रस्ता अपघातांमध्ये मे महिन्यात १४ बळी

0
70

राज्यातील वाढते अपघात रोखण्यासाठी वाहतूक आणि पोलीस खात्यातर्फे कडक उपाय केले जात असताना मे महिन्यात रस्ता अपघातांमध्ये तब्बल १५ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती वाहतूक खात्याने दिली आहे. या महिन्यात एकूण ३२० वाहन अपघातांची नोंद झाली असून १४ जणांचे बळी १३ भीषण अपघातांनी घेतले आहेत.

वाहतूक खात्याने मे महिन्यातील अपघातांच्या माहितीचा अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार मे महिन्यात १३ जीवघेण्या अपघातांमध्ये १४ जणांना जीव गमावावा लागला आहे. त्यात ९ दुचाकी चालक, १ दुचाकी स्वार, २ प्रवासी आणि २ पादचार्‍यांचा समावेश आहे.

उत्तर गोव्यात ५ आणि दक्षिण गोव्यात ८ जीवघेणे अपघात झाले आहेत. १६ ठिकाणी भीषण अपघात झाले आहेत. त्यात ३७ जण गंभीर जखमी झाले. उत्तर गोव्यात ६ तर दक्षिण गोव्यात १० भीषण अपघात झाले आहेत. राज्यात ८६ ठिकाणी झालेल्या इतर अपघातात १३९ जण किरकोळ जखमी झाले. तर २०५ अपघातात कुणालाही दुखापत झालेली नाही.

वाहतूक खात्याने मे महिन्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ६९७८ जणांवर चलन देऊन कारवाई केली आहे. वाहतूक खाते आणि वाहतूक पोलिसांकडून वाहतूक नियम उल्लंघन प्रकरणी कारवाई केली जात आहे. मात्र, वाहनचालकांकडून बेशिस्त वाहतुकीचे प्रकार सुरूच असल्याने अपघात नियंत्रणात आणणे कठीण होत आहे.

ट्रॅफिक इंटरसेप्टर अपघातात
पणजीत वाहतुकीची कोंडी
काल सकाळी पणजी महानगरपालिका इमारतीसमोर वाहतूक पोलिसांच्या ट्रॅफिक इंटरसेप्टर वाहनाने एका खासगी कारगाडीला धडक दिल्याने गदारोळ माजला. या अपघातामुळे बराच वेळ वाहतुकीची कोंडी झाली. ट्रॅफिक इंटरसेप्टर वाहनाने कारला धडक दिल्याने कारमधील महिलेने ट्रॅफिक इंटरसेप्टर वाहन चालकाला चांगलेच फैलावर घेतले. यावेळी वाहतूक कोंडीवरून शाब्दिक चकमकी झडल्या. या अपघातामुळे शहरातील रस्त्यांच्या मर्यादा उघड झाल्या आहेत. अरुंद रस्ते, रस्त्यांवरील बेशिस्त वाहन पार्किंग, दुहेरी पार्किंग यांमुळे रस्त्यांवरून वाहन चालविणे वाहन चालकांना मोठे जिकिरीचे बनले आहे. मनपासमोर रस्त्यावरच भले मोठे खड्डे पडलेले आहेत.