योगसाधना – ४१३ अंतरंग योग – १

0
467
  •  डॉ. सीताकांत घाणेकर

चौर्‍याऐंशी योनीत जन्म घेऊन परमात्म्याकडून वेगळा झालेला आत्मा मानव योनीत जन्म घेतो… आणि त्यातही भारत देशांत जन्म मिळणे दुर्लभ आहे कारण ही देवभूमी, पुण्यभूमी आहे. इथे संत- महापुरुष, ऋषी- महर्षी जन्माला आलेच पण स्वतः भगवान विष्णूंनी नऊ अवतार घेतले.

योगसाधनेचा आपला प्रवास मंद गतीने चालला आहे. या प्रवासाची कल्पना वेगवेगळ्या तर्‍हेने आपण करु शकतो.
* पाणबुडीने समुद्राच्या तळाकडे जातो आहोत आणि आता अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत आलो आहोत.
* विमानाने आकाशात झेप घेतली आहे आणि ढगांच्या वर पोचलो आहोत.
* अवकाशयानाने पृथ्वीपासून हजारो मैल दूर जातो आहोत आणि ब्रह्मांडात विहार करतो आहोत…
आता आपण अंतरंगयोगाकडे पोचलो आहोत. म्हणजे मनाचाच वापर करुन मनाच्या विविध पातळ्या, पैलू समजून मनाचे संवर्धन करणे. हा विषय अत्यंत सूक्ष्म आहे व त्यामुळे थोडा कठीण देखील आहे.

तसे बघितले तर योग म्हणजे एक फार मोठे तत्वज्ञान आहे. त्याचा अभ्यास शास्रशुद्धच हवा, तरच अपेक्षित परिणाम मिळतील. आपण साधना करता करता फार पुढे पोचलो आहोत. पुुष्कळ काळ गेला (४१३ आठवडे). त्यामुळे आपण नक्की काय करतो आहोत, कुठल्या प्रवासाला निघालो आहोत, या सगळ्याचा आपल्याला विसर पडू शकतो. त्यामुळे थोडी उजळणी अत्यावश्यक आहे. तरच ‘अंतरंग योग’ समजू शकू.
अंतरंग योगाचे तीन पैलू आहेत- धारणा – ध्यान – समाधी.

तत्वज्ञानाच्या दृष्टीने विचार व चिंतन केले तर आपण जीव- जगत- जगदीश यांच्या परस्पर संबंधाबद्दल विसरतो आहोत. मनुष्य जन्माचा हेतू, ध्येय विसरलो आहोत. ‘दुर्लभं मनुष्य जन्मः’ हे देखील आपल्याला माहीत नाही.
चौर्‍याऐंशी योनीत जन्म घेऊन परमात्म्याकडून वेगळा झालेला आत्मा मानव योनीत जन्म घेतो.. हे ज्ञान देखील बहुतेकाना नाही. मग त्याच्यापुढे जाऊन या जन्मात विशिष्ट साधना केली तरच परत परमात्म्याशी मीलन होणार हे उच्च, सूक्ष्म तत्वज्ञान कसे माहीत होणार?
शास्त्रकार सांगतात –
* दुर्लभं जन्म भारते – भारत देशांत जन्म मिळणे दुर्लभ आहे कारण ही देवभूमी, पुण्यभूमी आहे. इथे संत- महापुरुष, ऋषी- महर्षी जन्माला आलेच पण स्वतः भगवान विष्णूनी नऊ अवतार घेतले आणि आता दहावा कल्की अवतार घेणार आहे.
त्याबद्दल देखील आम्हाला अल्प ज्ञानच आहे. आपल्या भारतात अनेक साहित्य विकसित झाले- वेद, उपनिषद, गीता, भागवत, रामायण, महाभारत, पुराणे, विविध क्षेत्रात आपण प्रगती केली- विज्ञान, कला. कितीतरी शास्त्रे आपण विश्‍वाला दिली- आयुर्वेद (वैद्यकीय), ज्योतिष शास्त्र, इ. त्यात एक प्रमुख म्हणजे योग शास्त्र.

