रणजी फायनल रंगतदार स्थितीत

0
138

>> बंगाल, सौराष्ट्रला अजिंक्यपदाची समान संधी

अनुष्टूप मजुमदारच्या धीरोदात्त फलंदाजीमुळे बंगालचा संघ रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत बॅकफूटवरून फ्रंटफूटवर आला आहे. सौराष्ट्रसमोर नांगर टाकून राहताना मजुमदारने नाबाद ५८ धावा केल्या आहेत. बंगालचे केवळ चार गडी शिल्लक असून सौराष्ट्रची पहिल्या डावातील धावसंख्या मागे टाकून पहिल्या डावातील आघाडीच्या आधारे रणजी करंडक आपल्या नावे करण्यासाठी त्यांना आज शेवटच्या दिवशी ७२ धावांची आवश्यकता आहे.

चौथ्या दिवशी बंगालने ६ बाद ३५४ धावांपर्यंत मजल मारली. अर्णब नंदी (नाबाद २८, ८२ चेंडू) याच्यासह मजुमदारने सातव्या गड्यासाठी ९१ धावांची अविभक्त भागीदारी रचली आहे. जयदेव उनाडकटचा चेंडू बोटांवर आदळूनही नंदी याने धीर न सोडता मुजुमदारला साथ दिली आहे. स्पर्धेच्या उपांत्यपूर्व तसेच उपांत्य फेरीतही बंगालच्या मदतीला मजुमदार धावून आला होता. पुन्हा एकदा त्याने ‘संकटमोचक’ म्हणून भूमिका बजावली आहे. सौराष्ट्रने खराब क्षेत्ररक्षण करून बंगालच्या धावसंख्येला हातभार लावला. शेवटच्या सत्रात त्यांनी तब्बल ९० धावांची खैरात केली. हार्विक देसाई याने वैयक्तिक १० धावांवर पहिल्या स्लीपमध्ये मुजुमदार याचा सोपा झेल सोडला होता. हाच झेल सौराष्ट्रला महाग पडत आहे. चौथ्या दिवसातील पहिले व तिसरे सत्र बंगालच्या नावे राहिले तर दुसर्‍या सत्रात सौराष्ट्रने तीन बळी घेतले. तिसर्‍या दिवसाचा खेळ पाहूनच पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर रणजी विजेता ठरेल, हे निश्‍चित झाले होते.
तिसर्‍या दिवसाच्या ३ बाद १३४ धावांवरून पुढे खेळताना सुदीप चॅटर्जी (८१ धावा, २४१ चेंडू) व वृध्दिमान साहा (६४ धावा, १८४ चेंडू) यांनी किल्ला लढवताना ४९ षटके खेळताना १०१ धावांची भागीदारी केली. पहिल्या सत्रात सौराष्ट्रला एकही गडी बाद करणे शक्य झाले नाही. बंगालने या सत्रात २९ षटकांच्या खेळात ८९ धावा केल्या. खेळपट्टीवर एखादा चेंडू खाली राहत असल्याने पायचीत किंवा त्रिफळाचीतद्वारे बळी मिळविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न सौराष्ट्रच्या गोलंदाजांनी पहिल्या सत्रात जुन्या चेंडूने व दुसर्‍या नव्या चेंडूने केला. तिसर्‍या दिवसअखेर ४७ धावा जमवलेल्या चॅटर्जीने आपल्या भक्कम बचावाचे दर्शन घडवले तर साहाने अधुनमधून धोका पत्करला. यंदाच्या मोसमातील आपला पहिलाच रणजी सामना खेळणारा टीम इंडियाचा कसोटी यष्टिरक्षक साहा तीन वेळा बाद होता होता वाचला. जयदेव उनाडकटच्या गोलंदाजीवर दोनवेळा डीआरएस त्याच्या मदतीला धावून आला तर एकदा क्षेत्ररक्षकांतील समन्वयाच्या अभावामुळे तो धावबाद होण्यापासून थोडक्यात बचावला.

गलीमध्ये वैयक्तिक ४६ धावांवर दिलेल्या जीवदानामुळे त्याला आपले अर्धशतक पूर्ण करता आले. सामन्यासाठी असलेला डीआरएसचा मर्यादित वापरही चौथ्या दिवशी सौराष्ट्रसाठी डोकेदुखी ठरला. पहिल्या वेळेस मैदानी पंचांनी साहाला पायचीत दिल्यानंतर तिसरे पंच एस रवी यांनी साहाला नाबाद ठरविले तर दुसर्‍या वेळी मैदानी पंचांनी नाबाद दिल्यामुळे तिसर्‍या पंचांनी मैदानी पंचांचा निर्णय कायम ठेवला. दुसर्‍या सत्राच्या आठव्या षटकात जडेजाच्या गोलंदाजीवर चॅटर्जी शॉर्ट लेगवर झेलबाद झाला. यानंतर सौराष्ट्रने दबाव वाढवला. या दबावाखाली साहा बाद झाला. मध्यमगती गोलंदाज प्रेरक मंकडचा चेंडू त्याने यष्ट्यांवर ओढवला. डावखुरा मध्यमगती गोलंदाज चेतन सकारिया याने शहाबाज अहमदला बाद करत बंगालची ६ बाद २६३ अशी स्थिती केली. दुसर्‍या सत्रात सौराष्ट्रने २८ षटकांत केवळ ४६ धावा देत ३ गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक ः सौराष्ट्र सर्वबाद ४२५, बंगाल ः ६ बाद ३५४ (सुदीप चॅटर्जी ८१, वृध्दिमान साहा ६४, अनुष्टूप मजुमदार नाबाद ५८, अर्णब नंदी नाबाद २८, प्रेरक मंकड ४५-२, धर्मेंद्र जडेजा १०६-२)