योगासनं नव्हे, योगसाधना!

0
121
  • प्रा. रमेश सप्रे

भारतीय संस्कृतीनं मानवजातीवर जर कोणतं मोठं ऋण करून ठेवलं असेल तर हे योगशास्त्र- योगसाधना- योगजीवनशैली! माझा श्‍वास, माझा प्राण खूप अल्प असेल पण योगसाधनेद्वारा मी स्वतःला माझ्या अंतरंगाशीच नव्हे तर अनंताशी जोडला जाऊ शकतो. ही एक प्रकारे ज्योतीने केलेली तेजाची आरती असते किंवा मिणमिणत्या पणतीनं केलेलं सूर्याचं अंधार हटवून प्रकाशाचं दान करण्याचं कार्य असतं.

‘नेमेचि येतो मग पावसाळा. हे सृष्टिचे कौतुक जाण बाळा.’ आजच्या ‘बाळा’च्या नशिबात नेमानं येणार्‍या पावसाचं सृष्टि-कौतुक नाही. याला कारण त्याच्याच बाबांचं- आजोबांचं- पणजोबांचं कर्तृत्व. सृष्टी ही देवी आहे, माता आहे ही विचारसरणी मागे पडली नि सृष्टी ही भोगदासी आहे. तिला वाटेल तितकं, वाटेल तसं भोगा, ओरबाडा, तिचे लचके तोडा ही नवी संस्कृती (खरं तर विकृती) उदयाला आली. पाश्‍चात्त्य राष्ट्रांमध्ये स्थिरावलेली ही उपभोग संस्कृती दुर्दैवानं आता आपल्या देशातही धुमाकूळ घालतेय. ‘वीरभोग्या वसुंधरा’ म्हणणारा दुर्योधन तर ‘वसुधैव कुटुंबकम’ ही दृष्टी असलेला युधिष्ठिर यांच्यातला संघर्ष सध्या विकोपाला पोचलाय. अजून तरी दुर्योधनी वृत्तीची चलती आहे, पण निसर्गातून सर्व दिशांनी सर्व प्रकारचे होणारे वाढते हल्ले पाहता आता ‘धर्मो रक्षति रक्षितः’ म्हणजे ‘जो धर्माचं (कर्तव्याचं) रक्षण करतो त्याचं रक्षण तो धर्मच करतो’ ही जीवनशैली रूढ व्हायला हवी.

जीवनाच्या रथाला इंद्रियांचे घोडे, विषयोपभोगांचे मार्ग असले तरी मन नावाचा लगाम हा बुद्धिसारथ्याच्या हातात असेल नि विवेकाच्या चाबकानं जर या रथावर नियंत्रण ठेवलं जात असेल तर जीवनरथ उधळून खड्‌ड्यात पडणार नाही. उलट मुक्ती, शांती, समाधान, मनःप्रसाद (मनाची प्रसन्नता) या मुक्कामाला पोचल्याशिवाय राहणार नाहीत. यासाठी हवं इंद्रियांवर मनाचं, मनावर बुद्धीचं नि बुद्धीवर विवेकाचं नियंत्रण. ही सारी अंतर्यात्रा आहे. कारण सुधारणा, क्रांती आपल्या अंतरंगात घडवायची आहे. साहजिकच बाह्य विश्‍वाचा अभ्यास करणार्‍या विज्ञानपद्धती (डिसिप्लिन्स ऑफ सायन्स) पुरेशा प्रभावी ठरत नाहीयेत. अगदी प्रत्यक्ष शरीराला जरी उत्तमोत्तम वैद्यकीय इलाजोपचार केले तरी अनेक रोगांचं मूळ मनात (अंतर्मनात) असल्याने जोपर्यंत तिथं उपचार केले जात नाहीत तोपर्यंत सध्याच्या जीवनातील अतृप्ती, असमाधान, अशांती दूर होणार नाही. यासाठी आवश्यक आहे सूक्ष्म किंवा अंतरंगाची साधना.

