रचिला ज्याचा पाया त्याची बरी उभारणी झाली

0
132

मॅन मेड मिरॅकल- १

– सुरेश वाळवे

आजवर हजारो गोमंतकीयांनी सिंगापूरला भेट दिली असेल अन् डझनावारी लेखकानी त्यावर प्रवासवर्णन स्वरूप लिहिलेही आहे. पण वेगळ्या दृष्टिकोनातून केलेले हे लेखन असून त्या चिमुकल्या बेटाच्या विकासाचे शिल्पकार ली क्वां यू यांनी हा चमत्कार कसा घडवून आणला, त्याची ही अलौकिक गाथा. आपल्या सर्वच राज्यकर्त्याना मार्गदर्शनस्वरूप ठरणारी.

बाणसाय- कुडचड्याचे वाचकमित्र मारुती व श्रीवल्लभ या करमलीबंधूंनी तीनेक महिन्यांपूर्वी ली क्वां यू यांचे ‘फ्रॉम थर्ड वर्ल्ड टु फर्स्ट’ हे सातशे पानी आत्मचरित्र वाचायला दिले अन् सिंगापूरदर्शनाचा जणु ध्यासच लागला. एक नेता केवढे परिवर्तन घडवून आणू शकतो, त्याचे प्रत्यंतर सिंगापूरभेटीत झाले. आजवर या ‘सिटी स्टेट’बद्दल केवळ ऐकून होतो; त्याच्या चार दिवसीय दर्शनानंतर ‘हॅट्‌स ऑफ टु ली’ असेच उद्गार निघाले. आता आग्नेय आशियाला जाता आहात तर केवळ एका देशाचा दौरा का करता? थायलंड, मलेशियापण उरकून घ्या, हा दोस्तांचा सल्ला मानून पट्टाया-बँकॉक व कुआला लुंपूरदेखील झाले.
भारताच्या तुलनेने हे तिन्ही देश भौगोलिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीने छोटे असतील; परंतु विकासाच्याबाबतीत ते आपल्यापुढे किमान पंचवीस वर्षे आहेत, याची प्रचिती आली. थायलंड तर केवळ सेक्स टुरिझमसाठी कुप्रसिद्ध आहे. परंतु रस्ते, वाहतूक, इतर साधनसुविधा, दरडोई उत्पन्न आणि एकूणच राहणिमानाचा विचार करता फार संपन्न वाटले. बँकॉकमध्ये थोडी झोपडपट्टी आहे. परंतु ती तशी दुर्लक्षणीय म्हणता येईल. सार्वजनिक स्वच्छता, टापटीप युरोपसारखी. माणसे खाऊनपिऊन सुखी वाटली. तिन्ही राष्ट्रांचे वैशिष्ट्य म्हणजे रस्त्यावर ट्रॅफिक पोलीस दिसत नाहीत तरी सारे काही शिस्तीत चालते. गुह्यांचे प्रमाण मलेशिया आणि सिंगापूरमध्ये नगण्य म्हणता येईल, इतके कमी आहे. मलेशिया हा जगातला क्रमांक एकचा पामतेल उत्पादक देश. विमानातून म्हणा वा कुआला लुंपूर ते सिंगापूर हे सुमारे सहाशे कि.मी. अंतर सहापदरी सडकेवरून कोचने सहा तासात कापताना दुतर्फा दर्शन घडते ते नेत्रसुखद हिरवाईचे. अन् ही हिरवाई तरी किती? ८५ टक्के ‘ग्रीन कव्हर.’ फारसा चर्चेत नसणारा मलेशिया एवढा पुढे गेलेला असेल, असे वाटले नव्हते. पण त्याची प्रगती पाहून तोंडात बोटे गेली. पुत्रजय ही प्रशासकीय राजधानी तर फर्मासच आणि ‘गंटिंग हायलँड्‌स’ हा एका धनाढ्य चिनी माणसाने घडवून आणलेला चमत्कार. सहा हजार फूट उंचीवरील पर्वतशिखरावर त्याने केबल कारची केलेली योजना अचंबाजनक.
