामुळे भाजपची जिल्हा पंचायत निवडणुकीसाठीचे मॅच फिक्सिंग उघड झाले आहे, असा आरोप गोवा प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल केला. कॉँग्रेस पक्ष जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी सरकारकडून घेण्यात आलेल्या भूमिकेचा निषेध करीत आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीत पारदर्शकता आणावी, अशी मागणी चोडणकर यांनी केली.

आरक्षण सरकारची जबाबदारी ः आयोग

राज्यातील जिल्हा पंचायतीच्या २२ मार्च २०२० रोजी होणार्‍या निवडणुकीतील विविध घटकांसाठीचे मतदारसंघ आरक्षण राज्य सरकारने अधिसूचित केले पाहिजे, असे राज्य निवडणूक आयुक्त आर. के. श्रीवास्तव यांनी काल म्हटले आहे.

जिल्हा पंचायतीच्या मतदारसंघ आरक्षणाचा अधिकारच सरकारला आहे. सरकारला मतदारसंघाच्या आरक्षणाबाबत आठवण करून देण्यात आली आहे. त्यांनी पूर्वीच आरक्षण जाहीर करायला हवे होते. आरक्षण लवकर जाहीर केले जाईल अशी आशा आम्ही बाळगतो, असेही श्रीवास्तव यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक घेण्यासाठी सर्व तयारी केली आहे. फक्त, आरक्षणाच्या अधिसूचना जारी होण्याची वाट पाहत आहोत. त्यानंतर आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे, असेही श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.