यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति…

0
252

– प्रा. रमेश सप्रे
आपण एक मजेदार खेळ कधी न कधी खेळलेलो असतो. रस्सीखेच (टग ऑफ् वॉर्). दोन बाजू एकमेकांना ओढत असतात परस्पर विरुद्ध दिशेनं. जोपर्यंत दोन्ही बाजू समतुल्य म्हणजे सारख्याच शक्तीच्या असतील तोपर्यंत कोणीच कोणाला ओढत नाही. समतोल, संतुलन साधलेलं असतं. आपल्या मनाचं असंच असतं. आशा-निराशा; सुख-दुःख, होकार-नकार अशा द्वंद्वांची रस्सीखेच सतत चालू असते. कोणत्या बाजूनं आपण ओढले जाणार हे बुद्धीच्या मनावरील नियंत्रणावर अवलंबून असतं. अशा परिस्थितीत जो स्थिर राहतो आणि कोणत्याही बाजूला खेचलो गेलो तरी शांत तृप्त असतो तो खरा ज्ञानी नि तोच आदर्श भक्त!काया-वाचा-मन अशा सर्व पातळ्यांवर द्वंद्वांना सामोरं जावं लागतं. शरीराच्या पातळीवरील द्वंद्वं ही इंद्रियांशी निगडीत चांगली-वाईट चव (रुची) हे जिभेच्या अनुभवाला येणारं द्वंद्व आहे. अन्नाला पूर्ण ब्रह्म मानणारा भक्त पदार्थात मीठ, साखर, तिखट विसरलं गेलं तरीही सारं आनंदात खात राहतो. ‘फणसाची भाजी माझ्या श्यामला आवडते’ या विचारात गुंग झाल्यामुळे भाजी अळणी झाली. मीठ घालायचं राहूनच गेलं तरीही श्यामच्या वडलांनी ‘राजमान्य’ (राजालाही आवडेल अशी) भाजी झालीय म्हणून मिटक्या मारत पुन्हा पुन्हा खाल्ली. त्यांचं पाहून मुलांनीही तसंच केलं. आई जेवायला बसल्यावर पहिल्या घासालाच भाजी अळणी लागल्यानं आपल्या हातून मोठी चूक घडली या अपराधी भावनेनं आईला खूप दुःख झालं. हे सारं पाहून श्यामला (साने गुरुजींना) आयुष्यभर ठरवता आलं नाही की आपल्या चुकीबद्दल हळहळणारी ‘आई श्रेष्ठ’ की आईची चूक पोटात घालून आनंदात जेवणारे ‘बाबा महान’ याचा निर्णय आयुष्यभर करता आला नाही.
हा तसा साधाच प्रसंग पण आवड-नावड हे द्वंद्व जीवनातून गेलं की निवडीचा ताण व त्यातून होणारा मनस्ताप टळतो. अखंड आनंदात राहता येतं अन् हेच खरं जीवनाचं अंतिम ध्येय!
शरीराच्या द्वंद्वांना प्रतीकात्मक अशा शीत-उष्ण यांनी ओळखलं जातं. ज्ञानेश्‍वरांचा या संदर्भातला अनुभव केवळ असामान्य आहे. सार्‍या इंद्रियांना असं वळणच (सवय) लावलंय की जगात असत्य-अशिव-असुंदर असं काही नाहीच. नसतंच! अखंड अनुभव येत राहतो तो सत्य-शिव-सुंदराचा! याला म्हणायचं दिव्य जीवन (डिव्हाइन लाइफ).
यानंतर विचार करायचा तो मानसिक द्वंद्वाचा. याचं प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे सुख (प्लेजर) नि दुःख (पेन)! मनाच्या पातळीवर अनेक अनुभवांना, क्रियाप्रक्रियांना जी प्रतिक्रिया असते ती सकारात्मक किंवा नकारात्मक असते. यातूनच सुख-दुःखाचा प्रत्यक्ष अनुभव येत राहतो. सकारात्मकतेतून सुख निर्माण होते तर नकारात्मकतेतून दुःखाची निर्मिती होते. याच्या म्हणजे सुखदुःखाच्या पलीकडे असतो तो आनंद! कश्शावरही अवलंबून नसलेला, आपल्या आतून बाहेर उसळणार्‍या आनंदाचा अनुभव म्हणजे प्रत्यक्ष आनंदच! आद्य शंकराचार्यांचं ‘कौपीनपंचक’ नावाचं स्तोत्र आहे. त्यात पुनःपुन्हा आश्‍चर्य ठासून सांगतात – ‘कौपीनवंतः खलु भाग्यवंतः’ याचा अर्थ सार्‍या वैभवांचा, उपभोगांचा त्याग करून फक्त लंगोटी घालून रानात जाऊन आनंदात राहावं. आचार्यांना एकच सुचवायचंय की कितीही प्रतिकूल, हलाखीची परिस्थिती आली तरी खरा भाग्यवान तोच ज्याच्या मनाचं समाधान कायम टिकतं.
