रंकीरेड्डी-पोनप्पाचा सनसनाटी विजय

0
114

>> सायना नेहवालचे विजयी पुनरागमन

भारताच्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी व अश्‍विनी पोनप्पा यांनी काल बुधवारी थायलंड ओपन बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर ‘सुपर ५००’ स्पर्धेत मिश्र दुहेरी प्रकारात धक्कादायक निकालाची नोंद करताना मलेशियाच्या पाचव्या मानांकित चान पेंग सून व गोह लियू यिंग यांचा २१-१८, १८-२१, २१-१७ असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. पाचव्या मानांकित किदांबी श्रीकांत याने चीनच्या रेन पेंग बो याचा कडवा प्रतिकार २१-१३, १७-२१, २१-१९ असा मोडून काढला. एच.एस. प्रणॉयने हॉंगकॉंगच्या वॉंग विंग की व्हिन्सेंटला २१-१६, २२-२० असे सरळ गेममध्ये बाहेरचा रस्ता दाखविला.

पारुपल्ली कश्यपने पहिला गेम गमावल्यानंतर जोरदार खेळ दाखवत इस्रायलच्या मिश्‍चा झिल्बरमन याला १८-२१, २१-८, २१-१४ अशी धूळ चारली. बी. साई प्रणिथने यजमान देशाच्या कांताफोन वांगचारोईन याला १ तास ११ मिनिटे लांबलेल्या मॅरेथॉन लढतीत १७-२१, २१-१७, २१-१५ असा दणका दिला. अव्वल मानांकित केंटो मोमोटाने माघार घेतल्यामुळे शुभंकर डे याला पुढे चाल मिळाली.
महिला एकेरीतील भारताचे आव्हान कायम राखण्याचे काम सायना नेहवालने केले. सातव्या मानांकित सायनाने थायलंडच्या फित्तायापोर्न चायवान हिला २१-१७, २१-१९ असे नमवून आगेकूच केली.

सौरभ वर्मा, साई उत्तेजिता राव चुक्का, समीर वर्मा यांना मात्र गाशा गुंडाळावा लागला. सौरभला जपानच्या सातव्या मानांकित कांता त्सुनेयामा याने २३-२१, १९-२१, २१-१५ असे पराजित केले. पहिला गेम जिंकून आघाडी घेतल्यानंतर सौरभने अटीतटीचा दुसरा गेम गमावला. तिसर्‍या गेममध्ये मात्र तो पुरता निष्प्रभ ठरला. चीनच्या चेन शियाव शिन हिच्यासमोर चुक्का हिची डाळ शिजली नाही. शिनने हा सामना २१-१७, २१-७ असा खिशात घातला. आठव्या मानांकित समीर वर्माचा पराभव अनपेक्षित ठरला. मलेशियाच्या ली झी जिया याने समीरला २१-२३, २१-११, २१-५ असे पराजित केले.