योगसाधना – ४६६ अंतरंग योग – ५१ स्वरक्षणार्थ करा योगसाधना

0
142
  • डॉ. सीताकांत घाणेकर

मास्क घालणे अत्यंत आवश्यक आहे. कारण कोरोना नाकपुड्यांतून शरीरात प्रवेश करतो. हा मास्क श्‍वास घेता यावा म्हणून नाकपुड्यांवर न ठेवता खाली ओठांवर ठेवला जातो. मग अशा मास्कचा फायदा काय? दक्षता घेतली नाही तर अत्यंत दुःखदायक घटना घडू शकतात. म्हणून तर प्रत्येक व्यक्तीने फार दक्षता घ्यायला हवी… स्वतःसाठी व इतरांसाठीही!

पावसाळा सुरू झाला. कमी-जास्त प्रमाणात पण नियमित पाऊस पडतो आहे. अनेक रस्ते, मैदाने…. जलमय होतात. त्याचबरोबर सगळे विश्‍वच ‘कोरोनामय’ झालेले दिसते. वृत्तपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन… इ.वर जास्तीत जास्त बातम्या ‘कोरोना’ विषयावरच असतात.

खरेच, अदृश्य असूनही कोरोनाने सर्वांना हैराण करून सोडले. नक्की काय केले तर त्याचा फैलाव कमी होईल याबद्दल विचारमंथन, आयोजन, संशोधन चालू आहेत, तसे राहणारच. त्याचे कारण म्हणजे हा नवीनच व्हायरस असल्यामुळे त्याबद्दल सर्व माहिती मानवमात्राला नव्हती. जसजसा वेळ जातो तसतसे आपले ज्ञान वाढेल व रोगावर नियंत्रण येईल. एवढेच नव्हे तर इतर अनेक रोगांसारखी कोरोनावरही लस निघेल. निराश होण्याची अजिबात गरज नाही. फक्त थोडा धीर ठेवणे आवश्यक आहे. आत्मिक सामर्थ्यसुद्धा वाढवायला हवे.

गोवा सुरुवातीला ‘ग्रीन झोन’मध्ये होता, पण आता दररोज नवीन तालुक्यांमध्ये, वाड्यांमध्ये कोरोनाचे संक्रमण चालूच आहे. याची कारणे अनेक आहेत पण मुख्य म्हणजे आपण पाहिजे तेवढी दक्षता घेत नाही. माणसाचा तो स्वभावच आहे- त्याला कसलीही बंधने नकोत, कायदे नकोत. स्वातंत्र्य हवे पण अति दुरुपयोग केला तर तो स्वैराचार होतो.

जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मानवाच्या अशा विचारांचे दर्शन होते.
* आम्हाला मोठ्या गाड्या, दुचाकी हव्यात. तसेच मोठे रुंद चांगले रस्ते हवेत, पण सीट-बेल्ट, हेल्मेट तसेच प्रत्येक रस्त्यासाठी ठरवलेली गती (स्पीड) नको. मग अपघात होणार नाही तर काय?

* भारतात पूर्वी महिलावर्ग व्यवस्थित पोशाख परिधान करीत असत. वयात आल्यानंतर साडी वापरीत असत. लांब बाह्यांचे ब्लाऊज व पदर पाठीवरून घेतलेला असे. त्यामागे एक विशिष्ट तत्त्वज्ञान होते. शरीराच्या भागांचे प्रदर्शन होऊ नये हा त्यामागचा भाव होता.
आता अनेक तरुणी व महिला सलवार-कुडता वापरतात. तोही पोशाख चांगला आहे. सुरक्षित आहे. पण त्यावर छातीवर दुपट्टा घालावा असा अलिखित नियम होता. हेतू शुद्ध होता. प्रदर्शन नको. पण नंतर दुपट्टा ‘टाय (कंठलंगोटी)सारखा गळ्यात- मानेवर पोचला. हल्ली तर तो मुळी दिसेनासाच झालाय.
काही तरुणी पुरुषांसारख्या पॅन्ट्‌स – जीन्स घालतात व त्यावर टी-शर्ट. स्त्री-पुरुष समानतेच्या विचारधारेमुळे यालाही हरकत नाही. पण कपडे घालताना थोडीतरी सभ्यता हवी. हल्ली तर मुली लहान पॅन्ट्‌स घालायला लागल्या.
या विषयावर जास्त चर्चा नको. फक्त संदर्भ समजला तरी पुरे, तर विषय हा आहे की आम्हाला बंधने नकोत.

