योग अनुसरूया

0
83

दुसरा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज संपूर्ण जगभरामध्ये उत्साहात साजरा होतो आहे. योगविद्या ही भारतात जन्म पावलेली असल्याने आणि भारताच्याच प्रयत्नांतून आंतरराष्ट्रीय पातळीवर संयुक्त राष्ट्रसंघाने तिचा स्वीकार केलेला असल्याने या देशाच्या इतिहासातील हे एक गौरवशाली पान आहे. योग हा मानवाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आहे. मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक उन्नतीचा तो राजमार्ग आहे. त्यामुळे त्याच्याकडे केवळ धार्मिक अंगाने पाहून त्याला विरोध करणे हा करंटेपणा आहे असे ठाम मत आम्ही गतवर्षी या दिवसाला झालेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मांडले होते. कोणतीही गोष्ट सक्तीने करायला लावली गेली, तर ती स्वीकारली जात नाही. पण तीच गोष्ट जर स्वयंप्रेरणेने करावीशी वाटली तर मात्र आनंदाने आणि उत्साहाने केली जाते. त्यामुळे योगाभ्यासही अशाच स्वयंप्रेरणेने करावासा वाटला तरच त्याला सर्वस्वीकारार्हता मिळेल. त्यासाठी योगाचे फायदे सर्वांना कळायला हवेत, पटायला हवेत. योग हा भारतीय परंपरेमध्ये विकसित झालेला असला तरी तो केवळ विशिष्ट धर्माच्या चौकटीत कधीच बांधलेला नव्हता. तो केवळ भारतीयांचाच विचारही करीत नाही. अखिल मानवजातीचा विचार त्यामध्ये अनुस्यूत आहे. अलीकडेच आपल्या अमेरिका भेटीत तेथील संसदेपुढे बोलताना पंतप्रधानांनी ‘योगाचे आम्ही पेटंट घेतलेले नाही’ असा टोला लगावला तो यथार्थ होता. हे मुक्त ज्ञान आहे आणि आजवर ते मुक्तपणेच वाटले गेले आहे. कोणीही यावे, योग अनुसरावा आणि त्याचे फायदे मिळवावेत अशी ही विद्या आहे. महर्षी पतंजलींनी १९५ योगसूत्रे संकलित करून त्याला अष्टांगयोगामध्ये संकलित केले. आपल्या नित्य जीवनामध्ये सहजपणे अनुसरता येईल अशा प्रकारचा हा योग जर आपल्या रोजच्या दिनक्रमामध्ये समाविष्ट झाला, तर त्यातून नुकसान काही होत नाही, उलट लाभच होईल हे जगाला पटल्यानेच जेव्हा संयुक्त राष्ट्रांपुढे योग दिनाचा प्रस्ताव आला तेव्हा वेगवेगळ्या धर्म, पंथांच्या १७५ देशांनी त्याला स्वीकृती दिलेली आहे. विरोध झाला तो फक्त आपल्या देशात. येथे त्याला हिंदुत्वाशी जोडले गेले. सत्ताधारी पक्षातील उचापतखोर मंडळीही त्याला कारणीभूत होती. ‘सूर्यनमस्कार घालायचा नसेल त्यांनी देश सोडून जावे’ अशी आततायी भाषा करणार्‍या काही वटवटखोर नेत्यांनी या विषयामध्ये अकारण राजकारण आणले. सूर्यनमस्कार घालताना सूर्यमंत्र म्हटले काय, न म्हटले काय, शरीराला लाभ तर होणारच. सूर्य प्रकाशताना काही विशिष्ट भूभागाचाच विचार करीत नाही. तो जेथे जेथे जातो तेथे सर्वांसाठी प्रकाशतो. योगविद्येचेही तसेच आहे. ती जेथे जेथे गेली तेथील मनुष्यजातीच्या कल्याणाचाच मार्ग तिने दाखवला. आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने जो समान योगाभ्यास कार्यक्रम आखण्यात आलेला आहे, त्याच्या प्रारंभीच जरी ‘संगच्छध्वं संवदध्वं स वो मनासी जानताम्’ अशी प्रार्थना केली जात असली, तरी त्यात सर्वांनी एकरूप व्हावे हीच आकांक्षा बाळगलेली आहे. त्यामुळे योगासारख्या विषयाला अकारण धर्म, राजकारण यांच्याशी जोडण्याऐवजी या प्राचीन विद्येची आजच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या काळातली गरज लक्षात घेऊन तिचा प्रसार होणे मानवजातीसाठी लाभदायक ठरेल. आज मैदानी खेळांची सवय नष्ट होत चालली आहे. नवी पिढी घरांच्या कोंडवाड्यांमध्ये कोंडली गेलेली आहे. नानाविध गॅजेटस्‌पलीकडे त्यांचे विश्व नाही. सोशल मीडिया हेच त्यांचे सर्वस्व बनलेले आहे. अशा काळात आपल्या घरच्या घरीही करता येईल आणि फार वेळही लागणार नाही अशा प्रकारचा हा अवघ्या पस्तीस ते पंचेचाळीस मिनिटांचा दैनंदिन योगाभ्यास जर अनुसरला तर तो नक्कीच लाभदायक ठरेल. आजच्या नवप्रभेच्या ‘आयुष’ पुरवणीत याच भावनेने तो विस्ताराने देण्यात आलेला आहे. शरीर ताजेतवाने असेल तर मनही ताजेतवाने राहील आणि मन ताजेतवाने असेल तरच त्यामध्ये उत्तमोत्तम कल्पना आणि विचारांचे नवसृजन होईल. त्यामुळे शरीर, मन, बुद्धी यांना चेतना देणार्‍या योगविद्येचे अनुसरण केवळ आजच्या एका दिवसापुरते करणे पुरेसे नाही. हा आपल्या नित्य दिनक्रमाचा एक अविभाज्य भाग बनला तरच त्याचे लाभ कालांतराने आपल्या शरीराला आणि मनाला मिळू शकतील. शालेय अभ्यासक्रमामध्ये योगविषयाचा समावेश करण्याची घोषणाही स्तुत्य आहे. त्यातही कोणत्याही शिक्षणसंस्थेवर सक्ती करण्यात आलेली नाही. हा ऐच्छिक विषय आहे, परंतु आपल्या पाल्यांसाठी त्याचा आग्रह धरावा लागेल. एका सशक्त, बलशाली, चैतन्यमयी समाजाची निर्मिती करण्यात हे पाऊल निश्‍चितच योगदान देईल.