पण खरा चमत्कार सिंगापूरचे प्रधानमंत्री ली यांनी घडवून आणलेला. अ मॅन मेड मिरॅकल, या चार शब्दात त्याचे वर्णन होऊ शकते.
६५० चौरस कि.मी.देखील क्षेत्रफळ नसलेले हे राष्ट्र. (गोव्याचे क्षेत्रफळ ३७०२ चौ. कि.मी.) साक्षरता १०० टक्के. इंग्लिश, मंदारिन (चिनी), मलाय आणि तामीळ या भाषा बोलल्या जातात अन् त्याना अधिकृत दर्जा आहे. ५५ लाख लोकसंख्येमुळे दर चौरस कि.मी.ला सातेक हजार लोक असे प्रचंड प्रमाण पडते. सिंगापुरात बाकी सार्‍याची रेलचेल आहे, परंतु वानवा जागेची. त्यामुळे निवासाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी गगनचुंबी इमारती उभारण्याखेरीज पर्याय राहिलेला नाही. हॉटेलातील खोल्यासुद्धा इतक्या छोटुकल्या की, दोन माणसाना कसरत करीतच वावरावे लागते. ली यानी बंधनच असे घातले की, इमारती, बंगले, घरे उभी/उंच हवी तेवढी बांधा; आडवा विस्तार करायला बंदी. १९६५ साली, वयाच्या अवघ्या ४२व्या वर्षी ली यांच्यावर एका नवस्वतंत्र राष्ट्राच्या उभारणीची जबाबदारी येऊन पडली ती अकस्मात. दोन वर्षांपूर्वी सिंगापूर हा मलेशिया संघराज्याचा भाग होता. परंतु धोरणविषयक मतभेद इतके विकोपाला गेले की, मलेशियाने सिंगापूरला झटकूनच टाकले. उद्यापासून तुला दरवाजे बंद, असे म्हणून बापाने घराबाहेर काढलेल्या निराश्रित पोराची जी अवस्था होईल, आक्शी तसे सिंगापूरचे झाले. अर्थात सिंगापूरला हे स्वातंत्र्य नको होते, असे नव्हे. पण देश त्यास मानसिक वा अन्य कोठल्याही दृष्ट्या तयार नव्हता, हे कटू वास्तव होते. सर्वात प्रथम म्हणजे स्वतंत्र राष्ट्र म्हणून जागतिक- त्यात अर्थातच युनोही आला- मान्यता मिळविणे. ‘स्वतंत्र’ सिंगापूरपाशी सैन्य नव्हते. ज्या दोन तुकड्या होत्या, त्या मलेशियन ब्रिगेडियरच्या हुकमाखाली. मग राष्ट्ररक्षण सोडाच, कायदा व सुव्यवस्था तरी कशी सांभाळायची? सिंगापूरला स्वातंत्र्य देण्यास मलेशियात काहींचा विरोध होता. त्यानी दहशतवादी कारवाया आरंभल्या, तर! कारण पोलीससंख्याही अपुरी होती. या सार्‍या चिंताजनक परिस्थितीला ली यानी धैर्याने तोंड तर दिलेच; पण एकेक सहकारी निवडले ते विश्‍वासू, कार्यक्षम, ध्येयवादी आणि जिवास जीव देतील असे. प्रत्येकावर एकेक जबाबदारी सोपवली अन् त्यानी ती निष्ठेने पार पाडली, म्हणून ली यशस्वी होऊ शकले. मात्र सारी सोंगे आणता येतात; पैशाचे काय? जनता हवालदिल बनणे परवडणारे नव्हते. तिला आशेचा दीप दाखवणे आवश्यक होते. तो तर दूरवरही दिसत नव्हता! १४ टक्के जनता बेरोजगारीच्या वरवंट्याखाली भरडून निघत होती. या हाताना काम काय द्यायचे? इंडोनेशिया, मलेशिया हे शेजारी देश व्यापारउदिमाच्या बाबतीत फटकून वागत होते. जणु उपासमारीची पाळी आली असती. पुन्हा कम्युनिस्ट मलाई अतिरेक्याना सडेतोड उत्तर द्यायचे होते, ते तर वेगळेच. अशा वेळीही ली यांच्या पाठीशी होता तो सिंगापुरी जनतेचा विश्‍वास. आपल्या प्रजेचे वर्णन ते ‘कष्टाळू, काटकसरी आणि नेहमी शिकण्यास तत्पर’ या शब्दात करतात. आणखी एकच