रशियन क्रांतीची शताब्दी

0
110

– दत्ता भि. नाईक

विश्‍वातील सर्व व्यवस्था स्वतःच्या वजनाखाली कोसळतील असे भाकित करणारी ही क्रांतिकारक व्यवस्था स्वतःच्याच वजनाखाली कोसळली. शंभराव्या वर्षी या क्रांतीची साधी आठवणही कुणी काढली नाही, हीच या घटनेची मोठी शोकांतिका आहे.

१९१७ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये घडलेल्या रशियन क्रांतीला यंदा शंभर वर्षे पूर्ण झाली. जुलै १७८९ मधील फ्रेंच क्रांतीनंतर जागतिक इतिहासात महत्त्वाचे स्थान पटकावणारी अशी ही क्रांती होती. फ्रेंच राज्यक्रांतीचा प्रामुख्याने युरोपवर प्रभाव पडला होता. पोपचे व चर्चचे वर्चस्व झुगारून प्रत्येक देशाने स्वतःचा राष्ट्रवाद जोपासावा हा या क्रांतीचा संदेश होता. याउलट रशियन क्रांती जागतिक राजकारणावर जबरदस्त प्रभाव पाडणारी होती. फ्रेंच राज्यक्रांतीने राष्ट्रवाद जागवला होता, तर रशियन क्रांतीने संपूर्णपणे नाकारलेला होता. अखिल विश्‍वातील कामगार एकत्र येऊन एक नवीन व्यवस्था स्थापन करतील, त्यात देव, धर्म, संस्कृती, कुटुंब, विवाह, राष्ट्रवाद इत्यादींना स्थान असणार नाही, भांडवलशाहीचा पूर्ण विनाश करून खाजगी मालमत्तेची पद्धत नाहीशी करून सर्वकाही समूहाचे म्हणजे कम्यूनचे असेल, अर्थात यातून कम्युनिझमची स्थापना होईल असे भाकित मार्क्स एंजल्सने केले. भाकित खरे करण्यासाठी वाट्टेल त्या मार्गाचा अवलंब करण्यासाठी सरसावलेल्यांनी ही क्रांती घडवून आणली होती.

कम्युनिस्टांनी सत्ता हस्तगत केली
प्रथम महायुद्ध चालू होते व गचाळ व्यवस्थापनामुळे रशियन सम्राट झारच्या सैन्याचा सर्व आघाड्यांवर पराभव होत होता. त्यामुळे देशात नैराश्याचे वातावरण पसरले होते. पश्‍चिम युरोपचा औद्योगिकीकरणामुळे विकास झाला होता. कल्याणकारी राज्याची स्थापना मूळ धरू लागली होती. याविरुद्ध रशियामध्ये औद्योगिकीकरणाचा थांगपत्ता नव्हता. राजघराण्यातील लोक सरदार-दरकदार इत्यादी ऐषआरामात राहत होते, परंतु सामान्य जनतेमध्ये गरिबी व बेकारीमुळे असंतोष पसरला होता. १९१५ च्या मार्च महिन्यात हा उद्रेक इतका वाढला की सम्राटाने घटनात्मक राजेशाहीचा पर्याय स्वीकारून देशात लोकनियुक्त सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला. अलेक्झांडर केरेन्स्की या लोकशाहीवादी समाजवादी पक्षाच्या पुढार्‍याने प्रधानमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा कम्युनिस्ट पक्षाचे नेते लेनिन, स्टॅलिन आणि ट्रॉट्‌स्की हे रशियाबाहेर हद्दपारीची शिक्षा भोगत होते. लेनिन तर दहा वर्षे देशाच्या बाहेर वास्तव्यास होता. सरकारला सर्व पक्षांचा पाठिंबा असला पाहिजे असा विचार करून स्वभावाने सज्जन असलेल्या केरेन्स्कीनी कम्युनिस्ट नेत्यांना देशात बोलावून घेतले व तिथेच सगळा घोटाळा झाला.
झारशाहीला कंटाळलेल्या लष्करातील अधिकारी व सैनिकांना हाताशी धरून व ‘कोमिसार’ नावाची संघटना उभारून त्यांच्या जोरावर लेनिन आणि त्याच्या कम्युनिस्ट पार्टीने रशियन साम्राज्याची सत्ता हातात घेतली.

