रजनीचे राजकारण

0
139

दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांत आता सक्रिय राजकारणात उतरणार आहे. तशी घोषणा त्याने नुकतीच केली. ‘बदलाची वेळ आलेली आहे आणि मी आज निर्णय घेतला नाही तर अपराधी ठरेन’ असे सांगत त्याने तामीळनाडूत राजकीय व्यवस्था परिवर्तनाची ग्वाही दिली आहे. अशा प्रकारचा स्वप्नाळू आदर्शवाद सहजासहजी प्रत्यक्षात उतरवायला राजकारणाचे क्षेत्र म्हणजे काही चित्रपट नव्हे हे जरी खरे असले तरी चित्रपटांच्या दुनियेत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्यावर भोवतीचे राजकारण स्वच्छ करण्याचे वायदे करून राजकारणात उतरणार्‍या आणि अभिनेत्यावरून नेता बनणार्‍यांची एक परंपराच दक्षिणेच्या राजकारणामध्ये राहिली आहे. एम. जी. रामचंद्रन, करुणानिधी, जयललिता, विजयकांत, शिवाजी गणेशन अशा अनेकांनी आजवर वेळोवेळी राजकारणाची धूळ मस्तकाला लावली. यातल्या काहींनी चित्रपटांच्या दुनियेत गाठलेली उत्तुंगता राजकारणातही गाठली. प्रतिमापूजनात अग्रणी असलेल्या तामिळी जनतेला अशा प्रकारच्या ‘महा’ व्यक्तिमत्त्वांची गरज असते. त्यांच्या माध्यमातून आपली स्वप्नपूर्ती होईल अशी आशा ही जनता बाळगून असते. त्यामुळे एखाद्याविषयीचे पराकोटीचे प्रेम मग कोणत्या थराला जाईल काही सांगता येत नाही. रजनीकांत तर त्याच्या साधेपणामुळे जनतेच्या गळ्यातला ताईत आहे. आजवर तो राजकारणात कधी प्रत्यक्ष उतरला नाही, परंतु कधी जयललितांना मते देऊ नका असे मतदारांना सांगत त्याने द्रमुकच्या विजयाचा मार्गही सुकर करून दिला होता, तर कधी पीएमकेने आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळे आणल्याने त्या पक्षाविरुद्ध त्याने एल्गार केला होता. परंतु त्यावेळी काही वैयक्तिक कारणे त्यामागे होती. आता मात्र तामीळनाडूच्या जनतेचे हित डोळ्यांसमोर ठेवून आपण राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्याचे म्हणणे आहे. रजनीकांतच्या राजकारण प्रवेशाला सध्याची वेळ सर्वांत योग्य आहे यात शंकाच नाही. तामीळनाडूचे राजकारण आजवर अभाअद्रमुक आणि द्रमुक या दोन द्रविडी राजकीय पक्षांभोवती फिरत राहिले. जनतेने आलटून पालटून त्यांना सत्ता दिली. जयललिता यांच्या निधनानंतर अभाअद्रमुकमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली. ओ. पनीरसेल्वन आणि ई. पलनीस्वामी यांच्यातील संघर्ष, मग शशिकला गटाला दूर ठेवण्यासाठी झालेली दिलजमाई, नुकत्याच झालेल्या आर. के. पुरमच्या पोटनिवडणुकीत टीटीके दिनकरन यांनी मारलेली बाजी या सगळ्या घटनाक्रमातून अभाअद्रमुकमध्ये अस्वस्थता आहे. दुसरीकडे, द्रमुकचे सर्वेसर्वा करुणानिधी वयोमानपरत्वे दुखण्यांनी जर्जर झाले आहेत. त्यांचा राजकीय वारसदार एम. के. स्टालीन आर. के. पुरमच्या निवडणुकीत काही प्रभाव दाखवू शकला नाही. त्यामुळे अभाअद्रमुक आणि द्रमुक या दोहोंना तिसरा पर्याय निर्माण करण्यासाठी कोणी पुढे येत असेल तर जनता त्याचा विचार करू शकते. त्यात ते जर रजनीकांतसारखे ‘थलायवा’ व्यक्तिमत्त्व असेल तर मग बोलायलाच नको. परंतु राजकीय पक्ष चालवणे म्हणजे खायची गोष्ट नव्हे. त्यासाठी केवळ समर्थकांचे बळ असून चालणार नाही. प्रचंड पैसा लागेल, संघटनात्मक बांधणी लागेल, ध्येयधोरणे ठरवावी लागतील. या सगळ्याची तयारी करण्याआधीच रजनीकांत तर २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत २३४ जागा लढवण्याची घोषणा करून बसला आहे. यामागे त्याचे कोणते आडाखे आहेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी चेन्नईत रजनीकांतची भेट घेतली होती. तो भाजपात जाणार असल्याच्याही वावड्या उठल्या होत्या, परंतु भाजपसारख्या हिंदी आणि हिंदुत्व केंद्रस्थानी असलेल्या पक्षाला तामीळनाडूच्या जनतेने आजवर नाकारले आहे. त्यामुळे थेट भाजपमध्ये न जाता, परंतु भाजपची पडद्यामागील साथ घेऊन तामीळनाडूतील अभाअद्रमुक आणि द्रमुकशी टक्कर रजनीकांतचा पक्ष घेऊ शकतो. भाजपाची दक्षिण दिग्विजयाची मनीषा आजवर स्वप्नच राहिली आहे. कर्नाटकात एकदा सरकार स्थापन करण्याचे स्वप्न भाजपला साकारता आले. तामीळनाडूमध्ये मात्र खाते खोलण्याव्यतिरिक्त पुढे जाता आलेले नाही. रजनीकांत हा त्यासाठी आयता घोडा ठरू शकतो. दुसरीकडे कमल हसननेही राजकारणात उतरण्याची घोषणा केलेली आहे, परंतु रजनीकांतचा सार्वजनिक करिष्मा अधिक आहे. आता गावोगावी आपल्या चाहत्यांचे संघ उभे करण्याचा मनोदय त्याने व्यक्त केला आहे. म्हणजे एम. जी. रामचंद्रन यांच्या प्रमाणे लक्षावधी कार्यकर्त्यांचे संघटन उभारण्याचा प्रयत्न तो करणार आहे. तामीळनाडूच्या जनतेला चांगले सरकार देऊ आणि तीन वर्षांत ते जमले नाही तर राजकारणसंन्यास घेऊ असेही तो म्हणाला. रजनीकांतचे इरादे तर नेक आहेत. परंतु स्वप्न आणि वास्तव यामध्ये जे अंतर असते, ते तो कसे पार करणार हा प्रश्न शिल्लक उरतोच.