रवी शास्त्री कायम

0
112

>> टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी

टीम इंडियाचे प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांना कायम ठेवण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने काल घेतला. माजी क्रिकेटपटू कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांच्या त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीने एक पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. प्रशिक्षकाच्या निवडीमध्ये कर्णधार विराट कोहली याचा सल्ला घेण्यात आला नसल्याचे कपिलदेव यांनी स्पष्ट केले. विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत टीम इंडियाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर शास्त्री यांची उचलबांगडी होणार अशी चर्चा रंगली होती. विश्‍वचषकानंतर बीसीसीआयने प्रशिक्षकपदासाठी अर्जदेखील मागवले होते. या सर्व उठाठेवी केल्यानंतर शास्त्री यांची निवड करण्यात आली. प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत माईक हेसन दुसर्‍या व टॉम मूडी तिसर्‍या स्थानी राहिले. २०२१ मध्ये भारतात होणार्‍या टी -ट्वेंटी विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेपर्यंत रवी शास्त्री प्रशिक्षकपदी कायम असतील.

२०१७ पासून शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारताची कामगिरी उंचावली आहे. शास्त्री यांच्या कार्यकाळात टीम इंडियाने २१ कसोटी सामने खेळले, त्यातील १३ सामन्यात विजय मिळवला. तर, टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ३६ सामन्यांपैकी २५ सामन्यात विजय मिळवला. एकदिवसीय सामन्यात ६० सामन्यांपैकी ४३ सामन्यांत टीम इंडियाने विजय मिळवला, मात्र रवी शास्त्रींच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला विश्वचषक जिंकता आला नाही.
गेल्या वर्षी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात प्रथमच मालिका जिंकण्याचा पराक्रम दाखवला. २०१५ मध्ये विश्‍वचषक स्पर्धेप्रसंगी ते भारतीय संघाचे संघ संचालक असताना भारताने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. विश्‍वचषकानंतर वेस्ट इंडिजविरुद्धची टी- २० आणि एकदिवसीय मालिका भारताला जिंकून दिल्यानंतर शास्त्री यांनी आपली दावेदारी आणखी मजबूत केली होती.