रस्त्यावरील विकृती

0
91

नववर्षाच्या रात्री बेंगलुरूच्या रस्त्यांवर नशाबाज तरुणांच्या टोळक्यांनी महिलांशी केलेल्या गैरवर्तनाच्या व्हिडिओंचा मारा गेले काही दिवस दूरचित्रवाणी वाहिन्यांनी चालवला आहे. तो उबगवाणा असला तरी प्रसारमाध्यमांनी हा विषय लावून धरल्यानेच काहींवर कारवाई होऊ शकली हेही तितकेच खरे आहे. गैरवर्तनाचे हे प्रकार केवळ आजच घडत आहेत असे नव्हे आणि ते केवळ बेंगलुरूतच घडतात असेही नाही. यापूर्वी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया परिसरात नववर्षाचा आनंद घ्यायला आलेल्या तरुणींशी अशाच प्रकारे गैरवर्तन घडल्याची छायाचित्रे टिपली गेली होती, तेव्हाही असाच गहजब झाला होता. या सार्‍या घटना तर निषेधार्ह आहेतच, परंतु या घटनांसंदर्भात जी काही मल्लीनाथी चालली आहे ती अधिक निषेधार्ह आहे. अबू आझमीपासून कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांच्यापर्यंत अनेकांच्या प्रतिक्रिया आपल्याकडच्या पुरुषी मानसिकतेचे दर्शन घडवणार्‍या आहेत. या परमेश्वर महाशयांनी तर आपल्या म्हणण्याचा माध्यमांनी विपर्यास केला आणि बेंगलुरूची प्रतिमा बिघडवण्याचा हा डाव आहे असा शोध लावून आपल्या वक्तव्याचे लंगडे समर्थन चालवले आहे. अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा ‘तंग कपडे घालून या मुलींनी पुरुषांना गैरवर्तनास प्रवृत्त केले’ असा हा युक्तिवाद आपल्याकडे सर्रास केला जातो. स्त्रियांच्या अंगप्रदर्शनास आपल्या भारतीय मानसिकतेत स्थान नाही, त्यामुळे एखादीने आखूड कपडे घातले म्हणजे ती सर्वांना ‘उपलब्ध’ आहे ही जी काही विकृती समाजात दिसते, त्यातून अशा प्रकारचे गैरवर्तन करण्याची या महाभागांची हिंमत बळावते. रात्रीबेरात्री भटकताना स्त्रियांनी स्वतःचे शारीरिक दौर्बल्य लक्षात घेऊन स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे ही अपेक्षा करणे गैर नाही, परंतु रात्री रस्त्याने जाणारी स्त्री म्हणजे जणू काही उघड्यावर पडलेले सावज अशा प्रकारे सारा दोष तिच्याच माथी मारणे हे गैर आहे आणि किमान जबाबदार लोकप्रतिनिधींना तरी ते शोभादायक नाही. निर्भयावर अत्याचार करणार्‍या आरोपींनी आपल्या त्या विकृत कृत्याचे समर्थन करताना ‘रात्री नऊनंतर घरंदाज तरुणी बाहेर फिरत नसते’ त्यामुळे आपण सदर कृत्य तिच्याशी केल्याचा जबाब दिला होता हे यासंदर्भात उल्लेख करण्याजोगे आहे. बेंगलुरूच्या घटनेत कामावरून घरी परतणार्‍या एका तरुणीला स्कूटरवरून आलेले दोघे भररस्त्यात ज्या प्रकारे कवटाळून अतिप्रसंग करतात, ते घृणास्पद दृश्य पाहिल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक आपल्या शहरांत उरला आहे की नाही हा प्रश्नही पडल्यावाचून राहात नाही. पोलीस यंत्रणा सर्वत्र पुरी पडू शकणार नाही हे खरे असले, तरी तिचा जो धाक समाजात असायला हवा तो उरलेला नाही हे वास्तव यातून ढळढळीतपणे दिसते आहे. गुन्हा केला तरी आपण त्यातून पुराव्यांअभावी सहज सुटून जाऊ शकतो ही धारणाच अशा प्रकारच्या गुन्ह्यांना प्रवृत्त करीत असते. ‘सातच्या आत घरात’ ही सामाजिक मानसिकता असली, तरी आज काळ बदललेला आहे. अनेक क्षेत्रांत कमावत्या स्त्रीला रात्री उशिरापर्यंत कार्यमग्न राहावे लागते. कॉल सेंटरसारख्या ठिकाणी तर मध्यरात्रीच कामाची वेळ असते. अशा कॉल सेंटरमध्ये काम करणार्‍या अनेक दुर्दैवी मुली अत्याचारांना बळी पडल्या आहेत. त्या घटनांनंतर वा देशभरात अभूतपूर्व जनजागृती घडण्यास कारण ठरलेल्या ‘निर्भया’ प्रकरणानंतर कायदा अधिक कडक झाल्याने तरी आपली सार्वजनिक ठिकाणे स्त्रियांना सुरक्षित बनतील अशी अपेक्षा होती. परंतु बेंगलुरूमधील धिंगाणा पाहिल्यास अजून त्याबाबतीत आपण खूप मागे आहोत आणि आधुनिक भारताची प्रतीके असलेल्या बेंगलुरू, हैदराबादसारख्या भारतातील अग्रणी शहरांमध्येदेखील स्त्री आज सुरक्षित नाही याची खंत वाटते.