त्यातील बहुतेेक सर्व शास्त्रांतील संदर्भ वर उल्लेखलेल्या उच्च तत्वाज्ञाशी आहेच पण योगशास्त्राचा संंबंध मानवी ध्येयाशी जास्त संबंधित आहे.
योगाच्या अनेक व्याख्या आहेत पण मुख्य व्याख्या आहेत-
* युज्यते अनेन इति योगः. (पतंजली स्रुत्र)
योग म्हणजे जोडण्याची कृती. प्राथमिक अवस्थेत शरीर व मन यांना व तद्नंतर जीवात्मा व परमात्मा (पृथ्वीवर जीवन जगताना व मृत्यूनंतर). या प्रक्रियेने काय साध्य होते?- तर अत्युच्च ‘स्वरूप’ (स्व-रूप अवस्था)
* तदा द्रष्टुः स्वरूपेऽ व स्थानम् (पतंजली सुत्र १.३)
पण ही अशी अवस्था मिळणे तेवढे सोपे नाही. म्हणून योगसाधना आवश्यक आहे. त्यात विविध साहित्याचा अभ्यास आहे. त्यातील एक म्हणजे पतंजली योगसूत्रें. (समाधीपद – साधनापद – विभुतिपद- कैवल्य पद)
* हठयोग प्रदिपिका
* योगमार्ग – ज्ञानयोग (बुद्धीसाठी), भक्तीयोग (मनासाठी), कर्मयोग (शरीरासाठी), राजयोग (सर्वांसाठी)
* श्रीमद्भगवद्गीता -(अठरा अध्यायात विविध तर्‍हेचे योगमार्ग आहेत).
आपला अभ्यास चालू आहे तो राजयोगाचा- पतंजलीयोग- अष्टांगयोग.
म्हणजे आठ अंग असलेला योग – आत्मनियंत्रनाचा योग. अष्टांगयोगाचे प्रामुख्याने दोन भाग आहेत- अ) बहिरंग योग- शरीर व इंद्रियांच्या माध्यमाने मनाचे संवर्धन आणि ब) अंतरंग योग- मनाचाच वापर करुन मनाचे संवर्धन.
(अ) बहिरंग योग – यामध्ये पाच अंगे येतात.
१. यम – व्यक्ती व समाजासाठी सद्वर्तनाचे आदेश- अहिंसा, सत्य, अस्तेय, बह्मचर्य, अपरिग्रह.
२. नियम – स्वतःच्या आत्मशुद्धीसाठी आत्मशासनाचे आदेश- शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्‍वरप्रणिधान.
३. आसन – यामध्ये शरीरासाठी विविध तंत्रे करताना मनावर देखील नियंत्रण अपेक्षित आहे.
४. प्राणायाम- प्राणशक्तीवर नियंत्रण
५. प्रत्याहार – उपभोगाच्या विषयांपासून इंद्रियांवर नियंत्रण.
ज्ञानेंद्रिये – डोळे (रुप), कान (शब्द), नाक (गंध), जीभ (रस), त्वचा(स्पर्श)
कर्मेंद्रिव्ये – हात, पाय, जीभ (त्वचा), उत्सर्जन इंद्रिये (मल,मूत्र विसर्जन) जननेंद्रिये.
(ब) अंतरंग योग –
यात सूक्ष्म मनाचाच वापर करुन त्याच मनावर नियंत्रण करणे अपेक्षित आहे. त्यामध्ये तीन अंगे आहेत. १. धारणा – चित्ताची स्थिरता
इथे चित्ताला एका विशिष्ट जागेवर स्थिर करायचे असते.
धारणा दोन तर्‍हेच्या – * बाह्यधारणा ः डोळ्यासमोर सुंदर मूर्ती किंवा निसर्गरम्य चित्र ठेवून त्यावरच चित्त स्थिर करणे.
* अंतर्धारणा ः डोळे बंद केले तरी तीच मूर्ती किंवा चित्र दिसते कारण चित्र तिथेच एकाग्र केलेले असते. धारणेसाठी ॐ देखील वापरु शकतो.
२. ध्यान – चित्ताची एकाग्रता
चित्त एकदा स्थिर झाले की मग ते एकाग्र होऊ लागते.
३. समाधी – चित्ताची एककारता, स्वरुपकारता.
– ही अत्युच्च स्थिती आहे. इथे पोचण्यासाठी नियमित शास्त्रशुद्ध अभ्यास व तो देखील एखाद्या योग्य सद्गुरुकडून आवश्यक आहे.
आपण बहुतेक सोपी अशी आसने व प्राणायाम करतो. थोड्या व्यक्ती ध्यान करतात पण अनेकजण कठीण वाटल्यामुळे सोडून देतात. तसे करु नये कारण ही सूक्ष्म पातळीवरची साधना आहे. त्याशिवाय योगशास्रज्ञ सांगतात की यम, नियमांचे पालन तसेच प्रत्याहार देखील फार आवश्यक आहे.
त्यासाठीच आज आपण थोडी संक्षिप्त उजळणी केली. कारण ‘पुढचे पाठ व मागचे सपाट’ व्हायला नको. मागचा थोडा अभ्यास करुन चिंतन केले तर अंतरंग योगाचे पैलू – धारणा, ध्यान, समाधी- समजणे थोडे सोपे होईल.