योगसाधना – ३३० योगमार्ग – राजयोग आसन – १४

0
116

– डॉ. सीताकांत घाणेकर

ही अनुभूती कशी असते ते वर्णन करता येत नाही. ती स्वतः नियमित योगसाधना करूनच अनुभवायची असते. मानव इथे स्वतःचे, विश्‍वाचे अस्तित्वच विसरून जातो. योगसाधनेमध्ये आत्मा-परमात्म्याचे हेच अत्युच्च मीलन अपेक्षित आहे. पण त्यासाठी प्राथमिक पायरीवरील योगासनांपासून सुरुवात करायला हवी.

योग म्हणजे मीलन – प्राथमिक अवस्थेत मन व शरीर यांचे आणि तेसुद्धा भावनिक मीलन. प्रत्येक व्यक्ती क्षणोक्षणी कुणाला तरी भेटतच असते. पण या अशा मीलनात भाव असतो का? काहीही खात्री नाही. जर व्यक्तींचे एकमेकांवर प्रेम असेल तर भाव, आत्मियता असेल तरच मीलन भावपूर्ण घडेल.

जीवनाकडे चौफेर दृष्टी फिरवली व सूक्ष्म दृष्टीने निरीक्षण केले तर लक्षात येईल की ज्या व्यक्तीने आमच्यासाठी काहीतरी त्याग केला असेल, कष्ट घेतले असतील त्यांच्यावर आपले जास्त प्रेम असते- उदा. आपले पालक तसेच इतर नातेवाईक देखील असतील. पण या सर्वांत मुख्य म्हणजे आपली आई. या आईने आपल्यासाठी कितीतरी कष्ट घेतले असतात- गर्भावस्थेत नऊ महिने गर्भाशयात सांभाळते, जन्मानंतर दूध देते, तद्नंतर जसजसे वय वाढते तसतसे आवश्यक अन्न देते, संस्कार करते… जगाच्या प्रांगणात समर्थपणे उभे राहण्यासाठी जे जे करणे आवश्यक असते ते ते सर्व करते. या सर्व घटना इतक्या सहज घडून जातात की लहान असलेले मूल वाढत वाढत प्रौढ होते. आईसुद्धा वयस्कर होते. पण बर्‍याच वेळा ही अति महत्त्वाची गोष्ट बहुतेकांच्या लक्षातच येत नाही.

प्रौढावस्थेत आईला गरज असते ती म्हणजे मुलांनी तिचा सांभाळ करणे. दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे अशा वेळी काही मुले आईबद्दल कृतज्ञता ठेवत नाहीत. ती कृतघ्न होतात. आईवडलांना सांभाळत नाहीत. काही तर त्यांना वृद्धाश्रमात पाठवतात. ते विसरतात की आपले आईवडील होते म्हणून आम्ही आहोत.
अगदी अशीच गोष्ट आमच्या शरिराच्या संदर्भात घडते. आमचे शरीर आहे म्हणून आम्ही आहोत या साध्या गोष्टीची आम्हाला जाणीव नसते. त्यामुळे आमच्यातील बहुतेक व्यक्तींना आपल्या शरीराबद्दल कृतज्ञता नसते. त्यांना वाटते मानवी शरीर विश्‍वकर्त्याने विश्‍वाचा उपभोग घेण्यासाठीच आम्हाला दिलेले आहे. त्यामुळे आम्हाला विविध प्रकारचे रोग होतात – चुकीच्या जीवनपद्धतीमुळे तसेच वाढत्या ताणतणावामुळे. त्यामुळे त्या व्यक्तीला पुष्कळ त्रास सोसावे लागतात. त्याशिवाय खर्च होतो व वेळही वाया जातो. म्हणूनच जर प्रत्येकाने योगशास्त्राच्या माध्यमाने आपले शरीर सांभाळले व त्याचबरोबर मनबुद्धीची निगा राखली तर हा सर्व त्रास व हे सर्व रोग पुष्कळ प्रमाणात कमी होतील. पण मुख्य मुद्दा म्हणजे योगही शास्त्रशुद्धरित्या करणे अत्यावश्यक आहे. आसने करताना फक्त शरीराच्याच हालचाली तेवढ्या उपयोगी नाहीत. यानेही त्याचा फायदा अवश्य मिळेल पण अपेक्षित सर्व फायदे मिळणार नाहीत. त्यामुळे आसने करताना शरीरात वेगवेगळ्या भागांवर लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे. ते आपले लक्ष्य असले पाहिजे.

