रवींद्रनाथांची ‘वसुंधरा’

0
173
  •  सोमनाथ कोमरपंत

रवींद्रनाथ टागोरांसारख्या मनस्वी वृत्तीच्या, चिंतनशील आणि तरल प्रतिभा लाभलेल्या श्रेष्ठ कवीला वसुंधरेबद्दल ममत्व वाटले नाही तरच ते नवल.
‘वसुंधरा’ या कवितेत कवी अनुभूतीच्या तळाशी गेलेला आहे. त्याला स्वतःच्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये विश्‍वनिर्मितीचे आदिम स्पंदन ऐकू येते.
७ मे २०१९ रोजी रवींद्रनाथ टागोर यांची जयंती. त्या निमित्ताने….

पंचमहाभूतापैकी पृथ्वी ही अत्यंत मूल्यवान. तिच्यातून जीवसृष्टी रुजून येते. ती आपल्या अस्तित्वाचा मूलाधार. साहित्यातून ठायी ठायी प्रकट होणारी सृजनशीलता ही पृथ्वीतत्त्वाचाच एक अंश असते. असे हे दोहोंमधील अतूट नाते. लेखक-कवीची मनोभूमी या नात्यातून स्फुरते- फुलते- बहरते. अक्षरसृष्टीत विलसणारी साक्षात माता वसुंधराच असते. कोणत्याही महान साहित्यकृतीचा अंश मातीतून नैसर्गिकरीत्या स्रवत असतो. तिची आदिप्रेरणा ‘मृण्मय’ असण्याची; तिला ध्यास लागतो ‘हिरण्यमय’ होण्याचा. पृथ्वीतत्त्वाने ओथंबलेली साहित्यकृती अक्षय सुखाचे निधान असते. पूर्वसूरींनी पृथ्वीचे वर्णन बहुरत्नांनी युक्त असे केलेले आहे. तिला ‘गंधवती’ म्हटलेले आहे. पंचसंवेदनांचा मूळस्रोत पृथ्वीतत्त्वातून आलेला आहे.
रवींद्रनाथ टागोरांसारख्या मनस्वी वृत्तीच्या, चिंतनशील आणि तरल प्रतिभा लाभलेल्या श्रेष्ठ कवीला वसुंधरेबद्दल ममत्व वाटले नाही तरच ते नवल.
‘वसुंधरा’ या कवितेत कवी अनुभूतीच्या तळाशी गेलेला आहे. त्याला स्वतःच्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये विश्‍वनिर्मितीचे आदिम स्पंदन ऐकू येते. विश्‍वाच्या आत्म्याशी त्याच्या अस्तित्वाची एकरूपता होऊन जाते. तो स्थल-कालाच्या पलीकडे जातो. या कवितेत रवींद्रनाथांचे वसुंधरेविषयीचे नितान्त प्रेम व्यक्त झालेले आहे. जीवनातील दृश्यांकडे, नादांकडे, गंधांकडे व भावनांकडे ते गतिमानतेने बदलणार्‍या किळसवाण्या वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर बघतात आणि उद्गारतात ः ‘‘तू माझी पृथ्वी आहेस, अनंत काळापासून तू माझीच आहेस. मला धुळीत लपवून ठेवून, या अनंत विश्‍वाच्या पोकळीत तू अविश्रांतपणे सूर्याच्या कक्षेत फिरते आहेस. म्हणूनच, कधीतरी पद्माा नदीच्या तीरावर एकाकी बसलो असताना माझे डोळे खिळून राहतात आणि खोल भूगर्भातून छोटेछोटे तृणांकूर फुटताना जसे होत असेल तशीच शिरशिरी माझ्या गात्रांना व मनाला जाणवते.’’
पृथ्वीशी असलेले आपले आदिम नाते अधोरेखित करताना कवीची तनू कंपित होते. ती रोमांचित होते. प्रकाशकिरणात चमकावे आनंदलहरीत वाहत जावे असे त्याला वाटते. उत्स्फूर्तपणे त्याच्या मनात उद्गार येतात ः