यासंदर्भात सर्वाधिक प्रभावी आहे ती योगसाधना. हे सत्य जगातील विविध क्षेत्रांतील नामवंतांना, विचारवंतांना, प्रतिभावंतांना एवढं पटलं की त्यांनी अशा माणसाच्या अंतरंगात आवश्यक ते परिवर्तन घडवणार्‍या उपचारपद्धतींचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी महर्षी पतंजलींची योगसूत्रं नि त्यानुसार केलेला योगाभ्यास हा रामबाण उपाय आहे हे सर्वांच्या ध्यानात आलं. ही प्रक्रिया स्वामी विवेकानंदांच्या माध्यमातून अनेक देशांत शंभर वर्षांपूर्वी पोचली. स्वामीजींना प्रेषिताची दृष्टी (प्रॉफेटिक् व्हिजन) होती. त्यांनी स्वतः प्रात्यक्षिकं करून दाखवून नि त्या-त्या देशांतील सर्व स्तरांतील व्यक्तींकडून प्रत्यक्ष करून घेऊन आणि आपली विचारकेंद्रं स्थापन करून योगसाधनेची वाट सोपी करून दिली. महर्षी पतंजलींच्या योगसूत्रांवर स्वामी विवेकानंदांनी केलेलं भाष्य नि भाषणं इतकी प्रभावी होती की त्यातून एक आंदोलनच उभं राहिलं. दुर्दैवानं आरंभीची योगाच्या लोकप्रियतेची लाट काही काळानं ओसरली. तरी योगसाधनेचं महत्त्व पाश्‍चात्त्यांना कळून चुकलं होतं.

सहज सांगायचं झालं तर आपल्या मायदेशापासून (अमेरिकेपासून) हजारो किलोमीटर दूरच्या व्हिएतनामसारख्या देशात युद्धासाठी गेलेल्या अमेरिकन सैनिकांना पराभवाची नामुष्की स्वीकारून परतावं तर लागलंच, पण आपण कोणासाठी, कोणत्या उद्दिष्टासाठी का लढतोय हे न कळल्यानं नि आपल्या जवळच्या व्यक्तींपासून-कुटुंबापासून दुरावलेल्या या तरुण सैनिकांना निरनिराळी व्यसनं लागली. पराभूत मनोवृत्तीनं ते जेव्हा मायदेशी परतले तेव्हा अनेक जण विकृत सैतानांसारखे वागू लागले. त्यांना आवरणं सामान्य नागरिकांना सोडाच, पण सरकारलाही (शासनालाही) अशक्य होऊ लागलं. वेदनाशामकं, मन-बुद्धी झोपवणारी (ट्रँक्विलायझर्स अँड सेडेटायझर्स) औषधं देऊनही या सैनिकांच्या वर्तनात अपेक्षित असे टिकाऊ बदल घडले नाहीत. अशावेळी विविध आध्यात्मिक केंद्रांतून नि अधिकारी गुरूंच्या मार्गदर्शनातून योगाभ्यास शिबिरांद्वारे आश्‍चर्यकारक वाटावं असं परिवर्तन या बेलगाम वर्तनाच्या व्यक्तींमध्ये घडून आलं. नि मग योगसाधना सर्वांनाच उपकारक आहे हे दिसून आलं.
योग- योगशास्त्र- योगसूत्र- योगाभ्यास- योगासनं- योगसाधना असे कितीही निरनिराळे शब्द वापरले तरी त्यात मुख्य विषय आहे- योग. जोडणं- जुळणं यासाठी योग्य शब्द वापरतात. वियोग म्हणजे तुटणं- विलग होणं. हे शब्द व्यवहारातही आपण नेहमी वापरतो.

