रणरागिणींचा विजयोत्सव ः दसरा

0
215
  • प्रकाश क्षीरसागर

पुराणकाळापासून आज एकविसाव्या शतकापर्यंत रणरागिणींचा लढा सुरूच आहे. त्यात त्यांनी अनेक विजयही प्राप्त करून घेतले आहेत. शेवटी काहीच आधार नसल्यावर महिला शक्तीच कामी येते. या सर्व महिला शक्तीला विजयादशमीनिमित्त मानवंदना.

 

दसरा हा भारतीय परंपरेतील एक महत्त्वाचा सण. साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मानाचा मुहुर्त. दसर्‍याच्या दिवशी सुरू केलेले काम फत्तेच होते असा लोकांचा विश्‍वास आहे. पराक्रमाचा आणि विजयोत्सवाचा हा सण. या सणाला पौराणिक महत्त्व जसे आहे, तसेच ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. ‘देवी माहात्म्य’ या ग्रंथात आदिशक्तीच्या पराक्रमाची महती वर्णन केली आहे. महिषासुर नावाचा दैत्य मातल्यानंतर त्याचा परिपात करण्यासाठी देवी आदिमायेने उग्र रूप धारण करून महिषासुराचा वध केला. पुराणकाळापासून आज एकविसाव्या शतकापर्यंत रणरागिणींचा लढा सुरूच आहे. त्यात त्यांनी अनेक विजयही प्राप्त करून घेतले आहेत. शेवटी काहीच आधार नसल्यावर महिला शक्तीच कामी येते. या सर्व महिला शक्तीला विजयादशमीनिमित्त मानवंदना.

पुराणकथांनुसार महिषासुराने उग्र तपश्‍चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले. मला देव आणि नर यांच्याकडून मरण येऊ नये, असा वर त्याने मागून घेतला. पराक्रमी, शूर आणि अतिशय बुद्धिमान अशा महिषासुराला वरदान प्राप्त होताच इतर दैत्याप्रमाणे तोही उन्मत्त झाला आणि त्याने सर्वांना सळो की पळो करून सोडले. सर्व जग त्रासून गेले. त्याला ना इंद्र मारू शकत होता, ना ब्रह्मा, विष्णू महेश. हे तीन देव त्याला ना पराभूत करू शकत होतेे की त्याचा वध करून पृथ्वीची सुटका करू शकत होते. त्याला मिळालेल्या वरानुसार तो ना नराच्या हातून मरणार होता ना देवाच्या. यामुळे त्याने अपार शक्ती मिळवून त्याच्या जोरावर स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळातील जनतेला त्रास देण्यास सुरुवात केली. मुळातच असुर असल्याने आणि यज्ञ याग यांचा तिटकारा असल्याने त्याने यज्ञांचा विध्वंस करायला सुरुवात केली. तप करणार्‍या तपस्वी मुनींना सळो की पळो करून सोडले. आपल्यापेक्षा कोणीही बलाढ्य होता कामा नये. म्हणून तपाने ताकद मिळविणार्‍यां महिषासुराने इतरांवर आपला अंमल गाजवायला सुरुवात केली.
आपल्या यज्ञयागाद्वारे इंद्रादि देवांना हविर्द्रव्य देणार्‍या ऋषिमुनींनी मग देवेंद्राकडे आपले गार्‍हाणे मांडले. आपण काहीतरी उपाय करू असे देवेंद्राने आश्‍वासन दिले, तरी इंद्राने तर त्याच्या पुढे कधीच शरणागती पत्करली. देवेंद्र असूनही त्याचे काहीच चालत नव्हते. तो हतबल झाला. तो जगन्नियंत्या भगवान विष्णू नारायणाकडे गेला. परंतु भगवान विष्णूंनी त्याला ब्रह्मदेवाच्या वरदानाचे स्मरण करून दिल्यावर तो गलितगात्र झाला. त्यानंतर त्याने धाव घेतली ती ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाने त्या महिषासुराला नर किंवा देवांपासून मृत्यू नसल्याने आपल्याला ते जमणार नाही, असे स्पष्ट केले. इंद्राचा नाईलाज झाला. त्याने अखेरचा उपाय म्हणून शंकराकडे जाण्याचे ठरविले. मग विष्णू आणि ब्रह्मदेवासहित सगळ्यांना सोबत घेऊन इंद्र शंकराकडे कैलासावर गेला. परंतु वरामुळे त्याचा संहार करणे आपल्याला शक्य नाही, असे शंकरांनी स्पष्ट केले. तेवढ्यात ब्रह्मदेवांना काहीतरी आठवले. क्षणभर थांबून त्यांनी सांगितले. महिषासुराचा वध नर (मानव) किंवा देव यांच्या हातून होणार नाही, परंतु नारी शक्ती त्याचा वध करू शकणार नाही, असे नाही. त्यामुळे आपल्याला देवी आदिमायेकडे त्याच्या वधासाठी प्रार्थना करता येईल.

