योग ः आत्म्याचे परमात्म्याशी मीलन

0
127

तुम्ही युवक असा की वयोवृध्द, निरोगी असा की आजारी, योगाभ्यास सर्वांसाठी लाभदायी आहे आणि तो सर्वांना प्रगतिपथाकडे घेऊन जातो. वयपरत्वे आपली आसनांची समज अधिक परिपक्व होऊ लागते. मग आपण शारीरिक आसनांसोबत अंतर्गत सूक्ष्मतेवर अधिक कार्य करू लागतो.

‘योग’ हा शब्द ‘युज’ या संस्कृत धातूपासून बनलेला आहे, त्याचा अर्थ आहे आत्म्याचे परमात्म्यात विलीन होणे. योग ही भारतातील पाच हजार वर्षं प्राचीन ज्ञानशैली आहे. पुष्कळ लोकांचा असा समज आहे की योगाभ्यास म्हणजे शारीरिक व्यायाम आहे, ज्यात शरीर ताणले, वाकवले, पिळले जाते आणि अवघड श्वसन प्रक्रियांचा अवलंब केला जातो. खरेतर मानवी मन आणि आत्मा यांची अनंत क्षमता जाणून घेणार्‍या या विज्ञानाची ही, म्हणजे योगाभ्यासाची केवळ वरवरची ओळख झाली. योगाभ्यासामध्ये जीवनशैलीचा परिपूर्ण सारांश प्राप्त होतो.

योगाचा इतिहास
योग दहा हजारपेक्षा जास्त वर्षांपासून प्रचलित आहे. या परंपरेचा उल्लेख नारदीय सुक्त आणि सर्वात प्राचीन अशा ऋग्वेदामध्ये आढळतो. हा आपणास पुन्हा सिंधू-सरस्वती सभ्यतेचे दर्शन घडवतो. या सभ्यतेमधील पशुपतीनाथांच्या एका नाण्यावर योगमुद्रा विराजमान आहे जी त्या काळातील योगाच्या व्यापकतेचे द्योतक आहे. अतिप्राचीन उपनिषद ‘बृहद अरण्यक’मध्ये योगामधील काही शारीरिक आसनांचा उल्लेख आढळतो. छान्दोग्य उपनिषदामध्ये ‘प्रत्याहार’चा तर ‘बृहद अरण्यक’मधील एका स्तवनामध्ये ‘प्राणायाम’चा सविस्तर उल्लेख आहे. प्रचलित योगाच्या स्वरूपाचा प्रथम उल्लेख ‘कठोपनिषद’मध्ये आहे जी आयुर्वेदाच्या कथाशाखांमधील अंतिम आठ वर्गांमध्ये पहिल्यांदा येते, जे मुख्य आणि अत्यंत महत्त्वाचे उपनिषद आहे. येथे योगाला अंतर्मनाच्या यात्रेसाठी तसेच चेतनेच्या विकासासाठी गरजेच्या प्रक्रियेच्या रूपात जाणले जाते.

प्रसिद्ध संवाद योग याज्ञवाल्क्य, जो बाबा याज्ञवल्क्य आणि शिष्या गार्गी यांच्यामधील संवाद आहे, ज्याचे वर्णन ‘बृहद अरण्यक’ उपनिषदामध्ये आहे. यामध्ये श्वास घेण्याचे कित्येक व्यायाम प्रकार, शारीरिक शुध्दतेसाठी गरजेची आसने आणि ध्यानाचा उल्लेख आहे. गार्गी लिखित ‘छांदोग्य उपनिषद’मध्येदेखील योगासनांचा उल्लेख आहे.

अथर्ववेद मध्ये संन्याशांच्या एका समुहामधील चर्चेनुसार शारीरिक आसने ही योगासने म्हणून विकसित होऊ शकतात यावर भर दिला आहे. विविध संहितांमध्ये असा उल्लेख आढळतो की प्राचीन काळी मुनी, महात्मा आणि विविध संतांद्वारे कठोर शारीरिक आचरण, ध्यान आणि तप केले जात असे.
काळानुसार योग एक आचरणाच्या रूपात प्रसिद्ध होत गेला आहे. भगवत गीतेसह महाभारतातील ‘शांतिपर्वा’मध्ये योगाचा खुलासेवार उल्लेख आढळतो.

