रस्त्यावरच ड्रग्स विकणार्‍या विदेशीला काणकोणात अटक

0
139

सरते वर्ष आणि नववर्षाच्या स्वागताचा आनंद लुटण्यासाठी काणकोणच्या पाळोळे, होवरे, पाटणे समुद्र किनार्‍यांवर देशी आणि परदेशी पर्यटकांची अक्षरश: रीघ लागली असून त्याचा फायदा उठवित अंमली पदार्थाच्या व्यवहारात असलेल्या काही परदेशी व्यक्तींनी राजरोसपणे याठिकाणी अमली पदार्थ विकायला सुरूवात केली आहे. काणकोण पोलिसांच्या सतर्कतेमुळे शनिवार दि. ३० रोजी मध्यरात्री एका केनियन नागरीकाला एका दुचाकीचा वापर करून अंमली पदार्थ विकताना काणकोणचे पोलिस उपनिरीक्षक तुकाराम चव्हाण, प्रशाल देसाई आणि त्यांच्या साथीदार्‍यांनी मुद्देमालासह पकडले.

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या केनियन नागरीकाचे नाव एलिझा माल्कोम वोनागो (२१) असून त्यांच्याकडून १०.४९ ग्राम कोकेन (किंमत ६० हजार रु. ), एलएसडी. ३३ ग्राम (किंमत ८० हजार रु.), ५.५२ ग्रामच्या २० गुंगीच्या गोळ्या किंमत १ लाख रु. मिळून एकूण २ लाख १४ हजार रु.चे अमली पदार्थ, एक मोबाईल, इंटरनेट मोडेम, रोख रु. २२००, एक दुचाकी काणकोण पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
आजवर काणकोण पोलिसांनी असे १० गुन्हे दाखल केले आहेत तर केवळ डिसेंबर महिन्यात ३ गुन्ह्यांचा समावेश आहे. एक परदेशी व्यक्ती भररस्त्यावर दुचाकीवर बसून अमली पदार्थाचा व्यवहार करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर किनार्‍यावर गस्त घालणार्‍या पथकाने ही कारवाई केली. ही व्यक्ती कोल्हापूर येथे एलएलबीच्या दुसर्‍या वर्षात शिकत असल्याची माहिती मिळाली असून त्या व्यक्तीला मडगावच्या न्यायालयात दाखल करून पुढील तपासणीसाठी पाच दिवसांचा रिमांड मागून घेतला असल्याची माहिती काणकोणहज्या पोलिसांनी दिली. काणकोणचे पालिस निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांच्या मार्गदर्शखाली पुढील तपास चालू आहे.