देवी पार्वती हीच आदिशक्तीचे स्वरूप असल्याने पार्वतीने आपण या संकटाचे आणि समस्येचे निराकरण करू, असे सर्व देवांना आणि ऋषींना सांगितले. पार्वतीने मग ब्रह्माणी आणि लक्ष्मीचे आवाहन करून त्यांना बोलावून घेतले. त्या तिन्ही देवींनी मसलत करून आपण एकत्रित रूपाने अवतार घेऊन महिषासुराचा वध करून पृथ्वी संकटमुक्त करू असे सर्व देवांना आणि ऋषीमुनींना सांगितले. त्यांच्या संकल्पानंतर देवी दुर्गा अष्टभुजा स्वरूपात प्रकट झाली. ती वाघावर बसली होती. दहा दिवस घनघोर युद्ध झाले त्यात महिषासुर पराभूत झाला. त्याचा वध देवीने केला. या युद्धात चंड, मुंड असे त्याचे पराक्रमी सेनापतीही मरण पावले. देवी दुर्गेला या युद्धात साह्य करण्यासाठी अष्टकुष्मांडा, यक्षिणी, डाकिनी, शंखिनी, काली अशा असंख्य नारीशक्तीचा उदय झाला. रक्तबीज नावाचा एक सेनापती महिषासुराकडे होता. त्याचे वैशिष्ट्य असे की त्याच्या रक्ताचा थेंब जमिनीवर पडताच त्यापासून दुसरा रक्तबिज तयार होत असे. त्याने देवी दुर्गा मातेशी तुंबळ युद्ध केले. मग कालीमातेने प्रकट होऊन त्याच्या रक्ताचे थेंब जमिनीवर पडू न देता ते वरच्यावर प्राशन केले अशी आख्यायिका आहे. त्याचे रक्त संपल्यावर रक्तबीजही संपला अशी ही कथा आहे. दहा दिवस हे घनघोर युद्ध चालले. हा काळ आश्‍विन शुद्ध पक्षाची प्रतिपदा ते दशमी असा दहा दिवसांचा होता. दसर्‍याच्या दिवशी महिषासुराचा वध झाला आणि हे युद्ध समाप्त होऊन वसुंधरा संकटमुक्त झाली. महिषासुरावर देवीने विजय मिळवला तो दिवस आश्‍विन शुद्ध दशमीचा होता. म्हणून या तिथीला विजयादशमी असे संबोधतात.

या सगळ्या झाल्या पुराणकथा. पुराणकाळातही पुरुषसत्ताक शक्तीला अखेर आपल्या संकटाचे निराकरण करण्यासाठी स्त्रियांचीच मदत घ्यावी लागली. मग मधल्या काळात स्त्री हतबल का झाली. की गरज सरो नि वैद्य मरो या म्हणीनुसार देवेंद्रादि पुरुष देवांनी आणि पृथ्वीवरील यच्चावत मानवांनी तिची उपासना का बंद केली? तिच्या शक्तीचे स्वरूप का ओळखलेे नाही? की स्त्री ही अखेर त्याने गुलामच मानलेली होती. स्त्रियांनी आजवर खूप सोसले आहे. त्यांची सहनशीलता, त्यांचे धैर्य आणि धाडस काही कमी नाही. स्वातंत्र्यपूर्व काळाच्याही अनेक शतके आधी स्त्रियांनी कमी पराक्रम केलेले नाहीत. संत परंपरेतील स्त्रिया, त्यांचे काव्य बंडखोरच आहे. देवादिकांच्या लढ्यातही श्रीकृष्णाला रुक्मिणीने नरकासुर वधाच्या वेळी केलेले साह्य आणि रथाचे सारथ्य, त्याही कित्येक सहस्रके आधी रामायणकाळात दशरथाला युद्धात कैकयीने केलेले साह्य हे सर्वश्रृत आहे. त्यांच्या पराक्रमाला तोड नाही. नंतरच्या काळात अनेक स्त्रिया राज्यकर्त्याही झाल्या आहेत. अहिल्यादेवी होळकर, राणी लक्ष्मीबाई ही वानगीदाखलची उदाहरणे आहेत. स्त्रियांनी गाजवलेला पराक्रम इतिहासाने बर्‍याच वेळा दुर्लक्षित केलेला आहे. मात्र ही कामगिरी दुर्लक्षित करण्यासारखी नाही. स्वातंत्र्यलढ्यातदेखील कित्येक स्त्रियांनी पराक्रम गाजवलेला आहे. स्वातंत्र्यलढ्यातील नायकांच्या पत्नींनी सोसलेला त्रास आणि केलेला त्याग हेही पराक्रमच आहेत.

केवळ नवरात्राच्या काळात नवदुर्गांनीच युद्ध केले असे नाही. आजकालच्या काळातही स्त्रियांची लढाई सुरूच आहे. या सगळ्या आजच्या काळातील नवदुर्गाच आहेत. त्यांचा लढा व्यर्थ जाणारा नाही.
महालक्ष्मी अंबाबाई, तुळजाभवानी, शांतादुर्गा या सार्‍या महिला शक्तीला विजयादशमीच्या निमित्ताने मानवंदना. अर्थात, त्यात आजच्या रणरागिणीही आल्याच.