‘‘उत्तर-दक्षिणेला, पूर्व-पश्‍चिमेला शेवाळात, हिरवळीत अन् तृणात, वृक्षशाखांत, वल्कलात आणि पर्णराजीत, रहस्यमय जीवनरसाने रसमय व्हावे. सोनेरी केसरांनी वाकलेल्या शेतांना करंगळीच्या आंदोलनाने स्पर्श करावा, नकळत नवपुष्पांच्या पाकळ्या सोनेरी चित्रणाने, सुधा-सुगंधाने आणि मधुबिंदूंनी परिपूर्ण कराव्यात. नीलिम्याने महासागराचे पाणी परिव्याप्त करावे. अनंत कल्लोळगीतांनी नृत्य करावे. उल्हसित भावभावनांनी तरंगातरंगातून, दिशादिशांतून स्तब्ध धरणीच्या वाणीचा प्रसार करावा. निष्कलंक धुक्याच्या उत्तुंग एकान्तस्थानी निःशब्द क्षणी हिमगिरीच्या शिखरावर स्वतःला शुभ्र उपरण्याप्रमाणे लपेटून घ्यावे.
कवीच्या कल्पनेचा उत्तुंग विलास, भावकोमलता आणि समर्थ शब्दकळा यांचा मनोहर संगम येथे झालेला आहे. कवीचा आत्मभाव येथे फुली फुलून आलेला आहे. दीर्घकाळ निर्झराप्रमाणे आपल्या इच्छा-आकांक्षा दडवून ठेवलेल्या आहेत. आता परिपूर्ण हृदयाने ओसंडून यावे आणि माता पृथ्वीला अभिषेक करावा असे कवीला वाटत आहे.’’ घराच्या एका कोपर्‍यात माझी एकान्तसाधना चाललेली आहे… तुझ्यासमवेत प्रदक्षिणा घालण्यासाठी मनोमन मी कल्पनेचे जाळे विणीत आहे.’’ असे तो म्हणतो. क्षितिजापर्यंत विस्तारलेल्या वाळूच्या शय्येवर तप्त देहाने पडून तळमळणार्‍या आणि तापाने फणफणलेल्या वसुंधरेचे चेतनगुणोक्तीच्या सहाय्याने रवींद्रनाथांनी हुबेहूब शब्दांत वर्णन केले आहे.
‘दुर्गम दूर देश’, ‘पथशून्य सीमाहीन मैदान’, कडक उन्हाने नेत्रांना सुयांसारख्या खुपणार्‍या धगधगत्या वाळूच्या राशी’ आणि ‘अग्निज्वाळेसमान उष्ण श्‍वास’ इत्यादी प्रतिमांतून पृथ्वीचा दाह प्रत्ययकारी स्वरूपात रेखाटला गेला आहे. इथे रवींद्रनाथांची भाषाशैली कठोर रूप धारण करते. पण हीच शैली मार्दवयुक्त होते, कुसुमकोमल रूपकळा लेऊन येते ः
चारी दिशांना पर्वतमाला
मध्यभागी निळे सरोवर
निस्तब्ध निर्जन स्फटिकनिर्मळ,
लहान लहान मेघ मातृस्तनपानरत शिशूसमान
पहुडले आहेत शिखरांना बिलगून
दिसते दूर हिमरेषा
दृष्टीला अडविणार्‍या निळ्या गिरिराजींच्या शिखरांवरती,
उभारले आहेत रांगारांगांनी
निश्‍चल निषेध जणू स्वर्ग भेदून
योगमग्न धूर्जटीच्या तपोवनाच्या दारी
केले आहे भ्रमण मनोमन दूर
सागरापल्याड ध्रुवांच्या प्रदेशात-
घेतले आहे धरेने जेथे चिरकुमारीव्रत,
लेऊन हिमवस्त्र, निःसंग, निःस्पृह,
त्यजून सर्व अलंकार

पृथ्वीतत्त्वाची आणि जलतत्त्वाची सांगड रवींद्रनाथांनी ‘वसुंधरा’ कवितेत घातलेली आहे. इथेच मानवजातीचा अभ्युदय होतो. संस्कृतीची अभिवृद्धी होते. तिच्या या निरंतर प्रवाहाचे कवीने केलेले काव्यमय वर्णन विलोभनीय स्वरूपाचे-

… विरघळवून स्वतःला नदीच्या प्रवाहात
दोन्ही तीरांवरील नव्या नव्या गावांना
पुरवावे पाणी तहान शमविण्या,
जावे गुणगुणत मधुगीते रात्रंदिवस;
पृथ्वीच्या मध्यभागी उदयसमुद्रापासून
विस्तारून स्वतःला अस्तसिंधूपर्यंत,
उत्तुंग पर्वतराजीवर