भारतीय स्वातंत्र्यचळवळीवर प्रभाव

रशियातील कम्युनिस्ट पार्टीचे मूळ नाव आहे ‘मार्क्सिस्ट रशियन डेमोक्रेटिक पार्टी.’ भूमिगत झाल्यानंतर लेनिनने या पक्षात ‘बोल्शेविक’ नावाचा एक गट स्थापन केला. बोल्शेविकचा अर्थ आहे बहुसंख्य. मेन्शेविक म्हणजे अल्पसंख्य व मावेरिक म्हणजे तटस्थ. लेनिनने बोल्शेविक गटाच्या जोरावर सत्ता हातात घेतली म्हणून या क्रांतीला ‘बोल्शेविक क्रांती’ असेही म्हणतात.

झारशाहीच्या अंतानंतर झालेल्या निवडणुकीत जनतेने कम्युनिस्ट पक्षाला विरोधी पक्षाच्या स्थानावर बसण्याचा कौल दिला होता. समाजवादी व अन्य पक्षांना मिळून दोन कोटी सत्तर लाख मते मिळाली होती व त्यांचे २४६ प्रतिनिधी निवडून आले होते, तर लेनिनच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट पक्षाला नव्वद लाख मते मिळाली होती व त्याच्या पक्षाचे १४० प्रतिनिधी संसदेवर निवडून गेले होते. २५ नोव्हेंबर १९१७ रोजी मुक्त वातावरणात झालेली ही रशियातील सोव्हिएत संघराज्याचे विसर्जन होईपर्यंत जशी पहिली निवडणूक होती तशी ती शेवटचीही होती. दि. १८ जानेवारी १९१८ रोजी घटना समितीची बैठक भरली. त्यावेळेस कम्युनिस्ट पक्षाच्या प्रतिनिधींनी बुटांचे आवाज काढून व आरडाओरडा करून बैठकीचे कामकाज होऊ दिले नाही. शस्त्रधारी कोमिसारनी संसदभवनाला घेराव घातला व सत्तेची सर्व सूत्रे लेनिनच्या कम्युनिस्ट पार्टीने आपल्या हातात घेतली.

दलित, पीडित कामगारांचे हित करण्याचा कार्यक्रम राबवण्याच्या रशियन क्रांतीच्या घोषणेचा जागतिक पातळीवर बराच परिणाम झाला. कामगारांचे व शेतकर्‍यांचे शोषण करणार्‍या उद्योगपती व जमीनदारांना कडक संदेश देणारी ही घटना होती. रशियन क्रांतीचा पराभव करण्यासाठी सरसावलेल्या पश्‍चिम युरोपमधील साम्राज्यवादी देशांच्या लक्षात आले की, सध्याच्या परिस्थितीत कारवाई करण्यास सामान्य सैनिक फारसे अनुकूल नाहीत. इतकेच नव्हे तर बाल्टिक समुद्रातील ब्रिटिश नाविक दलाच्या सैनिकांनी रशियाशी लढण्यास नकार दिला, तर फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे लाल झेंडे फडकावले गेले.

भारतातील स्वातंत्र्यचळवळीवर सोव्हिएत रशियाचा बराच प्रभाव पडला होता. विेशेष करून क्रांतिकारक चळवळींवर रशियातील क्रांतीचा बराच प्रभाव होता. हुतात्म्यांचे शिरोमणी म्हणून ओळखल्या जाणार्‍या सरदार भगतसिंगवर लेनिनच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव होता. गांधीजींचे पट्टशिष्य म्हणून ओळखले जाणारे पं. जवाहरलाल नेहरूसुद्धा मनातून कम्युनिस्ट होते. त्यांनी स्वीकारलेली पंचवार्षिक योजना स्टॅलिनच्या पंचवार्षिक योजनेची नक्कल होती.