* आहार ः जगण्यासाठी जरुरी आहे. पण जेव्हा ठाऊक आहे की मानवी शरीर शाकाहारासाठी बनवलेले आहे, मग मांसाहार करण्याचा आग्रह का? आणि त्यातही सात्त्विक जेवण कमीच. जास्त वेळा तामसी व राजसी अन्नच सेवन केले जाते. जे अन्न माझ्या शरीरासाठी नाही ते खाण्याचा हट्ट कशाला? बरे, इथेसुद्धा किती खावे? केव्हा खावे? किती वेळा खावे? याबद्दलही बंधने नाहीत.

* सर्व प्रकारची व्यसने ः दारू, तंबाखू- खाणे व ओढणे… वाईटच. अनेकवेळा जीवघेणी ठरतात- स्वतःसाठीच नव्हे तर दुसर्‍यासाठी सुद्धा! तरी त्याला सामाजिक प्रतिष्ठा दिली. व्यसने नसणारा अजागळ, मूर्ख ठरलाय.

* जुगार खेळणे अत्यंत घातक. त्यामुळे व्यक्तीचा व कुटुंबाचा नाश होतो हे माहीत आहे. धर्मराज युधिष्ठिरासारखा ज्ञानीसुद्धा जुगाराच्या आहारी गेला व महाभारत घडून लाखो व्यक्ती मृत्युमुखी पडले… तरी जुगार चालूच आहे.
दुर्भाग्य मानवतेचे – आर्थिक स्थिती सांभाळण्यासाठी सरकारच जुगाराला प्रोत्साहन देते म्हणून तर आपल्या गोव्यात नदीतील व किनार्‍यावरील कॅसिनो वाढलेत.

* मानवाच्या कामभावनेबद्दल तर बोलायलाच नको. जननेंद्रिये निसर्गाने प्रजननासाठीच प्राण्याला दिली आहेत. संभोगासाठी नाहीत. तसेच विवाहसंस्था सुरू करून आपल्या पूर्वजांनी त्यावर सुंदर, पवित्र बंधन आणले आहे. आपण रामनवमी मोठ्या उत्साहाने साजरी करतो पण श्रीरामासारखे एक-पत्नी व्रताचे बंधन आपल्याला नको! स्वैराचार इतका वाढला की निसर्गाने मानवतेवर ‘एचआयव्ही- एड्‌स’च्या रूपाने एक महाभयंकर संकट पाठवले. थोडा वेळ आम्ही भयभीत झालो. पण त्यावरही औषधे व इतर उपाय शोधून काढले.
आणि आता? परत ‘ये रे माझ्या मागल्या…’ आपल्या जीवनाशी संबंधित असलेले हे वेगवेगळे विषय. योगसाधना या विषयावर चिंतन करताना संदर्भ आहे तो ‘बंधनाचा- आचारसंहितेचा; यम-नियमांचा.
आता कोरोनावर विचार करू या. त्यावर काय दक्षता सांगितल्या आहेत…
मास्क … सामाजिक अंतर … हात वारंवार स्वच्छ धुणे .. सॅनिटायझर

