योगसाधना – ३४३ योगमार्ग – राजयोग आसन – २७

0
160
  • डॉ. सीताकांत घाणेकर

उष्ट्रासनाचा फायदा संपूर्ण पाठीच्या कण्याला होतो. कणा मजबूत होतो. म्हणूनच कण्याची व्याधी असलेल्यांनी मार्गदर्शन घ्यावे. त्याशिवाय व्यक्तीची मान मागे मोडल्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा वाढतो. मेंदूच्या विविध भागांची क्रियाशक्ती वाढते. विद्यार्थ्यांसाठी तर हे आसन अत्यंत उपयुक्त आहे.

विश्‍वातील प्रत्येक क्षेत्रात विस्तृत अखंड असे ज्ञान आहे. प्रत्येक क्षेत्रातील विषयांचा अभ्यास करणे मानवाला शक्य नाही. शिवाय तसे बघितले तर गरजही नाही. तसेच काही मर्यादित विषय जरी अभ्यासले तरी एक जन्म पुरणार नाही. एका कुठल्याही विषयाचा कुणीही अभ्यास करतो तेव्हा एक गोष्ट जरुरी असते ती म्हणजे त्या विषयाची जास्तीत जास्त माहिती त्या व्यक्तीला हवी. त्याशिवाय आपल्याला असलेले ज्ञान जेव्हा जीवनात वापरतो तेव्हा त्याचा विनियोग शास्त्रशुद्ध हवा. पुढे जाऊन ज्यावेळी आपण इतरांना शिकवतो तेव्हा तर शिक्षकाची जबाबदारी आणखी वाढते. कारण गुरुजींचेच ज्ञान जर कमी असेल तर त्यांच्या शिष्यांची काय परिस्थिती असणार?

हल्ली तर प्रत्येक क्षेत्रात नवनवीन शोध लागतात आणि कुठलीही व्यक्ती जर त्याबद्दल माहिती मिळवीत नसेल तर ती व्यक्ती ‘‘आऊट डेटेड’’ होते. विश्‍वातील स्पर्धेत ती टिकणार नाही. माझ्या वैद्यकीय किंवा कर्करोगाच्या क्षेत्रात प्रत्येक क्षणाला कितीतरी नवे नवे शोध लागतात. तसेच संशोधन चालू असते. त्यामुळे नव्या शस्त्रक्रिया केल्या जातात. नवीन औषधें उपलब्ध होतात, ज्यांचे दुष्परिणाम कमी असतात. तसेच शरीराच्या प्रत्येक क्षेत्रात ‘‘स्पेशालिस्ट’’, ‘‘सुपर स्पेशालिस्ट’’ तयार होतात. म्हणून एक तर आम्ही आमचे ज्ञान वाढवायला हवे अथवा रोग्याला ‘स्पेशालिस्ट’कडे पाठवायला हवे. विविध छान छान अत्यंत उपयुक्त अशा चाचण्यांची संख्या तर वेळोवेळी वाढतच असते.
या संदर्भात विचार करायचा झाला तर लक्षांत येईल की योगशास्त्रालादेखील हे नियम लागू होतात. पण या शास्त्रांत एक गोष्ट वेगळी आहे ती म्हणजे हे क्षेत्र नवीन नाही. तर भारत देशात जवळजवळ पाच हजार वर्षांपूर्वी योगशास्त्राचा शोध लागला व अनेक योगशास्त्रज्ञांनी ते वेळोवेळी विकसित केले. त्यांतील मूळ ऋषी म्हणजे पतंजली. त्यांना तर अनेकजण ‘भगवान पतंजली’ म्हणतात. त्यांनी ‘योगसूत्रे’ दिली. या सूत्रांचा अभ्यास करून इतर विद्वानांनी विविध योगमार्गांचा विकास केला. भगवान श्रीकृष्णांनी तर श्रीमद्भगवद्गीतेत अठरा अध्यायांमध्ये अठरा प्रकारचे योग आपला एक प्रिय सखा धनुर्धर अर्जुनाला कुरूक्षेत्राच्या रणांगणावरच सांगितले. ही घटनाच अलौकीक आहे- कुरूक्षेत्रावर जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणे.

मला तर वाटते की हे जाणूनबुजूनच भगवंतानी घडवले असेल. कारण अर्जुनासमोर जे प्रश्‍न आले होते तेच प्रश्‍न आपल्यासमोर अनेकदा येतात. तो तर आम्हा मानवांचा गृहस्थांचा प्रतिनिधीच आहे. जीवनातील विविध भयानक समस्यांना कसे सामोरे जायचे ह्याचे उत्कृष्ट मार्गदर्शन योगशास्त्रात व मुख्यत्वेकरून गीतेत आहे.
या शास्त्राचे एक छोटेसे अंग म्हणजे ‘आसन’. ही आसने करताना शारीरिक व मानसिक व्याधींना तर फायदा होतोच पण इतर अनेक फायदे विविध आसने करताना होतात.