याहीपेक्षा सूक्ष्म द्वंद्व असतं बुद्धीच्या पातळीवर. मान-अपमान! मान कोणता नि अपमान कोणता याचा निर्णय बुद्धी घेते. जीवनातील प्रसंगांचा अर्थ लावणं (इंटरप्रिटेशन) हेही बुद्धीचंच काम असतं. तुकोबांची गाढवावर बसवून गळ्यात चपलांची माळ अडकवून धिंड काढली. त्यांच्या शत्रूंना तुकोबांचा अपमान करायचा होता पण तुकोबांना तो सन्मानच वाटला. धिंड काढणार्‍यांना त्यांनी विनंती केली- ‘ही वरात आमच्या घरावरून न्या. आमच्या दुसर्‍या पत्नीला डोळे भरून पाहू दे. कारण दुसरं लग्न असल्यानं अगदी साध्या पद्धतीनं पार पडलं. वरातीत घोड्यावर बसून आलेल्या नवर्‍याची मिरवणूक माझ्या पत्नीनं पाहिलीच नाही. आख्यायिका असं सांगते की रूबाबात तुकोबा गाढवावर बसून घरासमोर आल्यावर दुसरी पत्नी जिजाऊ (आवली) हिनं नम्र भावनेनं नमस्कार केला. पुढे विचारल्यावर म्हणाली, ‘मला तुम्ही गरुडावर बसलेले दिसत होता. जणु दुसरे विष्णूच!’ द्वंद्वाच्या पलीकडे जाणं हाच खरा चमत्कार आहे जो विचारपूर्वक निर्धारानं केलेल्या वर्तनातून घडून येतो. अनन्यनिष्ठा भगवंतावर हवी. स्वतःवर नकोच!
म्हणजे शीत-उष्ण, सुख-दुःख, मान-अपमान यासारखी द्वंद्व आपल्या मानण्यावर, मन-बुद्धीच्या अनुभवावर अवलंबून असतात. आपण त्यांच्या पलीकडे विचार करून जाऊ शकतो. असो.
भगवंताचं हे आवडतं समुपदेशन आहे. निरनिराळे शब्द वापरून, उदाहरणं देऊन ते हाच महत्त्वाचा बदल आपल्या दृष्टी-वृत्तीत घडवून आणण्यासाठी अभ्यास केला पाहिजे. भगवंताचा तसा आग्रहच आहे.
भक्ताची आणखी कोणती लक्षणं भगवंत पुढे सांगताहेत-
‘यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति|
शुभाशुभपरित्यागी भक्तिमान् यः स मे प्रियः॥
आजच्या सर्व वयोगटातील व्यक्तींना अत्यंत उपयुक्त समुपदेशन, मार्गदर्शन भगवंत करताहेत.
१. यः न हृष्यति – याचा शब्दार्थ न पटण्यासारखा आहे. ‘जो कधीही हर्षित होत नाही, तो माझा प्रिय भक्त आहे’, असं भगवंत कसं म्हणू शकतात? कारण आनंद होणं ही सामान्य माणसाची सामान्य प्रतिक्रिया आहे. तो आनंद व्यक्त करायचा नाही तर मग काय करायचं? असा विचार आपल्या मनात येईल. भगवंतांना सुचवायचंय की थोड्या थोड्या गोष्टीनं आनंदानं फुगून जाणं चुकीचं आहे. कारण ‘सुख सुख म्हणता हे दुःख ठाकून आले|’ हा अनुभव आपल्याला अनेकदा येत असतो. एकदम उडायचं नि मनाविरुद्ध काही घडलं की एकदम बुडायचं हे दोन्ही चुकीचं आहे. संतुलन सांभाळणं महत्त्वाचं आहे.
आपण हल्ली थोड्या थोड्या यशाबद्दल ‘पार्टी’ मागतो. ‘गेट टुगेदर’ साजरं करतो, ‘सेलेब्रेट’ करतो. ही जणू आपली नवी संस्कृती बनू पाहतेय. याचा परिणाम युवापिढी कळतनकळत देहाच्या भोगांच्या आहारी जातेय, व्यसनाधीन होतेय. मनाविरुद्ध घडलं की एकांतिक कृती करण्याची वृत्ती वाढतेय.