महाभारत आणि भगवत गीतेच्या फार पूर्वी वीसपेक्षा जास्त उपनिषदांमध्ये सर्वोच्च चेतनेसोबत मनाचे मीलन होणे म्हणजे ‘योग’ असे सांगितले गेले आहे. हिंदू दर्शनातील प्राचीन मूलभूत सूत्रांच्या रूपामध्ये योगाची चर्चा आहे, ज्यांचा अलंकृत उल्लेख पतंजली योग सूत्रमध्ये आहे. महर्षी पतंजली आपल्या दुसर्‍याच ‘योग सूत्र’मध्ये योगाची व्याख्या- ‘योगः चित्त-वृत्ती निरोधः’ अशी करतात. पतंजलींचे लेखनदेखील अष्टांग योगसाठी आधार बनले आहेत. जैन धर्मातील पाच प्रतिज्ञा आणि बौध्द धर्मातील योगाचाराची बीजे पतंजली ‘योग सूत्रा’मध्ये आहेत.
योगाचे प्रकार
योगामध्ये विविध प्रकारचा अभ्यास आणि पध्दती यांना समाविष्ट केले आहे.
‘ज्ञान योग’-दर्शनशास्त्र
‘भक्ती योग’- भक्ती आनंदाचा मार्ग
‘कर्म योग’- सुखमय कर्म मार्ग
राज योग : ज्याची पुढे जाऊन आठ अंगांमध्ये विभागणी केली आहे त्यालाच अष्टांग योग म्हणतात. योगाच्या विविध पद्धती आणि प्रक्रिया यांना संतुलित आणि एकत्र करून योगासनांचा अभ्यास करणे हेच राजयोगाचे सार आहे.

सर्वांसाठी योग
योगाचे एक वैशिष्ट्य हे आहे की तुम्ही युवक असा की वयोवृध्द, निरोगी असा की आजारी, योगाभ्यास सर्वांसाठी लाभदायी आहे आणि तो सर्वांना प्रगतिपथाकडे घेऊन जातो. वयपरत्वे आपली आसनांची समज अधिक परिपक्व होऊ लागते. मग आपण शारीरिक आसनांसोबत अंतर्गत सूक्ष्मतेवर अधिक कार्य करू लागतो.
योग आपल्यासाठी कधीही नवीन नव्हता. आपण हे सर्व अगदी बालपणापासून करत आलो आहोत, मग ते पाठीचा कणा मजबूत करणारे मार्जारासन असो की पचनशक्ती वाढवणारे पवनमुक्तासन असो. आपण शिशूंना दिवसभर काही न काही योगक्रिया करताना पाहतो. हर एक व्यक्तीला योगाचे वेगवेगळे महत्त्व आणि आवश्यकता आहे. योग प्रत्येकाच्या जीवनाची आदर्श दिशा ठरवण्यासाठी दृढ संकल्प आहे.

प्राणायाम आणि ध्यान
प्राणायाम म्हणजे आपल्या श्वासोच्छ्‌वासाचे नियंत्रण आणि विस्तारीकरण. श्वासोच्छ्‌श्वसाच्या योग्य तंत्रांचा सराव केल्यास मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. त्यामुळे प्राणशक्ती आणि जीवन ऊर्जा यांच्या नियंत्रणास मदत होते. प्राणायाम आणि योगासने हे एकमेकास पूरक आहेत. या दोन योगतत्त्वांचा मिलाफ झाल्याने शरीर आणि मनाच्या उत्तम प्रतीचे शुद्धीकरण व आत्म नियमन प्राप्त होते. प्राणायाम ही ध्यानाच्या गहर्‍या अनुभवाची तयारी असते.