आपला विचार चालू आहे तो खाली बसून करावयाची आसने. त्यांत आपण सुखासन, भद्रासन, अर्धपद्मासन, वज्रासन… यांवर सखोल विचार केला. आता पुढे…
* पश्‍चिमोत्तानासन –
हातांची बोटे पायांच्या बोटांना लावायची. त्यामुळे साहजिकच पुढे वाकावे लागणारच. उभे राहून आपण पादहस्तासन करतो तसेच हे आसन बसून करायचे. सुरवातीला हाताची बोटे अगदी अंगठ्यापर्यंत खाली जाणार नाहीत. तर कदाचित गुडघ्यापर्यंतच जातील. कारण आपली पाठ व स्नायू तेवढे लवचिक नसतात. काही हरकत नाही. आपले हात गुडघ्यांपर्यंत पोचले तरी हळुहळू पाठ वाकवून वाकवून हळुहळू मग हात खाली खाली जातील. एकदा हाताची बोटे पायांच्या बोटांना लागली की मग हातांनी आंगठे पकडून कमीत कमी दोन मिनिटे त्या स्थितीत शांत रहावे.

प्राथमिक अवस्थेत शरीराच्या खालच्या विविध भागात थोड्या कळा येतील – प्रामुख्याने पाठीच्या खालच्या भागी, गुडघ्याखालील मागच्या बाजूच्या स्नायूंमध्ये. पण नियमित साधना चालू ठेवली व थोडे दुःख सहन करण्याची तयारी ठेवली तर शेवटच्या अवस्थेत हे आसन फार लाभदायक आहे. एवढेच नव्हे तर आनंददायी आहे.
मुख्य म्हणजे ज्यांना पाठीच्या कण्यांत कुठलाही रोग असेल तर त्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे व प्रशिक्षित योगशिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच हे आसन करावे. तसेच बळ वापरून करू नये. विविध दुष्परिणाम होण्याची शक्यता वाढते.
पश्‍चिमोत्तानासन करणार्‍यांना सहसा पाठदुखी होत नाही. तसेच जांघ ते पायापर्यंतचे स्नायू – मुख्यत्वे मागच्या बाजूचे – कणखर होतात. त्यांचे व्यवस्थित ट्यूनिंग होते. त्यामुळे चालताना, धावताना, चढण- डोंगर-पायर्‍या चढताना त्रास होत नाही उलट हे सर्व स्नायू रिलॅक्स (शिथिल) झाल्याने एक वेगळाच अनुभव येतो- तो शब्दातीत आहे. प्रत्यक्ष अनुभव व अनुभूती घेणेच चांगले होईल.
या आसनाची कृती लक्षात ठेवायला सोपे कारण कदाचित शरीराचा पुढील भाग पश्‍चिम म्हणून मानला तर पश्‍चिमेकडे वाकडे हे पश्‍चिमोत्तानासन असे समजू शकतो.
* उष्ट्रासन
याच्या नावावरूनच कळते की इथे उंटासारखे रहायचे. इथे आधी गुडघ्यांवर राहायचे. दोन्ही हातांचे तळवे पायांच्या मागच्या भागांवर नेऊन तेथे ठेवायचे. सुरवातीला वज्रासनामध्ये बसून जर हे आसन केले तर पुढील पायर्‍या सोप्या वाटतात. ज्यावेळी आपण हे आसन प्रथमच करतो त्यावेळी केव्हा केव्हा तोल जाण्याची किंवा घेरी येण्याची शक्यता वाढते- जास्त करून वयस्कर व्यक्तींच्या बाबतीत. त्यामुळे सुरवातीला आपल्यासोबत कुणीतरी असलेले बरे.

तसेच वज्रासनात ठेवतो तसे पाय ठेवले तर पायांच्या सांध्यात – अँकल जॉइंटमध्ये कळा येतात. म्हणून आपण पायाची बोटे मोडून त्यांच्यावर वजन देऊ शकतो. एकदा सराव झाला मग योग्य तर्‍हेने उष्ट्रासन करू शकतो.
– आसनांची नावे जेव्हा आम्ही बघतो तेव्हा योगशास्त्रज्ञांच्या कल्पकतेचे कौतुक वाटते. विचार केला तर ते आसन कसे करायचे हे सहज लक्षात येते.
आता उष्ट्रासनच बघा ना- शेवटच्या स्थितीत आपण उंटासारखे राहतो. उंट जसा दोन्ही लांब अशा पायांवर उभा राहतो व त्याची पाठ वर येते जवळजवळ त्याच स्थितीत हे आसन करणारा दिसतो.

उष्ट्रासनाचा फायदा संपूर्ण पाठीच्या कण्याला होतो. कणा मजबूत होतो. म्हणूनच कण्याची व्याधी असलेल्यांनी मार्गदर्शन घ्यावे.
त्याशिवाय व्यक्तीची मान मागे मोडल्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा वाढतो. मेंदूच्या विविध भागांची क्रियाशक्ती वाढते. विद्यार्थ्यांसाठी तर हे आसन अत्यंत उपयुक्त आहे.
लहान मुलाना तर आसने करताना मजा येते कारण वर्गामध्ये आम्ही त्यांना सांगतो – कुत्रा हो, ससा हो, वाघ हो, उंट हो… योगसाधना करताना ते आनंद अनुभवतात पण व्यवस्थित व नियमित सरावानंतर त्यांचे विविध पैलू कार्यरत होतात.