योग अनुसरूया!

0
163

जगभरामध्ये आज जागतिक योग दिवस साजरा होत आहे. भारतीयांसाठी ही निश्‍चितच गौरवाची बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघासमोर योग दिवसाची संकल्पना चार वर्षांपूर्वी मांडली तेव्हा संपूर्ण जगाने त्याचे उत्स्फूर्तपणे व उत्साहाने स्वागत केले होते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या १९३ सदस्य देशांपैकी १७५ देशांनी त्या प्रस्तावाला अनुमोदन दिले होते. केवळ अनुमोदन देऊनच हे देश थांबलेले नाहीत, तर आपापल्या देशामध्ये जनतेने योग अनुसरावा यासाठी विविध उपक्रम आणि योजना हे देश राबवत आहेत. पंतप्रधान मोदी गेल्यावर्षी योग दिनानिमित्त केलेल्या भाषणात म्हणाले होते की, योग हे आता एक जनआंदोलन बनले आहे, ते खरेच आहे. पाच हजार वर्षांपूर्वी आपल्या ऋषीमुनींनी योगशास्त्र विकसित केले. महर्षि पतंजलींनी १९५ योगसूत्रांना अष्टांग योगाचे सुविहित रूप दिले. तत्कालीन ऋषी-महर्षींकडून तिरुमलाई कृष्णम्माचार्य, स्वामी शिवानंद सरस्वती, महर्षी महेश योगी, बी. के. एस. अय्यंगार, सद्गुरू जग्गी वासुदेव, श्रीश्री रविशंकर, बाबा रामदेेवांपर्यंत योगप्रसाराचे कार्य अविरत, अव्याहत चाललेले आहे. दुर्दैवाने आपल्या या प्राचीन ज्ञानाला स्वीकारण्यात आजही आपण कमी पडतो आहोत. जगभरामध्ये योगाला स्वीकृती मिळत असताना आपल्याच देशात काहींनी त्याला धार्मिक ठरवत विरोध दर्शविला होता. योग हे काही धार्मिक कर्मकांड नव्हे, तर योग हा मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक उन्नतीचा राजमार्ग आहे हे आम्ही वारंवार सांगत आलो आहोत. आजच्या ताणतणावांच्या आणि धकाधकीच्या जीवनामध्ये जीवनशैलीशी संबंधित नाना व्याधी आणि विकार मानवाला जखडून टाकत असताना योगासारख्या फारशी जागा, साधने, विशेष कौशल्य वा प्रशिक्षणाची गरज नसलेल्या सोप्या, सुलभ पद्धतीद्वारे देहामध्ये आणि मनामध्ये नवी चेतना जागविणे किती जरूरी आहे हे काही वेगळे सांगण्याची आवश्यकता नसावी. आपण योग अनुसरला तर हित आपलेच होणार आहे. तरीही योगाप्रती समाजामध्ये अजूनही उदासीनता दिसून येते. प्राचीन काळापासून चालत आलेल्या योगाचा दैनंदिन शिक्षणामध्ये समावेश करण्यास आपल्याला एवढी वर्षे का जावी लागली हे अनाकलनीय आहे, परंतु यापुढे योगाला चांगले दिवस येतील अशी आशा आज जागलेली आहे. आपल्याजवळ कितीही पैसा अडका असला तरी आरोग्य ठीक नसेल तर त्या पैशाचा काहीही उपयोग नसतो. आरोग्य हीच मानवाची खरी संपत्ती आहे असे जे म्हटले जाते ते वृथा नाही. योग ही निरायम जीवनाची गुरूकिल्ली आहे. प्राणायाम, सूर्यनमस्कार, आसने यांच्या नित्य अनुसरणातून चांगले चैतन्यमय शरीर आणि मन प्राप्त करण्याची ही गुरूकिल्ली आपल्या हाती असूनही जर आपण तिचा अवलंब करणार नसू, तर तो करंटेपणा ठरेल. आज अवघ्या जगाला ही जाण आलेली आहे. योगाविषयी अधिकाधिक जाणून घेण्याची पाश्‍चात्य जगताला ओढ लागलेली आहे. अशा वेळी योगासंबंधीची अधिकृत माहिती समाजापर्यंत, जगापर्यंत जाणे महत्त्वाचे आहे. भारतीय परंपरेने आपल्या ज्ञानाचा बाजार कधीच मांडला नाही. योगशास्त्र आपल्याकडे विकसित झालेेले असले, तरी भारताने त्याचे कधी पेटंट मागितलेले नाही. जगातील ज्याला वाटेल त्याने योग आत्मसात करावा, अनुसरावा आणि आपली उन्नती साधावी असा विशाल व व्यापक दृष्टिकोन आपण बाळगलेला आहे. भारतीय संस्कृती विश्वबंधुत्वावर विश्वास ठेवते. ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही आपली पूर्वापार धारणा राहिली आहे. आपल्या ज्ञानेश्वरांनी देखील पसायदान मागितले ते सार्‍या विश्वासाठी मागितले होते. त्यामुळे योगाला बाजारू स्वरूप येऊ न देण्याची खबरदारीही आपल्याला निश्‍चितच घ्यावी लागेल. अलीकडच्या काळामध्ये योगाच्या नावे भ्रष्ट पद्धतीही जगापुढे नेणारे महाभाग निपजलेले दिसतात. आपल्याकडे प्राचीन ज्ञानाचा वारसा आहे, फक्त तो आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर घासून पुसून समाजाला खुला होणे जरूरी आहे. योगाची सगळ्यांत जमेची बाजू म्हणजे त्यामध्ये अशास्त्रीय स्वरूपाचे काही नाही. तो आपल्या शरीराचीच काळजी घेत नाही, तर मनाचीही काळजी घेतो. आजच्या आपल्या नव्या पिढीमध्ये एकाग्रतेची उणीव प्रकर्षाने जाणवते. तिच्या हाती मोबाईल आहे, आधुनिक सुखसुविधा आहेत, परंतु त्यामुळे तिचे चित्त भरकटलेले आहे. ते स्थिर करण्यासाठी तिच्यापर्यंत योग आणि ध्यानधारणा, श्‍वसनाची तंत्रे पोहोचली पाहिजेत. आजच्या बैठ्या जीवनशैलीमुळे मधुमेहापासून रक्तदाबापर्यंतच्या नाना विकारांनी समाजाला विळखा घातलेला आहे. त्याच्यापासून मुक्ती मिळवायची असेल तर त्यासाठी योग, प्राणायामाची कास धरावी लागेल. योग हा प्राचीन आहे म्हणजे कालबाह्य आहे अशी मानसिकता असलेली मंडळीही आपल्याकडे आहेत. जॉगिंग किंवा जिमला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच योगसाधनेला आहे हे जोवर आपण समाजाला पटवून देऊ शकणार नाही, तोवर शारीरिक, मानसिकदृष्ट्या सुदृढ बलशाली समाज आपण निर्माण करू शकणार नाही. आजच्या योगदिनाचा हाच संदेश आहे!