लक्ष्यावर लक्ष ठेवणे किती महत्त्वपूर्ण आहे हे समजण्यासाठी महाभारतातील उत्कृष्ट धनुर्धराचे – अर्जुनाचे उदाहरण चांगले आहे. तरुणपणात धनुर्विद्या शिकतेवेळी गुरू द्रोणाचार्यांनी झाडावर एक लाकडाचा पोपट ठेवला व शिष्यांना सांगितले की त्यांनी पोपटाच्या डोळ्यावर बाण मारायचा. धर्मराज युधिष्ठीर, दुर्योधन व इतर अनेक जणांना आकाश, झाड, फांद्या… आधी दिसल्या. तद्नंतर फांदीवर बसलेला पोपट दिसला. मग महद्प्रयासाने डोळा दिसला. तेवढ्यात बराच वेळ निघून गेला होता.

शास्त्रकार सांगतात की या विद्येत असे अपेक्षित नाही. इथे संपूर्ण चित्त एकाग्रता हवी. अर्जुनाला मात्र फक्त पक्षाचा डोळाच दिसला व त्याने त्याचे शरसंधानही केले. तो एकटाच उत्तीर्ण झाला. महाभारतात पुढे द्रौपदी स्वयंवरात एका वर टांगलेल्या फिरत्या माशाचा डोळा हे लक्ष्य होते आणि तेसुद्धा सरळ वर बघून नव्हे तर खाली असलेल्या कढईत उकळते तेल होते त्यात बघून तो डोळा फोडायचा होता. खरे म्हणजे ही गोष्ट फार कठीण होती. फक्त अर्जुनच हे शरसंधान करू शकला.

अशा गोष्टींपासून आपण बोध घ्यायचा असतो. इथे बोध म्हणजे चित्ताची एकाग्रता. आसने करताना शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर चित्त एकाग्र करून होणारे बदल सूक्ष्म दृष्टीने टिपणे महत्त्वाचे आहे. सुरुवातीला ही गोष्ट तेवढी जमत नाही. पण जेव्हा व्यक्ती नियमित आसने करते तेव्हा ही चित्ताची एकाग्रता सहज साध्य होते. एवढेच नव्हे तर एकाग्रतेने आसने करताना एक वेगळीच मजा येते. एक सुंदर अनुभव येतो.
आसने करताना- सांधे, कणा व स्पर्श या ज्ञानेंद्रियावर लक्ष केंद्रित करणे मुख्य आहे. बहुतेक वेळा प्रत्येक सामान्य व्यक्तीला स्पर्श म्हणजे बाहेरील स्पर्श – शरीराच्या कुठल्याही भागावर असलेल्या त्वचेचा स्पर्श अभिप्रेत व माहीत आहे.

खरेंच, तो तसा स्पर्श अत्यंत जरुरी आहे. प्रत्येकाला त्या स्पर्शाचा भरपूर अनुभव असतो.
* बालपणात वडील माणूस आपल्या हाताने स्पर्श करतो त्यात त्या व्यक्तीच्या प्रेमाचा अनुभव येतो. सर्वांपेक्षा बरे वाटते ज्यावेळी आई स्पर्श करते कारण तिच्या स्पर्शात वात्सल्य असते, जिव्हाळा असतो आणि तो जिव्हाळा नैसर्गिक असतो.
* एरवी लहान मुलाला आनंद व सुखाचा अनुभव होतो पण ज्यावेळी त्याला भूक, तहान लागते किंवा काही कारणांमुळे शारीरिक पीडा होते तेव्हा तर या स्पर्शाचे महत्त्व अनेक पटींनी वाढते.
बारकाईने निरीक्षण केले तर लक्षात येईल की आई काही ज्ञानेंद्रियांचा व काही कर्मेंद्रियांचासुद्धा उपयोग करते- ती प्रेमपूर्ण – भावपूर्ण नजरेने मुलाकडे बघते (दृष्टी-डोळे); मूल रडते किंवा काही सांगते त्याच्याकडे लक्ष देते (श्राव्य-कान) आणि त्याचवेळी स्पर्श करते (त्वचा). या सर्व ज्ञानेंद्रियांमध्ये स्पर्श अत्यंत महत्त्वाचा आहे.