इन्क्विझिशन ते ब्रेनवॉशिंग
मार्क्सने धर्म ही अफूची गोळी आहे असे मानले त्याला एक महत्त्वाचे कारण होते. त्याने ज्या धर्मांचा जवळून अभ्यास केला ते ज्यू, ख्रिस्ती व इस्लाम हे त्यांच्या अनुयायांना झिंग आणणारे धर्म आहेत. दुसर्‍या धर्माच्या अनुयायांवर केलेले अत्याचार हे अत्याचार नव्हे असा या तिन्ही धर्मांचा विश्‍वास आहे. ख्रिस्ती धर्माने धर्माचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत म्हणून इन्क्विझिशनची चौकशी सभा सुरू केली. त्यात त्यानी कितीतरी स्वतंत्र विचार व्यक्त करणार्‍यांना व वैज्ञानिकांना क्रूर पद्धतीने ठार मारले. रोमन कॅथोलिक पंथाच्या या पद्धतीला प्रोटेस्टंट पंथीयांनी विरोध केला, परंतु तेही याबाबतीत कमी नव्हते. मार्क्सचे सहकारी फ्रेड्रिक एन्जल्स यांनी ‘कोलिनिस्ते झैतुंग’ या जर्मन नियतकालिकात लिहिलेल्या लेखात प्रोटेस्टंट पंथीय ख्रिस्त्यांना उद्देशून म्हटले आहे की, ‘तुम्हा प्रोटेस्टंड लोकांना सेंट बार्थलोमेवची रात्र किंवा इन्क्विझिशनच्या नावाखाली कॅथोलिक पंथीयांनी केलेल्या लाजीरवाण्या अत्याचारांबद्दल तिरस्कार आहे. परंतु सेल्विन सर्वेट्‌स हा वैज्ञानिक रक्ताच्या अभिसरणाचा शोध लावण्याच्या बेतात असतानाच तुम्ही त्याला ठार मारले. कॅथोलिकांनी जिओदानो ब्रुनो याला जिवंत जाळले, तर तुम्ही सेल्विन सर्वेट्‌स याला भाजून ठार मारले.‘
या सर्व घटनांचा इथे उल्लेख करण्याचे कारण म्हणजे, याच एंजल्सकडून प्रेरणा घेणार्‍या कम्युनिस्टांनी रशियामध्ये कम्युनची स्थापना करण्यासाठी इन्क्विझिशनसारखाच ब्रेनवॉशिंगचा कार्यक्रम राबवला व अत्याचार म्हणाल तर त्यांचे वर्णन करणेच अशक्य आहे.
नरसंहारामध्ये माओ झेडोंगचा पहिला क्रमांक लागतो. त्यानंतर दोन क्रमांकावर स्टॅलिन व शेवटी तिसरा क्रमांक हिटलरचा लागतो तरीही पहिल्या दोघांची मानवतावादी असल्याचीच प्रतिमा जगातील विचारवंतांनी बनवलेली आहे.

क्रांतीची शोकांतिका
क्रांतीनंतर स्थापन झालेल्या रशियाच्या ‘युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक्स’ने अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता म्हणून नाव मिळवले. पूर्व युरोपमधील सर्वच्या सर्व देशांमध्ये कम्युनिस्ट पार्टीची सरकारे स्थापन केली. त्याचबरोबर भारतीय राजकारणात लुडबूडही केली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाला निवडणुकीच्या दावणीस बांधून सोव्हिएत रशियाने पं. नेहरूंशी मैत्री जोडली. अनेक वेळा भारताच्या बाजूने उभे राहून आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील भारताचा एक मित्र देश अशी स्वतःची प्रतिमा उभी केली. के.जी.बी. ही त्यांची गुप्तहेर संघटना. तिचे जाळे जगभर होते. भारतातही के.जी.बी. वावरत होती. ‘मित्रोखिन पेपर्स’ या नावाने उघडकीस आलेल्या दस्तावेजांवरून १९७१ मध्ये स्व. श्रीमती इंदिरा गांधी यांच्या ‘गरिबी हटाव’ फेम निवडणुकीत के.जी.बी.चा मोठा वाटा होता हे आता सर्वश्रुत झालेले आहे.

जनतेची लोकशाहीसाठीची मागणी अंगावर रणगाडे घालून चिरडून टाकणारी ही सत्ता. १९५६ मध्ये अशाच कारणास्तव सोव्हिएत रशियाने हंगेरीवर आक्रमण केले. इम्रेनाजी या लोकनेत्याला ठार मारून त्याचे प्रेत शेतात फेकून दिले. १९६८ मध्ये झेकोस्लोव्हेकियावर आक्रमण करून तेथील नेते डुबचेक याना स्थानबद्ध केले. १९७९ मध्ये याच सेनेने अफगाणीस्तानवर आक्रमण केले; परंतु २५ डिसेंबर १९९१ रोजी विळी-हातोड्याचा झेंडा उतरला गेला तेव्हा तीच सेनादले स्वस्थ बसून राहिली. विश्‍वातील सर्व व्यवस्था स्वतःच्या वजनाखाली कोसळतील असे भाकित करणारी ही क्रांतिकारक व्यवस्था स्वतःच्याच वजनाखाली कोसळली. शंभराव्या वर्षी या क्रांतीची साधी आठवणही कुणी काढली नाही हीच या घटनेची मोठी शोकांतिका आहे.