२. यः न द्वेष्टि – राग-द्वेष हे सनातन द्वंद्व आहे. ‘राग’ म्हणजे अनुराग, आवड, प्रेम! आपल्याला अनेक गोष्टींचं हल्ली वावडं (ऍलर्जी) असतं. आपल्या नावडी अत्यंत तीव्र असतात. अन्नपदार्थ, वापरायच्या वस्तू, आजुबाजूच्या व्यक्ती यांच्याबद्दल आपल्या हवं-नकोच्या प्रतिक्रिया कशाचाही व कुणाचाही द्वेष करत नाही. तो अगदी जवळ जाऊन कोणाचा अतिस्विकारही करत नाही नि कुणापासूनही खूप दूर जाऊन कोणाचा धिःकारही करत नाही.
ज्यांचा आपण द्वेष करतो त्यांच्याबद्दलची नकारात्मक भावना आपलंच नुकसान करत असते. ‘आनंद साधना’ या आपल्या आध्यात्मिक आत्मचरित्रात सांगितलेला एक प्रसंग मार्मिक आहे. –
एका गुरुपौर्णिमेच्या पहाटे श्रीगोंदवलेकर महाराजांनी सांगितलेलं नाम घेत, ध्यान करत असताना मनात एक विचार आला की आपण कुणाचा मत्सरद्वेष करतो का? या प्रश्‍नाचं आतून निश्चित उत्तर आलं की ‘नाही, आपण कुणाचाही द्वेष करत नाही.’ मग ‘आपला कोण द्वेषमत्सर करत असेल का?’ हा दुसरा विचार मनात आला. अन् दोन व्यक्तींची नावं समोर आली.
गु. बाबांनी त्याच दिवशी त्या दोघांकडे जाऊन त्यांना नमस्कार करून त्यांच्या मनात जर द्वेषभावना असेल तर ती सोडून द्यावी. जर काही अपराध घडला असेल तर त्यांनी क्षमा करावी अशी प्रार्थना केली. एकानं मनापासून क्षमा केली, दुसर्‍यानं गु. बाबा नमस्कार करु लागल्यावर आपले पाय मागे घेतले. आपल्या त्या नमस्कार करून क्षमा मागण्याच्या कृतीनं बाबांच्या मनातून मात्र द्वेषभावनाच नव्हे तर द्वेषभावनेचा विचारसुद्धा कायमचा हद्दपार झाला. अशा कृतीमुळे मन मोकळं होतं अन् अशा मनात परमेश्‍वराची भक्ती छान सुरू राहते.
३. न शोचति – खरा भक्त उगीच कशाचाही विचार करत नाही नि शोकही करत नाही. गीतेच्या आरंभी भगवान अर्जुनाला ‘न त्वं शोचितुमर्हसि’ असं वारंवार सांगतात. कारण नको त्या गोष्टीबद्दल नको तो विचार करून अर्जुन युद्ध टाळू पाहत असतो.
‘न शोचति’ याचा अर्थ विचारच करायचा नाही. दुःखच करायचं नाही असा नाही तर यांचा अतिरेक टाळायचा. प्रमदादास मित्रांकडे काशीला स्वामी विवेकानंद वेदांताचा म्हणजे ज्ञानमार्गाचा अभ्यास करत होते. स्वामीजींसारखा बुद्धिमान विद्यार्थी आपल्याला लाभला म्हणून प्रमदादास स्वतःला धन्य समजत होते. पण त्याचवेळी स्वामीजींचे एक गुरुबंधु हिमालयात अत्यंत आजारी – अत्यवस्थ असल्याचं त्यांना समजलं. त्यांच्या डोळ्यातून ती वार्ता ऐकून अश्रू ओघळू लागले. यावर वाईट वाटून प्रमदादास म्हणाले, ‘अरेरे, मला वाटलं तू खरा ज्ञानी आहेस पण पाहतो तर तूही सामान्य प्रापंचिकाप्रमाणे मुळुमुळू रडतोयस्! यावर स्वामीजी ताडकन् उद्गारले, ‘वेदांती माणूस म्हणजे काय पाषाहृदयी असतो? निर्दय, निर्मम असतो? त्यालाही भावना असतात. उलट त्याचं मन अतिविशाल झालेलं असतं. सार्‍या जगातील दुःखाचं प्रतिबिंब त्याच्या मनात पडत असतं. एकच महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याच आसवांच्या पुरात तो वाहून जात नाही. त्याच्या भावनांवर त्याचं पूर्ण नियंत्रण असतं. – खरंच ‘न शोचति’चा अर्थ असा आहे.
