रशियन समर्थक बंडखोरांकडून पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न

0
122

युक्रेन सरकारकडून अधिकृत निवेदन
क्षेपणास्त्राच्या हल्ल्याने पाडण्यात आलेल्या मलेशियन एअरलाईन्सच्या विमान दुर्घटनाप्रकरणी आता युक्रेन सरकारने अधिकृतपणे वक्तव्य केले आहे. रशियाच्या मदतीने बंडखोर या आंतरराष्ट्रीय गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न करत असल्याचे निवेदन काल युक्रेन सरकारने अधिकृतपणे केले.
दुर्घटनास्थळावरून रशियन बंडखोरांनी ३८ मृतदेह हटविले असून युक्रेनियन चौकशी पथकांना घटनास्थळाकडे जाण्यापासून बंडखोर अडथळे आणत असल्याचेही युक्रेन सरकारच्या निवेदनात म्हटले आहे. विविध देशांचे मिळून २९८ जण गुरुवारच्या या दुर्घटनेत बळी गेले असल्याने रशियाने तातडीने सर्व संबंधितांना सहकार्य करावे अशी मागणी जगातील विविध देशांच्या प्रमुखांनी केली आहे. तत्पर व स्वतंत्र चौकशीसाठी रशियाने सहकार्य करावे असे या नेत्यांनी म्हटले आहे. ऑर्गनायझेशन फॉर सिक्युरिटी अँड को ऑपरेशन इन युरोप (ओएससीई) या संघटनेचे सुमारे ३० सदस्य दुर्घटनास्थळावर जाऊन पाहणी करण्यासाठी काल प्रयत्नशील होते. त्याआधी त्यांना बंडखोरांच्या अडथळ्यांचा सामना करावा लागला.
शुक्रवारी हॉलंडमधीलही तपासपथके दाखल झाली आहेत. हॉलंडमधील सुमारे दीडशेहून अधिक प्रवाशांचा या दुर्घटनेत बळी गेला आहे. तपासपथकांसमोर या गुन्ह्याप्रकरणी पुरावे गोळा करण्याचे मोठे आव्हान उभे आहे. विशेष म्हणजे दुर्घटना घडली त्या प्रदेशावर अजूनही रशियाचे समर्थन असलेल्या बंडखोरांचे नियंत्रण असल्याचे वृत्त आहे. चौकशी कामास सहकार्य देण्याबाबत रशियाकडून अद्यापही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, युक्रेनीयन मदतकार्य पथकांनी आपण आतापर्यंत दुर्घटनास्थळावरून १८६ मृतदेह ताब्यात घेतले असल्याचे म्हटले आहे. रशियातील अत्यंत महत्त्वाच्या काही ऊर्जा व लष्करी आस्थापनांवर निर्बंध घालण्याविषयी अमेरिकेने घोषणा केल्यानंतर एका दिवसाच्या आतच मलेशियन विमान पाडण्यात आल्याने तोही एक चर्चेचा विषय ठरला आहे.