गोष्ट त्याना अनुकूल होती- मोक्याच्या जागेचे उत्कृष्ट नैसर्गिक बंदर. सिंगापूरचे बहुभाषिक, बहुधर्मीय, बहुसांस्कृतिक वैशिष्ट्य जपत त्याला या गर्तेतून वर काढणे हे महाकठीण काम होते. तेव्हा जेमतेम वीस लाख लोकसंख्या होती. पण तिला सुरक्षित वातावरण आणि उदरनिर्वाहाची साधने कशी पुरवायची, या घोरामुळे ली यांचा रात्ररात्रभर डोळा लागत नसे. झोपेच्या गोळ्या घ्यायची पाळी आली होती. याच दरम्यान शेजारील इंडोनेशियात कम्युनिस्टवादी लष्करी अधिकार्‍यानी बंड करून सहा सेनाधिकार्‍याना कंठस्नान घातले होते. झोप पुरती उडायला हे कारण पुरेसे होते. आम्हाला सैन्यउभारणी- प्रशिक्षणात मदत/मार्गदर्शन करा, अशी विनंतिपत्रे ली यानी दोन राष्ट्राना पाठवली होती. त्यात एक होता भारत आणि दुसरा इजिप्त. प्रधानमंत्री लालबहादुर शास्त्री होते. त्यानी सिंगापूरला शुभेच्छापत्र पाठवले; परंतु त्यांच्या विनंतीवर विचार करण्याचेही आश्‍वासन नव्हते. दुसरे राष्ट्रपती नासेर. त्यानी आपल्या पत्रात सिंगापूरला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली; पण नौदल उभारणीसाठी सक्षम सल्लागार पाठविण्याच्या विनंतीकडे दुर्लक्षच केले. मलेशियाला वाईट वाटू नये, म्हणून भारताने आपली मागणी मान्य केली नसावी, असे ली म्हणतात. शेवटी त्यानी एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला. इस्रायली मदतीचा. सिंगापूर व मलेशियातील मुस्लिम नाराज होऊ नयेत म्हणून (इस्रायल व अरब यांचे हाडवौर सर्वज्ञात आहे) त्याना ‘मॅक्सिकन’ संबोधून सिंगापूरला आणले अन् अशा प्रकारे सैन्यप्रशिक्षण सुरू झाले. सिंगापूरमधील मलायी ब्रिगेडियर बंड पुकारून ली तथा त्यांच्या सहकार्‍यांना कैद करता, तर! तो धोका डोक्यावर टांगत्या तलवारीसारखा होता. पुन्हा सिंगापुरी सैनिक व पोलिसात मूळ मलायींचा मोठा भरणा होता. त्यांची निष्ठा मलेशियाशी असली, तर! म्हणून अधिकाधिक चिनी व भारतीयांच्या भरतीचा निर्णय जाणीवपूर्वक घेऊन वरील धोका टाळण्यासाठी पाऊल उचलले गेले. अशा प्रकारे लष्करउभारणीचा श्रीगणेशा झाला अन् स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी प्रशिक्षणार्थींचे जोरदार संचलन घडवून जनतेला विश्‍वास देण्याचा प्रयत्न झाला. त्याशिवाय सक्षम जनतेला एनसीसीप्रमाणे थोडेफार सैनिक शिक्षण देण्याचाही निर्णय झाला. पहिल्या तुकडीत ९ हजार विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली. इस्रायली अधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली सैन्यउभारणी मार्गाला लागली. गोव्यात ज्याप्रमाणे सैनिकी पेशाविषयी अरुची आहे, तशीच ती सिंगापुरी जनतेत होती. म्हणून ली यानी काय करावे? त्यानी सैन्यभरतीच्यावेळी छोटेखानी समारंभ आयोजिले. मंत्र्यांना पाठवले, भाषणे केली. राष्ट्रोभारणीचा हाही एक विषय आहे, अशी सर्वसामान्यात भावना रुजवली. भविष्यात तिचा उत्तम परिणाम दिसून आला. धडाक्यात सारे घडवायचे, हा दृष्टिकोन बाळगताना सदैव सावधगिरी बाळगली.