इतर जनावरांमध्ये पिल्लाची माता वास घेते तसेच आपल्या जिभेने त्याला चाटते. कारण मानवजात जशी कुरवाळते तसे त्यांना करता येत नाही.
सहज स्पर्श करून झाल्यावर मग पुढे स्पर्शाच्या इतर तर्‍हा आहेत. त्यात मुख्य म्हणजे मुका घेणे. हा अनुभव तर मुलाला व मातेला अत्यंत सुखमय असतो. प्रियकर व प्रेमिकादेखील आनंद मिळवण्यासाठी हीच पद्धत वापरतात.

स्पर्शाची आणखी एक पद्धत – सुख मिळवण्याची – म्हणजे कपाळ-डोळे -गाल… यांना अलगद चोळणे. तोंडावर जर थंड किंवा गरम पाण्याचा स्पर्श केला तर जास्त सुखद अनुभव येतो. कितीही थकवा असला तरी तरतरी येते. पुष्कळवेळा अनेकजण तसे करतातही.
हे सर्व स्पर्श मानवाने स्वतःला व दुसर्‍याला केलेले आहेत पण आणखी एक स्पर्श आहे- दैवी स्पर्श – तो तर वर्णनापलीकडे आहे. योगासने करताना या स्पर्शाचा अनुभव घेता येतो. यासाठी काही आसने अत्यंत उपयुक्त आहेत.

* अर्धकटिचक्रासन – या आसनामध्ये आधी उजवा हात भुजापासून वर उचलून डाव्या बाजूने वळायचे असते. तिथे थोडा वेळ (अर्धा ते एक मिनिट) तसेच थांबायचे असते. त्यावेळी शरीराच्या त्या ताणलेल्या भागात काय बदल अनुभवायला मिळतात त्याचा अनुभव घ्यायचा असतो. तद्नंतर हात परत परतीच्या वाटेने खाली आणायचा असतो. त्यावेळी हाताला आतून कुणीतरी स्पर्श केल्याचा अनुभव येतो. तो तर अत्यंत सुखद असतो.

आता यात काही मोठा चमत्कार नाही. हात वर घेताना हातातील रक्त हळुहळू खांद्याकडे सरकायला लागते आणि परत खाली घेताना वरून खाली यायला लागते. रक्तवाहिन्यांमध्ये स्पर्शाच्या ज्या पेशी असतात त्यामुळे हा अनुभव येतो. चित्त एकाग्र करून त्या कृतीवर लक्ष दिले तरच हा सुखद अनुभव मिळतो. यालाच मी दैवी अनुभव म्हणतो. कारण निसर्गाने केलेल्या सुंदर व सूक्ष्म तर्‍हेने केलेल्या शरीररचनेमुळेच हा स्पर्श कळतो.

तसेच पद्मासनामध्ये किंवा वज्रासनात जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा हळुहळू जगाशी आपला संबंध तुटायला लागतो. सुरुवातीला शरीराच्या अस्तित्वाची जाणीव असते. नंतर ध्यानावस्थेत मन खोल शिरायला लागते तेव्हा व्यक्तीला आपल्या शरीराचादेखील विसर पडतो व शरीरात संथपणे वाहणार्‍या प्राणशक्तीचा अनुभव येतो- डोक्यापासून अंगठ्यापर्यंत. हाच तो भगवद्स्पर्श! ही शांतीची अवस्था एवढी सूक्ष्म असते की काही योगसाधक राजयोगाच्या आठव्या पायरीपर्यंत पोहचतात. अत्युच्च अशी समाधीवस्था. कारण साधक या दैवी भगवद्स्पर्शात अगदी डुंबून जातो.
हाच तो मातेचा स्पर्श. शास्त्रशुद्ध योगसाधनेमध्ये स्थूल शरीरापासून सूक्ष्म स्पर्शापर्यंत वाटचाल करणे अत्यंत उपयुक्त आहे. ही अनुभूती कशी असते ते वर्णन करता येत नाही. ती स्वतः नियमित योगसाधना करूनच अनुभवायची असते.
मानव इथे स्वतःचे, विश्‍वाचे अस्तित्वच विसरून जातो. योगसाधनेमध्ये आत्मा-परमात्म्याचे हेच अत्युच्च मीलन अपेक्षित आहे. पण त्यासाठी प्राथमिक पायरीवरील योगासनांपासून सुरुवात करायला हवी.