पण योग ही एक जीवनपद्धती आहे. तिचा प्रसार, शास्त्रशुद्ध मार्गदर्शन, त्यासाठी वर्गशिबिरं- अभ्यासक्रम या गोष्टीही आवश्यक बनल्या. परंतु सर्व जगावर एकाच वेळी योगसाधनेचं महत्त्व पटवून देणारा उपक्रम काही वर्षांपूर्वी सुरू झाला. त्याच्यावर जागतिक मान्यतेची मोहर उमटली नि घरीदारी, सर्व संस्थांतून आंतरराष्ट्रीय योगदिवस पाळला जाऊ लागला. त्याचं उगमस्थान अर्थातच होतं भारत- योगभूमी भारत!
‘२१ जून’ हा दिवसही निवडला गेला. अधिकाधिक प्रकाशाचा दिवस- सर्वात जास्त लांबीचा दिवस (द लॉंगेस्ट डे) म्हणून या दिवसाची निवड केली गेली. यामागचा उद्देश एकच ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ ही वैदिक प्रार्थना प्रत्यक्षात उतरवायची. योगप्रकाशानं- आरोग्यचैतन्यानं आपलं जीवन भरून नि भारून टाकायचं.
२१ जूनपासून सुरू होतं दक्षिणायन. रात्री मोठ्या व दिवस छोटे अशी परिस्थिती निर्माण होते. योगाच्या प्रकाशानं- आरोग्यप्रकाशानं- अंधारावर म्हणजे अनारोग्यावर मात करायची असते. जीवनाला शिस्त लावल्याखेरीज निरामय आयुष्य लाभणार नाही. म्हणून महर्षी पतंजलींनी आपली योगसूत्रं सांगताना सुरुवातच केलीय-
‘अथ योगानुशासनम्‌॥
आता योगामुळे जीवनाला शिस्त- बाहेरून लादलेली नाही तर आतून आलेली स्वयंशिस्त! ही पाळताना आनंदच असतो. कारण आपण स्वतंत्र असतो आपणच तयार केलेले यम-नियम (डूज् अँड डोंट्‌स) जीवनात आचरायला. एक लक्षात ठेवायचं की योग हे साधन नव्हे तर साधना आहे. दोन गोष्टी जोडणार्‍या सेतूचं काम योगसाधना करते. एका दिवसात हे अर्थातच जमणार नाही. म्हणून योगसाधना- दीर्घकाळ चालू असणारा अभ्यास- म्हणणेच योग्य आहे. योग म्हणजे जीवाचं शिवाशी किंवा आत्म्याचं परमात्म्याशी मीलन ही कल्पना आध्यात्मिक वाटेल. सध्याच्या जीवनपद्धतीचा विचार केला तर सोप्या शब्दात- शरीराचं मनाशी जोडलं जाणं. देहाचं बुद्धीशी जोडलं जाणं. हे तनामनाचं आरोग्य साधण्यासाठी प्रभावी माध्यम आहे. शिस्त, अभ्यास, सातत्य, चिकाटी असल्याशिवाय योगसाधना जमणार नाही. पण एकदा का योगसाधना जीवनाचं अंग बनून गेली की अभ्यास नि वैराग्य या गुणांचा किंवा वृत्तींचा विकास होतो.

गीतेत अर्जुन विचारतो, ‘भगवंता, या चंचल, चपळ मनाला आवरायचं कसं? या उसळणार्‍या इंद्रियांना नियंत्रणात कसं ठेवायचं? भोग-उपभोगावर अंकुश कसा ठेवायचा?’ या सर्व प्रश्‍नांना भगवंत शांतपणे उत्तर देतात, ‘पार्था, अभ्यास नि वैराग्यानं या सार्‍या गोष्टी शक्य होतात.’
पतंजलीही हेच सांगतात- योग म्हणजे जर मन-बुद्धी-चित्तावर नियंत्रण असेल तर त्यासाठी अभ्यास नि वैराग्य या गोष्टी जीवनात हव्यातच. अभ्यास ही पुनः पुन्हा केली जाणारी कृती आहे, तर वैराग्य ही मनाची वृत्ती आहे. वैराग्याला विवेकाचा पाया असेल तर ते टिकाऊ नि अधिक परिणामकारक बनतं.