सुरुवातीच्या काळात सिंगापूरमध्ये मलायी आणि चिनी यांच्या दंगली झाल्या. त्यांचे दूरगामी परिणाम होतील, या भीतीने त्या कठोरपणे थांबवण्यात आल्या. दोन्ही वंशातील दरी रुंदावत चालली होती. हे भविष्यात धोकादायक ठरेल, म्हणून ली सरकारने प्रतिबंधात्मक पावले उचलली.
सिंगापूर स्थापनेच्या दीडशेव्या वर्धापनदिनी राष्ट्रकुलाच्या पाच संरक्षणमंत्र्यांना सन्मानाने बोलावून त्याना सैन्यशक्तीचे दर्शन घडविण्यात आले. खास करून मलेशियाकरिता. चिलखती दल, रणगाडे यांची परेड बघून पाहुणे चकित तर झालेच; शिवाय सिंगापूरने हे कधी अन् कसे साधले, या बुचकळ्यातही पडले. विशेषतः मलेशियावर त्याचा अधिक परिणाम झाला. कारण त्याच्यापाशी तोवर रणगाडेच नव्हते. चिमुकल्या सिंगापूरला धाकात ठेवणे यापुढे जमणार आणि परवडणार नाही, याची खात्री पटल्याने कुआला लुंपूरने आपली दादागिरी थोडी कमी केली. पण सैन्यप्रशिक्षणाच्या बदल्यात सिंगापूरने इस्रायलला मान्यता द्यावी, याकरिता तेल अविवकडून सतत दबाव येऊ लागला. परंतु अरब आणि पॅलेस्टिनींविषयी सहानुभूती असणार्‍या सिंगापुरी मलायी मुस्लिमाना दुखवून चालले नसते. १९६७ साली अरब-इस्रायल युद्ध झाले तेव्हाही छोट्या राष्ट्रांच्या हक्काच्या बाजूने सिंगापूर ठामपणे उभा राहिला. तरी तेल अविवने संबंध तोडले नाहीत, हे विशेष!
राष्ट्रउभारणीत विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची असते, हे जाणून ली यानी हुशार मुलाना ऑक्सफर्ड, केंब्रिज आदी नामवंत ब्रिटिश विद्यापीठात शिष्यवृत्त्या देऊन पाठवले. लष्करांतर्गत विविध विषयात पारंगत बनून ते परततील, यासाठी हमिपत्र (बॉंड) लिहून घेण्यात आला. त्यांचा संपूर्ण खर्च सरकार करायचे. २५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर १९९० साली ली राजकारणातून निवृत्त झाले, तेव्हा सिंगापुरी सैन्यदलानी बर्‍यापैकी लौकिक मिळवला होता. १९६५ साली ज्या देशापाशी धड दोन हजार सैनिक नव्हते, तेथे आता तिन्ही सेनादले सुसज्ज झाली होती. एका माणसाच्या दूरदृष्टीमुळे हा कायापालट घडला होता. ली यांची ही जिद्दपूर्ण कहाणी सिंगापूरच्या आजच्या यशाची गाथा ठरली आहे. ती अशीच पुढील काही लेखांकात वाचकांच्या भेटीस येईल.
(क्रमशः)