रडीचा डाव

0
126

कॉंग्रेस आणि जनता दल (सेक्युलर) च्या ११७ आमदारांच्या सह्यांनिशी कुमारस्वामी यांनी सरकार स्थापनेचा दावा केलेला असताना कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी सर्वांत मोठा पक्ष असलेल्या, परंतु आवश्यक बहुमत नसलेल्या भारतीय जनता पक्षाचे नेते बी. एस. येडीयुराप्पा यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देऊन घोडेबाजाराला वाव दिला आहे. येडीयुराप्पा यांनी त्यांना दिलेल्या पंधरा दिवसांच्या मुदतीत आपले बहुमत सिद्ध करायचे आहे. याचाच अर्थ या पंधरा दिवसांत विरोधी आमदारांची फोडाफोडी करण्याचा परवानाच जणू राज्यपालांनी त्यांना बहाल केलेला आहे. सर्वांत मोठ्या पक्षाला सरकार स्थापनेची संधी सर्वांत प्रथम देणे हे योग्य असले तरी कॉंग्रेस आणि जेडीएसने आवश्यक बहुमत आपल्यापाशी असल्याचे पत्र आमदारांच्या सह्यांनिशी राज्यपालांकडे सुपूर्द केलेले असताना राज्यपालांनी भाजपला बहुमत सिद्ध करण्याची संधी मिळवून देणे हे पक्षपातीपणाचे वाटते. कर्नाटकमधील विद्यमान राजकीय घडामोडींनी गोव्यातील २०१७ च्या विधानसभा निवडणुकीनंतरचा घटनाक्रम आठवणे क्रमप्राप्त आहे. तेव्हा कॉंग्रेस हा सतरा जागा जिंकून राज्यातील सर्वांत मोठा पक्ष ठरला होता, परंतु राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी तेव्हा कॉंग्रेसला सत्तास्थापनेसाठी पाचारण न करता भाजप – मगो – गोवा फॉरवर्ड – अपक्ष यांच्या निवडणुकोत्तर आघाडीला सरकार स्थापनेची संधी दिली होती. गोव्यात तेव्हा कॉंग्रेस नेते आपसात नेतेपदावरून भांडत राहिले व त्यांनी सरकार स्थापनेसाठी दावाच केला नव्हता हे त्यामागील कारण असल्याचा युक्तिवाद राज्यपालांच्या त्या निर्णयाचे समर्थन करणारे करीत होते. मग आता कर्नाटकात जे घडले आहे ते काय आहे? येथे तर कॉंग्रेस – जेडीएसने सत्ता स्थापनेचा दावा रीतसर व आवश्यक बहुमताच्या पुराव्यानिशी केलेला होता. मग असे असताना भाजपला सरकार स्थापनेची संधी राज्यपालांनी देणे म्हणजे आपल्यावरील पक्षाच्या व पक्षनेत्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रकार तर नव्हे? राज्यपालपद हे निष्पक्ष घटनात्मक पद असते याचे भान त्या पदावरील व्यक्तींनी ठेवणे गरजेचे असते. मात्र, आजवर रामशास्त्री बाण्याने वावरणारे राज्यपाल राज्यांना क्वचितच लाभले आहेत. ज्याच्या कृपेने आपण राज्यपाल बनलो, त्याच्या त्या ऋणातून उतराई होऊन उपकारांचे पांग फेडण्याची धडपड त्या पदावरील व्यक्ती करतात आणि त्यातून आपण पक्षपाती ठरत आहोत आणि आपल्या पदाची अप्रतिष्ठाही करीत आहोत याचे त्यांना विस्मरण होत असते. वजुभाई वाला यांची येडीयुराप्पांना सत्तास्थापनेसाठी पाचारण करण्याची कृतीही त्यांच्या निष्पक्षपातीपणाविषयी साशंकता निर्माण करणारी ठरली आहे. येडीयुराप्पांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ ग्रहण केलेली असली तरी आता ही लढाई सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेली आहे.आज त्यासंबंधी पुढील सुनावणी होणार आहे. शिवाय विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे ती वेगळीच. सद्यपरिस्थितीत कर्नाटकात येडीयुराप्पा यांच्या भाजपाचे संख्याबळ आहे १०४. कॉंग्रेसचे ७८ आणि जेडीएसचे ३८ मिळून होतात ११६. दोन अपक्ष सदस्यांपैकी एक त्यांना येऊन मिळाल्याने त्यांची संख्या झाली ११७ आणि भाजपा आणि एक अपक्ष मिळून झाले फक्त १०५. म्हणजे भाजपाला बहुमतासाठी अजून किमान सात आमदारांची आवश्यकता आहे. आता त्यासाठी मंत्रिपदाचे आमीष दाखवले जाणार की पैशाचा पूर वाहणार हे मुकाट पाहणे तेवढे कर्नाटकच्या जनतेच्या हाती राहिले आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीचा फायदा संधिसाधू घेणारच. दोघा अपक्ष आमदारांपैकी आर. शंकर हे महाशय सकाळी येडीयुराप्पांच्या बंगल्यावर होते आणि कॉंग्रेस – जेडीएस सरकार स्थापन करणार असल्याची चाहुल लागताच दुपारी त्यांच्याकडे दाखल झाले. आता येडीयुराप्पांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाल्यानंतर कॉंग्रेसचे काही आमदार ‘बेपत्ता’ झाले आहेत. इतरांनी फुटू नये म्हणून कॉंग्रेस आणि जेडीएसने आपल्या आमदारांना रिसॉर्टमध्ये रवाना केलेले आहे. गेल्या वेळीही कर्नाटकमधील आमदारांचे तांडे गोव्यात लपवण्यात आले होते. हे लोकशाहीचे धिंडवडे आहेत. काहीही करून एकेक राज्य ताब्यात घेण्याचे सत्र भाजपाने सध्या चालवलेले आहे. गोवा, मणिपूर, मेघालयात सर्वांत मोठ्या पक्षांना बाजूला सारून भाजपाने सत्ता संपादन केली. नैतिकदृष्ट्या हे कितपत योग्य होते? परंतु सत्तेच्या धुमश्चक्रीत नीती – अनीतीचा विचार करायला वेळ आहे कोणाला? ‘कॉंग्रेसमुक्त भारता’चा संकल्प केलेल्या भाजपाने एकेक राज्य कॉंग्रेसमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालविले आहेत. परंतु लोकशाहीच्या मार्गाने हे घडले पाहिजे, लोकशाहीचा बळी देऊन नव्हे. राज्यपालांच्या कृपेने मिळालेल्या कालावधीचा फायदा घेत येडीयुराप्पांनी फोडाफोडी करून सत्ता टिकवली, तरी त्यांच्यावर अलोकशाही मार्गांनी सत्ता बळकावल्याचा कलंक लागणार आहे त्याचे काय? केंद्रात ज्याची सत्ता आणि ज्याच्या हाती राज्यपाल, त्याची अशा रडीच्या डावात सरशी होणारच, परंतु शेवटी हा रडीचा डाव होता हे कसे विसरायचे?