४. न कांक्षति – भक्त उगीच कशाची इच्छा करत नाही. असंख्य कामना असलेल्या अतिसामान्य माणसापेक्षा खर्‍या भक्ताला किमान कामना असतात. इच्छा, कामना, वासना या तशा कधीही पूर्णपणे न शमणार्‍या असतात. ययातीचा याबाबतचा संदेश स्पष्टच आहे. केवळ मनाला वाटणार्‍या कामना पूर्ण करून आपलं केव्हाही भागत नाही. त्यावर बुद्धीचं नियंत्रण हवंच. पूर्ण निष्काम होणं फक्त कल्पनेतच शक्य आहे. पण प्रत्येकाच्या मातेची मुलाबद्दलची अपेक्षा, कामना, इच्छा अगदी कमीतकमी असते. जवळजवळ आकांक्षा नसलेल्या व्यक्तीचं उदाहरण द्यायचं झालं तर आईचंच द्यावं लागेल. मुलांचं सारं सारं करते याच्या बदल्यात प्रत्यक्ष कामना नसतेच.
५. शुभाशुभपरित्यागी – कर्माचे अनेक प्रकार असतात. सकाम-निष्काम तसंच शुभ-अशुभ कर्म असाही प्रकार आहे. मुळात कोणतंही कर्म शुभ किंवा अशुभ असं नसतंच. त्याच्या हेतुवरून कर्माचा प्रकार ठरतो. एखादा सैनिक सीमेपलीकडच्या शत्रुसैनिकांना मारतो. त्याबद्दल त्याला शौर्यपदकही मिळतं. पण तो ज्यावेळी सुट्टीवर घरी येतो आणि शेजार्‍याबरोबरच्या भांडणात या सैनिकाकडून त्याचा मृत्यू घडतो तेव्हा त्याला शिक्षा होते. यात कोणतं कर्म शुभ नि कोणतं अशुभ याचा निर्णय करणं अवघड असतं. पण कर्मावर जास्त लक्ष न देता, त्याच्या हेतूचा अधिक विचार न करता प्रसंगानुरूप, स्वकर्तव्यानुसार कर्म करणं नि त्याच्या फळाची आस न ठेवणं हे महत्त्वाचं आहे. एका अर्थी कर्मयोगाचं सूत्र असलेलं हे लक्षण भक्ताचंही लक्षण समजलं जातं.
६. भक्तिमान – आपण बुद्धिमान, शक्तिमान असे शब्द नेहमी वापरतो. पण भक्तिमान् हा शब्द तितकाच महत्त्वाचा आहे. सदासर्वकाळ सर्वत्र भक्तीचं अनुसरण करणारा खराखुरा भक्तिमान असतो. हनुमंत हे अशा भक्ताचं उत्तम उदाहरण आहे.
तो बुद्धिमान व शक्तिमान आहेच. पण त्याच्याएवढा दुसरा भक्तिमान आढळणं कठीण. सदैव स्वतःचा परिचय करून देताना तो नम्रपणे ‘श्रीरामदूत’ रामाचा सेवक, दास, भक्त असाच परिचय करून देतो.
एकूण भक्ताची गुणवैशिष्ट्यं सांगताना भगवंत भक्ताचं वर्तन, जीवन कसं असावं याविषयी मार्गदर्शन करताहेत. त्याबरोबरच हे गुण सामान्य माणसाच्या जीवनातही कसे प्रभावी आहेत याविषयी समुपदेशनही करत आहेत.
आपल्या जीवनाला समोर ठेवूनच भगवंत हे सारे गुण सांगताहेत. सांगताना न हृष्यति, न द्वेष्टि, न शोचति, न कांक्षति अशा नकारात्मक पद्धतीनं सांगताहेत. कारण विनाकारण द्वेष, शोक, कामना यांनी आपल्या जीवनात थैमान मांडलं आहे. त्याचा स्पष्ट निषेध करण्यासाठीच अशी नकारात्मक शब्दयोजना भगवंत करतात. द्वेष कोणाचाही, कधीही करू नका. कारण राग (क्रोध), द्वेष, सूड यांचं चक्र निर्माण होतं नि ते आपल्यावरच उलटून आपला विनाश घडण्याची शक्यता असते. या संदर्भात गांधीजींेचे विचार लक्षणीय व चिंतनीय आहेत- ‘‘इट्‌स हेटफूल टू हेट, इफ ऍट ऑल वन् वॉंट्‌स् टू हेट, ही शुड हेट हेट’’ म्हणजेच द्वेष करणं हेच द्वेष करण्यायोग्य आहे. जर एखाद्याला द्वेष करायचाच असेल तर त्यानं द्वेषाचाच द्वेष करावा. आहे किनई गंमत!