रणजी ः विदर्भ जेतेपदाच्या दिशेने

0
111

रणजी करंडक स्पर्धा जिंकण्याच्या दिशेने विदर्भने काल रविवारी भक्कम पाऊल टाकले. तिसर्‍या दिवसअखेर पहिल्या डावात ७ बाद ५२७ धावांपर्यंत मजल मारत पहिल्या डावात दिल्लीवर २३३ धावांची मोठी आघाडी घेतली. दुसर्‍या दिवसअखेर विदर्भने ४ बाद २०६ धावांपर्यंत मजल मारली होती. जाफर ६१ व अक्षय वाखारे शून्य धावांवर खेळत होते. तिसर्‍या दिवशी जाफरने संथ फलंदाजी केली. मोठ्या खेळीची जाफरकडून अपेक्षा होती. मात्र, ७८ धावांवर तो पायचीत झाला. वाखारे (१७) यालादेखील अपयश आले. अक्षय वाडकर आणि आदित्य सरवटे यांनी विदर्भाचा डाव सावरला. आदित्य सरवटेने ७९ धावांची खेळी केली. तर अक्षय वाडकरने शतक झळकावले. या दोघांनी शतकी भागीदारी रचली. मात्र ७९ धावांवर असताना नितीश राणाने त्याला ऋषभ पंतकरवी झेल बाद केले. मग सिद्धेश नेरळने वाडकरला चांगली साथ दिली आणि विदर्भाच्या संघांने पाचशेचा आकडा गाठला. दिवसअखेर सिद्धेश नाबाद ५६ तर वाडकर १३३ धावांवर नाबाद होते. तत्पूर्वी, दिल्लीचा पहिला डाव २९५ धावांत आटोपला होता.