‘वसुंधरा’ या कवितेतील पुढील आशय उत्कट भावनांच्या प्रकटीकरणामुळे परमोच्च बिंदू गाठतो. रवींद्रनाथ येथे म्हणतात ः
‘‘हे सुंदरी वसुंधरे, तुझ्याकडे पाहून माझ्या हृदयाने उत्कट उल्हासाने किती तरी वेळा गीते गायलेली आहेत. तुझ्या समुद्रमेखलेने शोभून दिसणारा कटिभाग या हृदयाशी कवटाळून धरावा असे वाटले आहे. प्रभातकालीन उन्हासारखे अनंत सीमाहीन दशदिशांना व्यापून अरण्यात पर्वतांवरील कंपित पानांच्या आंदोलनलयीबरोबर अविरत नृत्य करावे असे वाटलेले आहे. सघन, कोमल, श्यामल वर्णाची हिरवळ आलिंगून, प्रत्येक फुलाची कळी चुंबून दिवसभर प्रत्येक तरंगासह आनंदाच्या हिंदोळ्यावर आंदोलन घ्यावे असे मला वाटते. विश्‍वव्यापी निद्रेच्या रूपाने, तुझ्या सर्व पशुपक्ष्यांच्या नेत्रांवरून हळुवारपणे करंगुळी फिरवावी असे वाटते. प्रत्येक शय्येत, प्रत्येक घरट्यात, प्रत्येक घराघरांत, प्रत्येक गुहेत प्रवेश करून स्वतःला विस्तीर्ण पदरासारखा विस्तारून विश्‍वभूमीला स्निग्ध अंधाराने आच्छादावे असे वाटते.’’
रवींद्रनाथांचे हे अक्षरशिल्प पृथ्वीविषयीच्या ममत्वाने ओथंबलेले आहे. तिच्या प्रत्येक उन्मेषाचे, अणुरेणूचे वर्णन करताना त्यांच्या सौंदर्यनिष्ठ मनाचे दर्शन घडते. ही तन्मयता अनुभवताना साहजिकच बालकवींचे स्मरण होते. ‘कोमलकांतपदावली’चा विलास प्रकट ‘गीतगोविंद’कार जयदेवाची आठवण होते.
शब्दसमाधी लागलेल्या या थोर कवीला पृथ्वीविषयी काय वाटते? ः
‘‘तू माझी पृथ्वी बहुत वर्षांची आहेस. मला मिसळून तुझ्या मातीसंगे अनंत गगनात अविश्रांत चरणांनी तू सूर्यमंडळाला प्रदक्षिणा केल्यास. असंख्य रात्री अन् दिवस, युगानुयुगे माझ्यामध्ये तुझी हिरवळ उगवली आहे. राशीराशींनी फुले उमलली आहेत. तरुराजींनी पानापानांचा, फुलाफळांचा, सुगंध परागांचा सतत वर्षाव केला आहे. म्हणून आज मी एकाकी अवस्थेत, विमनस्कपणे पद्मा नदीच्या काठावर मुग्ध नेत्रांनी पाहत आहे. सर्वांगांनी सर्वांच्या अंतःकरणांत तुझ्या मातीत तृणांकुर कसे रोमांचत आहेत याची अनुभूती घेत आहे.’’ कवीला कुतूहल वाटते ते या गोष्टीचे ः
तुझ्या अंतरी रात्रंदिस
संचारते कोणती जीवनधारा,
पुष्पकळ्या कोणत्या अंध आनंदभरात
आंदोलतात उमलून सुंदर देठांवर,
तृणलता झाडे – झुडपे
किती गूढ रोमांचांनी, किती मूढ आनंदरसांनी
हर्ष पावतात नव्या उन्हात
स्तनपानाने श्रमलेल्या, मन तृप्त झालेल्या
सुखस्वप्नाने हसणार्‍या शिशूंसमान
यास्तव आज
बसतात जेव्हा शारदीय किरणे पक्व केसरांच्या सोनेरी शेतांवर

