योगसाधना – ४३८ अंतरंग योग – २४

0
301
– डॉ. सीताकांत घाणेकर
अनेकजण कडक उपासतापास करतात व शेवटी जिवात्मा व परमात्म्यालासुद्धा कृश करतात. अशा गोष्टी कित्‌पत् बरोबर व शास्त्रशुद्ध आहेत याचा विचार व चिंतन प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. 
प्रत्येक मनुष्याच्या प्रारब्धाप्रमाणे त्याचा जन्म होतो. कुणी भारतात जन्म घेतो तर कुणी इतर देशात. त्याचप्रमाणे कुणाचा जन्म श्रीमंत घराण्यात होतो तर कुणाचा गरीब. काहीजण संस्कारी घराण्यात जन्म घेतात तर इतर असंस्कारी कुटुंबात… अशा या अनेक विविधता आहेत.
शास्त्रकार म्हणतात, ‘‘दुर्लभं जन्म भारते’’. भारतात जन्म मिळणे दुर्लभ आहे. ही पुण्यभूमी, देवभूमी मानली जाते आणि खरेच आहे कारण या देशात संस्कृतीचा एका विशिष्ट दिशेने विकास झाला. ऋषीमुनींनी आम्हाला शोध दिले..जीवनविकासाचे..तेही सर्व पैलूंनी. पण दुर्भाग्य म्हणजे आमच्यातील बहुतेकजण आपल्याच महान संस्कृतीचा अभ्यास करत नाहीत. उलट त्यांच्या अज्ञानामुळे व विपरीत ज्ञानामुळे त्यांचे मनोविकार व अहंकार वाढताहेत व ते स्वतःचा आणि इतरांचा नाश करतात.
तसे बघितले तर प्रत्येकाला वाटते की आपण सर्वगुणसंपन्न व्हावे. समाजात आपले कौतुक व्हावे. आपल्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळावी म्हणून तर आपण ज्ञानार्जन करतो. पण बहुतेकवेळा हे ज्ञान भौतिक गरजांसाठीच जास्त असते. भावनिक, अध्यात्मिक पैलूंचा विकास साधण्यासाठी विशेष प्रयत्न सहज दृष्टिक्षेपात येत नाहीत.
सर्वगुणसंपन्न होण्यासाठी सर्व पैलूंची संपन्नता अपेक्षित आहे- शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, आध्यात्मिक, सामाजिक… असे गुण स्वतःमध्ये संक्रमित करणे तसे कठीणच काम आहे- एका जन्मात तर अशक्यच असेल. पण प्रयत्न करायला काहीदेखील हरकत नाही. म्हणतात ना… * थेंबे थेंबे तळे साचे.
असे आदर्श समाजात कमीच दिसतात. एक व्यक्ती होती – जिला ‘पूर्णपुरुषोत्तम’ म्हणतात ती म्हणजे श्रीकृष्ण. पण त्यांच्या विरुद्धसुद्धा अनेक व्यक्ती होत्या. त्यातील बहुतेकजण विकारी, अहंकारी होते.
आपल्या ज्ञानी पूर्वजांनी या विषयावर चिंतन करून आम्हाला विविध मार्ग सुचवले. त्यातील एक मार्ग म्हणजे ‘शास्त्रशुद्ध मूर्तिपूजा’.
पू. पांडुरंगशास्त्री म्हणतात- मूर्तीमध्ये एकाग्र होणे आवश्यक असते. ज्याच्यात एकाग्र व्हायचे असते त्याला सर्वगुणसंपन्न मानले पाहिजे. हा शास्त्रकारांचा आग्रह आहे. कारण मूर्तीचा प्रभाव आपल्या मनावर होणारा आहे. म्हणूनच भिन्न भिन्न मूर्तींची उपासना व अर्थ आपल्या शास्त्रकारांनी समजावला आहे.
उपास्यानामनियमः | साधनानामनेकता ॥
इथे प्रत्येकासमोर एक यक्ष प्रश्‍न उभा राहतो- मूर्तिपूजा शास्त्रशुद्ध करायची (कर्मकांडात्मक नको) पण ही मूर्ती नक्की कुठली असावी?
इथे शास्त्रीजी छान मार्गदर्शन करतात. ते म्हणतात, ‘‘मूर्ती कोणती असावी हे साधकानेच ठरवावयाचे आहे. म्हणून आपल्या शास्त्रकारांनी ती चर्चा न करता एक मार्ग निश्‍चित केलाय. आपल्याला कोठे जायचे आहे व कोणत्या मार्गाने जावयाचे आहे, याचा विचार ज्याचा त्याने करावा. लहान स्टेशन असेल तर एकच प्लॅटफॉर्म असतो. तेथे चढण्या-उतरण्याची पंचायत नसते. सर्व बरोबर चढतात. कोणी मागे राहात नाही. परंतु बोरीबंदरसारख्या मोठ्या स्टेशनवर अनेक प्लॅटफॉर्म आहेत, तेथे निश्‍चित ठरवावे लागते की आपल्याला कोठे जायचे आहे- हार्बरलाईनने कसार्‍यापर्यंत की कर्जतपर्यंत? कोणीकडे जायचे आहे याचा निर्णय करूनच योग्य त्या गाडीत बसावे लागते. तसे जीवनविकासासाठी मूर्ती निश्‍चित केली व त्यात मन एकाग्र झाले तरच मनाचे शुद्धीकरण होते. म्हणून मनाच्या शुद्धीकरणासाठी सर्वगुणसंपन्न अशा मूर्तीत चित्त एकाग्र केले पाहिजे.