* मास्क ः घालणे अत्यंत आवश्यक आहे. कारण कोरोना नाकपुड्यांतून शरीरात प्रवेश करतो. पण मास्कमुळे श्‍वास व्यवस्थित घ्यायला अडथळा होतो म्हणून आपण आपल्या आसपास नजर टाकली तर दिसेल की हा मास्क जास्तीत जास्त वेळ नाकपुड्यांवर नसून त्याखाली वरच्या ओठांवर दिसतो. मग अशा मास्कचा फायदा काय?
एक दिवस बँकेमध्ये गेलो होतो, तेव्हा बहुतेकांचे मास्क खालीच होते. मी त्यांना त्याबद्दल सांगत होतो आणि मग सर्वांनी मास्क व्यवस्थित वर केले. मी बाहेर पडल्यावर मात्र किती जणांनी ते तसेच ठेवले असतील, हा संशोधनाचा विषय आहे. त्यातील एक महिला म्हणाली, ‘‘मी मास्क जर ठेवला तर मी गुदमरून मरेन’’, आता हिला काय सांगणार??
दक्षता घेतली नाही तर अत्यंत दुःखदायक घटना घडू शकतात. म्हणून तर प्रत्येक व्यक्तीने फार दक्षता घ्यायला हवी… स्वतःसाठी व इतरांसाठीही!
तसे पाहिले तर हा मास्क ज्याच्या दोर्‍या हनुवटीकडून कानावर जातात, तो हनुवटीवर घट्ट बसतो. म्हणून श्‍वास घ्यायला त्रास होतो. त्यापेक्षा दोर्‍या मानेच्या व डोक्याच्या मागे बांधल्या तर सोयीस्कर होते. कारण खालचा भाग थोडा सैल ठेवला तर हवा व्यवस्थित फिरते. असे मास्क आम्ही शस्त्रक्रिया करताना तासन् तास घालून असतो… न गुदमरता. असे मास्क प्रत्येकजण स्वतःच बनवू शकतो.

* सुरक्षित अंतर राखणे (सोशल डिस्टन्सिंग) ः
जवळजवळ दीड ते दोन मीटर अंतर अपेक्षित आहे, पण बहुतेकवेळा तसे नसतेच. आता गरिबांच्या घरात व झोपडपट्टीत अशी अपेक्षा ठेवणे शक्यच नाही. पण अनेक सार्वजनिक ठिकाणी ते शक्य असते-
उदा. * बाजारात – पण तिथे लोक एवढी घाई करतात की सगळीकडे गर्दीच दिसते.

* ऑफिस, बैठका, कार्यक्रम, हॉटेल्स – इथेदेखील व्यवस्थित आयोजन केले तर बहुतेक वेळा अंतर राखणे शक्य होते. पण अनेकवेळा कार्यक्रमाला उपस्थित राहणार्‍या प्रमुख व्यक्ती – मंत्री, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस हेच कायदा मोडताना दिसतात.

* सॅनिटायझर ः मार्गदर्शनाप्रमाणे हा दोन्ही हाताना व्यवस्थित कमीत कमी ३० सेकंद चोळायचा असतो- सर्व हाताला, जास्त करून बोटांच्या मध्ये. साबण लावून हात धुवायचे असतात. इथेसुद्धा कर्मकांडं केल्यासारखे केले जाते. काही जणांचा एक हात मोकळा नसतो कारण त्यांनी बॅग, फाईल्स पकडलेल्या असतात. त्यावेळी एकाच हाताला तो लावला जातो.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी या झाल्या काही स्थूल गोष्टी. या सर्व पाळण्याचे सार्वजनिक सामर्थ्य आमच्यात नाही. ‘योगसाधना’ या विषयावर चिंतन करताना आपण प्रत्येकाने विविध गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात…..

* स्वतःबरोबर इतरांचा विचार करणे.

* आवश्यक नैतिकता, बंधने पाळणे.

* विश्‍वाचे रक्षण करण्यासाठी कार्यरत राहणे हे आपले कर्तव्य समजणे… हाच खरा मानवता धर्म आहे.
निदान… योगसाधनेतील आवश्यक पैलूंचा आपणतरी उपयोग करणे – स्वरक्षणार्थ. वेळोवेळी आम्ही अनेक विषयांवर विस्ताराने विचार केलेलाच आहे. इथे मुख्य मुद्दा म्हणजे सर्वांनी आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवणे.
शारीरिक- मानसिक- भावनिक- आध्यात्मिक. योगसाधनेचा तर हाच हेतू आहे, होय ना??