आनंदलहरी उमटणार्‍या कवीच्या मनात निसर्गानुभूती जागी होते. तिच्याशी एकतानता साधता साधता त्याच्या प्रतिभेला नवपल्लव फुटतात. तो उद्गारतो ः
वार्‍याने माडांची झावळे उन्हात चकाकत थरथरतात. मनात अतीव उत्कट व्याकुळता दाटून येते. तो दिवस स्मरताना भुवन साद घालते. त्या विविध आविष्कारांनी विनटलेल्या- वैचित्र्यपूर्ण- विशाल क्रीडागृहातून मिश्र सळसळीसारखा परिचित स्वर ऐकू येतो. तो असतो चिरकालीन सौंगड्यांच्या लक्षावधी आनंदलीलांचा.
कवी पृथ्वीमातेला विनवतो ः ‘‘मला पुन्हा एकदा माघारी घे. समोर संध्याकालीन किरणात विशाल निर्जन मैदान जेव्हा मी पाहतो तेव्हा मनात वारंवार विरह जागा होतो. तो तू दूर कर.’’
अशा या आनंदघटिकेला कवीच्या मानसात संमिश्र भावनांची वीण निर्माण झाली आहे, त्याच्या अंतःकरणाचा तळ ढवळून निघाला आहे. आणि कल्लोळ निर्माण होताहेत ते समजून घेणे अगत्याचे आहे ः

होणार नाही का नवीन किरणकंपन
प्रभातकालीन प्रकाशात?
मुग्ध भावांनी माझ्या आकाश-पृथ्वीतल
होतील चित्रित हृदयाच्या रंगांनी
दर्शनाने ज्याच्या स्फुरेल कविता कवीच्या मनात
स्पर्शील भावावेग प्रेमिकांच्या नेत्रयुगलांना
स्फुरतील गीते अवचित पक्ष्यांच्या मुखांना
हे वसुधे, सहस्त्रांच्या सुखांनी
रंगले आहे तुझे सर्वांग

सस्यशालिनी पृथ्वी सर्वांगांनी मुकुलित होते तेव्हा आनंदाच्या राशी तिच्या अंतरंगात फुलून येतात. ती धात्री असते. धरित्री असते. धारिणी असते. हा स्वर्गीय आनंद जेव्हा रवींद्रनाथांसारखा प्रतिभावंत आपल्या अंतःकरणात भरून घेतो तेव्हा त्या लहरी किती अमूर्त स्वरूपाच्या असतात? त्या अमूर्ताला समूर्त करण्याची संवेदनशीलता त्यांना लाभलेली आहे. अशा वेळी ते अतिशय हृद्य शब्दांत आपले मनोगत व्यक्त करतात ः मातेविषयी ः मातीविषयीचे आणि मातृभूमीविषयीचे ममत्व व्यक्त करतात. तो वाचताना रसिकाच्या मनात अनामिक हुरहूर निर्माण करतात ः
हे मातृभूमि
सोडून देणार का तू सर्वस्वी मला,
मातीचे थोर बंधन युगायुगांचे
होणार का विच्छिन्न अकस्मात?
जाणार का निघून
सोडून लक्षावधि वर्षांचे तुझे स्निग्ध वक्षस्थळ?

धरित्रीचा तरुण पुत्र असलेला मी अतिदुर्गम मार्गाने जगाच्या महाप्रदेशातून बाहेर जाईन. अति दूर दूरांतरीच्या तारकांच्या प्रदेशात जाईन.’’ असे कवी म्हणतो. पण पृथ्वीमातेच्या स्तनामृताची आपली आशा मिटलेली नाही. अजूनही तिच्या सुखदर्शनाने आपल्या नेत्रात सुंदर स्वप्न तरळते असे तो म्हणतो आणि शेवटी उत्कट शब्दांत तिला विनवतो ः
‘‘हे जननी, तू मला दृढ बंधनात, तुझ्या बाहुपाशात कवटाळून घे. जिथून तुझ्या विपुल प्राणशक्तीच्या वैचित्र्यपूर्ण सुखाचा निर्झर उसळतो त्या तुझ्या हृदयात मला स्थान दे ना? मला त्या रहस्यपूर्ण स्थानी ने. मला दूर लोटू नकोस.
वसुंधरेविषयीची रवींद्रनाथांची ही अम्लान कविता विश्‍वसाहित्यात गणली जाईल. एवढ्या तोलामोलाची ती आहे.
(पणजी आकाशवाणीच्या सौजन्याने)