सृष्टीच्या मूळात प्राथमिक दृष्टीने विचार केला तर लक्षात येईल की इथे तीन गुण आहेत- सात्विक, राजसिक व तामसिक.
गीतेच्या १७व्या अध्यायात अर्जुन श्रीकृष्ण भगवानांना या तीन प्रवृत्तींविषयी प्रश्‍न विचारतो –
* ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः|
तेषां निष्ठा तु कर कृष्ण सत्वमाहो रजस्तमः ॥ (गीता १७.१ः)
हे कृष्णा! जी माणसं शास्त्रविधीला सोडून श्रद्धेने युक्त होऊन देवादिकांचे पूजन करतात, त्यांची मग स्थिती कोणती?- सात्विक, राजस की तामस?
श्रीकृष्ण उत्तर देतात – ‘‘त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा |
सात्त्विकी राजसी चैव तामसी चेति तां श्रुणु ॥ (गीता १७.२)
– मनुष्यांची ती शास्त्रीय संस्कार नसलेली, केवळ स्वभावतः उत्पन्न झालेली (अनंत जन्मी केलेल्या कर्मांच्या संचित संस्कारांनी उत्पन्न झालेली श्रद्धा- ‘स्वभावजा’ श्रद्धा म्हटली जाते जी सात्विक, राजस व तामस अशा तीन प्रकारचीच असते, ती तू माझ्याकडून ऐक.
भगवान पुढे आणखी ज्ञान देतात-
सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत |
श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छद्धः स एव सः ॥ (गीता १७.३)
– हे भारता, सर्व माणसांची श्रद्धा त्यांच्या अंतःकरणानुरूप असते. हा पुरुष श्रद्धामय आहे. म्हणून जो पुरुष ज्या श्रद्धेने युक्त आहे तो स्वतःही तोच आहे.
अर्थात जशी ज्याची श्रद्धा असते, तसेच त्याचे स्वरूप असते.
इथे साहजिकच विचार येतो की ही वेगवेगळ्या स्थितीची, प्रवृत्तीची माणसे कुणाची पूजा करतात? आपल्या मनात जो विचार येतो, तोच अर्जुनाच्या मनातदेखील आला. पण भगवंत तर सर्वज्ञानी आहेत. आपल्या मनात कसली खिचडी शिजते ते त्यांना ज्ञात असते. त्यांच्यापासून कुणीही कसलीही गोष्ट लपवू शकत नाहीत.
म्हणून श्रीकृष्ण सांगतात-
यजन्ते सात्विका देवान्यक्षरक्षांसि राजसाः|
प्रेतान्भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः॥ (गीता १७.४)
* सात्विक माणसं देवांची पूजा करतात.
– राजस माणसं यक्ष- राक्षसांची पूजा करतात.
– तामस माणसं प्रेत व भूतगणांची पूजा करतात.
हे समजल्यावर सहज विचार येतो आम्ही कुठल्या गटात येतो व अशी पूजा केल्यावर परिणाम काय? भगवंतच या शंकेचे निरसन पुढल्या दोन श्‍लोकात करतात-
* अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपो जनाः|
दम्भाहंकारसंयुक्ताः कामरागबलान्विताः॥ १७.५)
* कर्शयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः|
मां चैवान्तःशरीरस्थं तान्विद्ध्यासुरनिश्‍चयान् ॥ (गीता १७.६)
– जी माणसं शास्त्रविधी सोडून केवळ मनाच्या कल्पनेप्रमाणे घोर तप करतात तसेच दंभ, अहंकार, कामना, आसक्ती आणि बळाचा अभिमान यांनी युक्त असतात, जे शरीराच्या रूपात स्थित असलेल्या भूजनसमुदायाला आणि अंतःकरणात राहणार्‍या मलाही कृश करणारे असतात ते अज्ञानी लोक आसुरी स्वभावाचे असतात, हे तू जाण. इथे दोन मुद्यांवर समजण्यासाठी थोडे स्पष्टीकरण हवे….
* भूतग्रामम म्हणजे भूतसमुदाय
– अर्थात शरीर, मन व इंद्रिये इत्यादींच्या रूपात परिणत झालेल्या पंचमहाभूत – पृथ्वी, जल, वायू, तेज, आकाश.
* अन्नशरीरस्थम् माम् – अंतःकरणात राहणार्‍या मलाही कृर्षयन्त म्हणजे कृश करणारे आहेत.
हा शब्दार्थ झाला. पुढे चिंतन करून गर्भितार्थ व आध्यात्मिक अर्थ समजणे आवश्यक आहे. तो असा- शास्त्राविरुद्ध उपवासादिकांनी घोर तपाने शरीर सुकविणे अर्थात् भगवंताचा अंशस्वरूप जो जिवात्मा, त्याला क्लेश देणे हे भूतसमुदायाला व अंतर्यामी परमात्म्याला कृश करणे आहे.
हे ज्ञान स्वतः परमात्म्याच्या मुखारविंदातून ऐकल्यावर आपल्या लक्षात येईल की अनेकजण कडक उपासतापास करतात व शेवटी जिवात्मा व परमात्म्यालासुद्धा कृश करतात.
अशा गोष्टी कित्‌पत् बरोबर व शास्त्रशुद्ध आहेत याचा विचार व चिंतन प्रत्येकाने करणे आवश्यक आहे.
योगसाधक तरी असे करीत असतील याची आशा ठेवूया व खात्री बाळगूया. बरोबर ना?