रनिंग व जॉगिंग यातील फरक!

0
1598

– सौ. मोहिनी सप्रे

* रनिंग म्हणजे जोरात धावणे. यात दीड किमीचे अंतर सात मिनिटात किंवा त्याहून कमी वेळात कापायचे असते- तेच जॉगिंग करताना हेच अंतर कापण्यास सात मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला तरी चालतो.
* रनिंगमध्ये पायाच्या पंजावर जोर देऊन खूप गतीने धावायचे असते- तेच जॉगिंगमध्ये प्रथम टाच टेकवून मग पंजा जमिनीला टेकवून धिम्या गतीने धावायचे असते.
* धावण्यामध्ये स्पर्धा असते. वेळेचे बंधन असते. यासाठी बक्षिस असते- पण जॉगिंगमध्ये स्पर्धा नसते. वेळेचे बंधन नसते. मनाच्या आनंदासाठी व शरीर स्वास्थ्यासाठी हा व्यायाम असतो.
* कमी अंतराचे रनिंग असल्यास तोंड बंद ठेवून शरीरातील प्राणवायुच्या पुरवठ्याचा उपयोग करून इच्छित फळ मिळवण्याकरता शरीर व मन या दोघांना कसून मेहनत करावी लागते- तेच जॉगिंगमध्ये इच्छेनुसार तोंड उघडे अथवा बंद ठेवावे. शरीरातील प्राणवायुचा पुरवठा परत मिळवणे हे करता येते. या प्रकारात एकसारख्या संथ गतीने आरामात शांतपणे धावायचे असते. जॉगिंगला ऍरोबिक कसरत असे म्हणतात.
जॉगिंग कशासाठी करावे? – जॉगिंग करताना मांडीचे व पायाचे मोठे स्नायू एक प्रकारचे संतुलन साधून काम करतात. जॉगिंगमुळे शक्ती येते. ही शक्ती पुरी पडण्यासाठी हृदयाचे ठोके वाढतात. फुफ्फुसे श्‍वासोच्छ्वासाची गती वाढवतात. हळुहळू याप्रकारे हृदय व फुफ्फुसे मजबूत होतात व थोड्या परिश्रमात जास्त काम करण्याची क्षमता मिळवतात.
जॉगिंग, रनिंग, सायकलिंग, स्विमिंग या ऍरोबिक व्यायाम प्रकारात प्राणवायू सतत आत घेतला जातो म्हणून या कसरती करणार्‍यांचे हृदय व फुफ्फुसे मजबूत होतात. रक्ताभिसरण चांगले होते. शरीर निरोगी राहते. तसेच दंडबैठका, मुद्गल फिरवणे अशा प्रकारच्या व्यायामांनी स्नायू सुडौल व मजबूत होतात. ऍरोबिक प्रकारच्या व्यायामांनी होणारे फायदे इतर प्रकारच्या व्यायाम प्रकारात मिळत नाहीत. रोज फक्त तीस मिनिटे जॉगिंग केल्यास हृदय व फ्फुसांची शक्ती आश्‍चर्य वाटावे इतकी वाढते. म्हणूनच शारीरिक व मानसिक स्वास्थ्य त्या व्यक्तीला मिळू शकते.
जॉगिंग व्यायाम प्रकारामुळे होणारे फायदे –
१. यासाठी काहीही खर्च करावा लागत नाही. संकल्प व नियमितपणा एवढं असलं की बास.
२. एक जोडी चांगली पादत्राणे. याशिवाय दुसरे काही आवश्यक नसते.
३. काही विशिष्ट जागा किंवा स्थळाची गरज नाही. कुठेही जॉगिंग करता येते.
४. वेळेचा प्रश्‍न नाही. थोड्या वेळात कसरत संपते.
५. वयस्कर लोकांनाही हा व्यायाम करता येतो.
६. हा आनंद देणारा व्यायाम असून मेहनत कमी व फायदे पुष्कळ आहेत.
७. जॉगिंगमुळे हृदय व फुफ्फुसे मजबूत होतात. थोड्या श्रमात जास्त काम केले जाते. रक्ताभिसरण चांगले होते. जॉगिंगमुळे त्वचा तेजस्वी होते. स्टॅमिना वाढतो. शरीर व मनाला वृद्धत्व येत नाही. व्यक्ती आशावादी होते. निराशा गेल्यामुळे व्यक्ती निरोगी दिसू लागते. आत्मविश्‍वास वाढतो.
८. नियमित जॉगिंग केल्यास वजन कमी होते.
९. शरीरात स्फूर्ती आल्याने व्यक्ती नोकरी व धंद्यात जोमाने व उत्साहाने काम करते.
१०. कंबरेचा घेर जॉगिंगमुळे कमी होतो.
११. जॉगिंगमुळे कंबर व सांधेदुखी कमी होते.
जॉगिंग करण्यापूर्वी…
* प्राथमिक वैद्यकीय तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
* जॉगिंग सुरू करण्यापूर्वी वॉमिर्ंंग अप व संपल्यावर कुलिंग डाऊन क्रिया करणे आवश्यक.
* जॉगिंग करताना घाम येतो म्हणून उन्हाळ्यात एक ग्लास पाणी प्यावे. इतर ऋतुतही पाणी प्यावे.
* हा व्यायाम कायम करावा.
* सैलसर पोषाख, कॅनव्हासचे बूट, सुती मोजे घालावे.
* बरोबर कोणी असेल तर रोज एकमेकांमुळे जॉगिंग केले जाते.
जॉगिंग कसे सुरू करावे?…
प्रथम हळुहळू चालण्यास सुरुवात करा. प्रथम अर्धा तास व मग वाढवा. मग एक तास चाला. मग हळुहळू धावण्यास सुरुवात करा. ५ मिनिटे धावून मग परत ५ मिनिटे चालावे. असे क्रमाक्रमाने करावे. असे नियमित केल्याने जॉगिंगचे सर्व फायदे मिळतील. सुरुवातीला स्नायू दुखतील. श्‍वास घेताना थोडा त्रास जाणवेल. पण मग सवय झाली की त्रास कमी होईल व हलकेपणा जाणवेल.
जॉगिंग कोणी करू नये?…
ज्यांना हृदयविकार, उच्चरक्तदाब, संधिवात, ज्यांना फीट येते, ज्यांचे मन दुर्बल आहे. ऍनिमिया, पायात व्यंग तसेच खूप आजारातून उठलेली व्यक्ती यांनी जॉगिंग करू नये. तसेच कावीळ, लीव्हरचे विकार, मज्जातंतूंचे आजार, किडनी स्टोन, फुफ्फुसांचे आजार, मानसिक विकृती असलेल्या व्यक्ती अशांनी जॉगिंग करू नये. अविचाराने, शरीराची पूर्वतयारी न करता घाईघाईने व प्रमाणाबाहेर व्यायाम केल्यास नुकसान होते. म्हणून डॉक्टरी सल्ल्यानंतरच जॉगिंग किंवा कोणतेही व्यायाम सुरू करावेत.
तुम्ही परिश्रम केले नाहीत तर शक्तीचा लाभ होणार नाही. शक्तीचा उपयोग करा की शक्ती तुमच्या मागे धावत येईल!