म्हणून नुसती योगासनं नि प्राणायाम म्हणजे योगसाधना नव्हे. खरा योगच नव्हे! जर देह आणि मनबुद्धी यांच्यात योग्य संतुलन साधलं नाही तर निरनिराळ्या व्याधी निर्माण होतात. हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपल्यात सृष्टीबद्दल, परिसराबद्दल, इतर लोकांबद्दल कृतज्ञतेची वृत्ती तयार होईल. यासाठी सर्व योगशिक्षकांचं सांगणं असतं की, प्राणायाम करताना जे वायुमंडल पृथ्वीला व्यापून आहे त्यातील एक अतिशय लहान अंश मी श्‍वसनाद्वारे आत घेतोय. त्या सृष्टिनिर्मात्या विधात्याला किंवा निसर्गातील शक्तींना त्याबद्दल धन्यवाद! तसंच माझं जगणं शक्य करणार्‍या पंचमहाभूतांना- पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश (नि अवकाशसुद्धा- स्काय अँड स्पेस) यांनाही धन्यवाद. या सर्वांवर नियंत्रण असलेल्या शक्तीला परमेश्‍वर मानलं तर ते (तत्) अंतिम तत्त्व आहे. त्याच्याशी जोडलं जाणं नि जोडलेलं राहाणं हा सार्‍या योगसाधनेचा प्राण आहे.
या संदर्भातील सूत्रं आहेत- * तस्य वाचकः प्रणवः॥
म्हणजे प्रणव ॐकार ही त्या परमेश्‍वराची खूण आहे. या ॐकाराचा आपण जप करू शकतो, नव्हे केला पाहिजे.
* तत् जपः तत् अर्थभावनम्‌॥
म्हणजे त्या प्रणवाचा जप केला पाहिजे. पण ‘जप’ म्हणजे केवळ ध्वनी किंवा शब्दांचा उच्चार नाही तर त्या मंत्राचा अर्थ लक्षात घेऊन त्यानुसार भाव मनात निर्माण केले पाहिजेत. ‘अर्थ’ हा डोक्याचा, चिंतनाचा किंवा विचाराचा आहे तर ‘भाव’ हा हृदयाचा, भावनांचा आहे. ‘मनमुख’ एक करून जप करा नि ‘भावमुखी’ रहा, असं रामकृष्ण परमहंस म्हणत. ज्ञानोबांनी आपल्या गीतेवरील ग्रंथाला ‘भावार्थ दीपिका’ म्हटलंय ते यासाठीच.

यातून कृतज्ञतेची, शरणागतीची वृत्ती निर्माण होते नि जोपासलीही जाते.
यासात्री योगसूत्र आहे- * ईश्‍वर प्रणिधानात्‌॥
म्हणजे ईश्‍वराला अनन्यशरण जाऊन, त्याच्या सामर्थ्याविषयी आदरभाव व्यक्त करून त्याची शक्ती आपला सांभाळ करते म्हणून कृतज्ञता दाखवून योगसाधना चालू ठेवली पाहिजे. यामुळे व्यक्ती नि समाज, कुटुंब नि देश सर्वांचा विकास घडतो.
हे लक्ष्य समोर ठेवूनच जागतिक योगदिन अधिकाधिक सक्रिय सहभागानं साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीनं मानवजातीवर जर कोणतं मोठं ऋण करून ठेवलं असेल तर हे योगशास्त्र- योगसाधना- योगजीवनशैली!
माझा श्‍वास, माझा प्राण खूप अल्प असेल पण योगसाधनेद्वारा मी स्वतःला माझ्या अंतरंगाशीच नव्हे तर अनंताशी जोडला जाऊ शकतो. ही एका प्रकारे ज्योतीने केलेली तेजाची आरती असते किंवा मिणमिणत्या पणतीनं केलेलं सूर्याचं अंधार हटवून प्रकाशाचं दान करण्याचं कार्य असतं.

आत डोकावणं, अंतर्मुख होणं, अंतरात्म्याला (मन-बुद्धी-चित्ताला) अखंड जोडलेलं राहणं जमलं पाहिजे. त्यासाठी आपला स्वतःशी संवाद साधला जाईल. तन-मनाचं मीलन होऊन पूर्ण आरोग्याचा लाभ होईल. जीवनात शांतीचा अनुभव घेता येईल. आतून उसळणार्‍या नि सर्व दिशांत भरून असलेल्या आनंदाशी निखळ प्रेमाचं नातं निर्माण होईल. ऋषिमुनींचं ‘सर्वे सन्तु निरामयाः’ हे स्वप्न साकार होईलच, पण साधुसंतांचं ‘भूतां परस्परें पडो (किंवा जडो) मैत्र जीवांचे’ हे पसायदान आपल्या जीवनात प्रत्यक्ष लाभेल. म्हणून योगदिवसापासून केवळ योगासनांची नव्हे तर योगसाधनेची प्रेरणा घेऊन ‘योगी’ बनण्याचा संकल्प करूया. नाहीतरी गीतेत भगवंतानं आपल्यातल्या अर्जुनाला सांगितलंच आहे ना- ‘तस्मात् योगी भव॥