रणजी ः सेनादल ८ बाद २२८

0
115

>> हेरंबची पदार्पणातच चमक

गोव्याच्या गोलंदाजांनी काल शानदार मारा करताना सेनादलाच्या फलंदाजांना पालम-दिल्ली येथील एअरफोर्स कॉम्प्लेक्स मैदानावर कालपासून सुरू झालेल्या रणजी चषक सामन्यात सेनादलची स्थिती पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ८ बाद २२८ अशी केली आहे. गोव्याच्या हेरंब परबने पदार्पणातच ३ गडी बाद केले.
गोव्याने या सामन्यात ६ बदल केले. रिगन पिंटो, सौरभ बांदेकर, समर दुभाषी, शदाब जकाती, ऋतुराज सिंह आणि अमित यादव या गेल्या सामन्यात पंजाबविरुद्ध खेळलेल्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखविला. त्यांच्या जागी स्नेहल कवठणकर, फेलिक्स आलेमाव, कीनन वाझ, अमुल्य पांड्रेकर, हेरंब परब आणि श्रीनिवास फडते यांना संघात स्थान देण्यात आले.

सेनादलतर्फे कर्णधार नकुल शर्मा आणि विकास यादव यांनी अर्धशतके नोंदविली. गोव्याचा कर्णधार सगुण कामतने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि गोव्याच्या तेज गोलंदाजांनी सकाळच्या वातावरणाचा लाभ उठवित चांगला मारा करताना सेनादलला प्रारंभीच झटके देत ३ बाद १८ अशी स्थिती केली. हेरंब परबने चांगले चेंडू स्विंग करताना विकास मोहनला खाते खोलण्यापूर्वीच तंबूचा रस्ता दाखवित गोव्याला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर फेलिक्स आलेमावने रवी चौहानला बाद करीत सेनादलची स्थिती २ बाद १ अशी केली. शमशेर यादव जास्त वेळ खेळपट्टीवर स्थिरावू शकला नाही व अमोघ देसाईच्या गोलंदाजीवर यष्ट्यांमागे कीनन वाझकडे झेल देऊन परतला.

परंतु कर्णधार नकुल वर्मा (९ चौकारांनिशी ९१ चेंडूत ६४) आणि नवनीत सिंह (२७) यांनी चौथ्या विकेटसाठी ७७ धावांची भागिदारी केली. तर नितिन तन्वार (४३) आणि विकास यादव (४ चौकारांनिशी १४१ चेंडूत नााबद ६१) यांनी सातव्या विकेटसाठी ६७ धावा जोडत सेनादलला २००च्या पार नेले. कालच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विकास यादवच्या साथीत सच्चिदानंद पांडे (नाबाद २) खेळपट्टीवर होते. गोव्यातर्फे हेरंब परबने ३५ धावांत ३ तर फेलिक्स आलेमावने २ गडी बादे केले.

संक्षिप्त धावफलक ः सेनादल, पहिला डाव, ९० षट्‌कांत ८ बाद २२८, (नवनीत सिंह २७, शमशेर यादव १०, नकुल वर्मा ६४, नितीन तन्वार ४३, विकास यादव खेळत आहे ६१, सच्चिदानंद पांडे खेळत आहे २ धावा. हेरंब परब ३-३५, फेलिक्स आलेमाव २-६३, अमोघ देसाई १-१८, अमुल्य पांड्रेकर १-३९ बळी).