योगसाधना – २७३ योगमार्ग – राजयोग ईश्‍वरप्रणिधान – ४

0
133

– डॉ. सीताकांत घाणेकर

हल्ली प्लास्टर ऑङ्ग पॅरीसच्या मूर्ती चांगल्या दिसतात म्हणून बनविल्या जातात. पण त्यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होतो. कायद्याने त्यांच्यावर बंदी आहे, पण लोकशिक्षण जरुरी आहे. खरे ज्ञान झाल्यावर व्यक्ती आपोआप कायद्याचे पालन करणार ही अपेक्षा आहे.
असा हा सुंदर – आकर्षक – सर्वांच्या आवडीचा गणपती. असे ज्ञान मिळाल्यानंतर ईश्‍वर प्रणिधान सहज प्रेमपूर्वक होणार.

विश्‍वेश्‍वराने सर्व ब्रह्मांडाची, विश्‍वाची निर्मिती केली. त्यात विविध घटक आहेत. अत्यंत बुद्धिमान अशा मानवाची निर्मिती करून नक्की किती काळ लोटला कुणालाही माहीत नाही. भारतीय संस्कृती चार युगं मानते.

विश्‍वात अनेक संस्कृती वेळोवेळी विविध ठिकाणी जन्माला आल्या. त्यात प्रमुख म्हणजे भारतीय संस्कृती, ग्रीक व रोम संस्कृती. या अत्यंत प्रगत संस्कृती असे मानले जाते. पण इतिहासकार नोंद करतात की ग्रीक व रोम संस्कृती भौतिकतेकडे वळल्या. त्यागापेक्षा भोगाला जास्त महत्त्व आले. स्वातंत्र्याचा दुरुपयोग होऊन स्वैराचाराकडे बहुतेकांचा कल वाढला. दुःखाची गोष्ट म्हणजे या महान संस्कृती हळूहळू नष्ट झाल्या. हल्ली दिसते ते त्यांचे विद्रुप रूप.
त्यामानाने भारतीय संस्कृती बरीच टिकली. पण दुर्भाग्य म्हणजे आता हळूहळू भारतातील बहुतेक जनता पाश्‍चात्त्यांच्या वाईट गोष्टींचे अंधानुकरण करताना दिसतात. दिवसेंदिवस त्याचे दुष्परिणाम अनुभवाला येतात. त्यामुळे अनेक जण निरुत्साही होतात. त्यांचे बरोबरच आहे. कारण या व्यक्ती अभ्यास व चिंतन करीत नाहीत. मी जो अल्प अभ्यास करतो त्यामुळे मला थोडे ज्ञान मिळते. त्यावर थोडं चिंतन केलं की लक्षात येतं की भारतीय संस्कृती ङ्गार मजबूत आहे. प्रत्येक युगात त्यावर विविध तर्‍हेचे आघात अनेकांनी केले. भारतीयांनी तसेच परकीयांनीही. पण आपल्या ऋषी-महर्षी, संत-महापुरुषांनी एवढे सखोल चिंतन या विषयावर केले आहे की कालांतराने भारतीय संस्कृती नक्की तेजाने तळपणार. विश्‍वातील घटनांकडे लक्ष दिले तर कळेल की भारतातील विविध शास्त्रांचा अभ्यास अनेक देशांमध्ये केला जात आहे. यात मुख्यत्वे करून योग आणि आयुर्वेद. त्यांचा प्रचार व प्रसार जलद गतीने होत आहे. सुख-समृद्धी, आयुष्य- आरोग्य यांच्यासाठी ही शास्त्रे किती उपयोगी आहेत हे परकियांना पटले आहे. एक उदाहरण म्हणजे २१ जूनला जागतिक योग दिवस विश्‍वभरात लाखो व्यक्तींनी पाळला. दुर्भाग्य ङ्गक्त भारत मातेचे. भारतीय नागरिक अपेक्षित प्रमाणात आपल्या संस्कृतीचा अभ्यास करताना दिसत नाहीत.
आपण भारतीय कर्मकांडे करण्यात तरबेज, पटाईत आहोत. पण शास्त्रशुद्ध अभ्यास करण्याकडे आपले दुर्लक्ष होते. त्या क्षेत्रात आम्हाला तेवढा उत्साह दिसत नाही. पूर्ण अंधःकार आहे असे नाही. अनेक संस्था त्या संदर्भात उत्कृष्ट कार्य करतात. पण देशाच्या लोकसंख्येच्या मानाने हे कार्य नगण्य वाटते.
उदाहरणच द्यायचे झाले तर भाद्रपदाच्या सुरुवातीलाच जो एक महत्त्वपूर्ण उत्सव येतो – श्रीगणेश चतुर्थी – त्याबद्दल विचार करुया. हा एक उत्सव असा आहे की सर्व भारतात त्याला महत्त्व आहेच पण जास्त करून गोवा, कोकण, उर्वरित महाराष्ट्र, कर्नाटक… इथे या उत्सवामध्ये पुष्कळ उत्साह दिसतो. दूरवर काम करणार्‍या अनेक व्यक्ती आपल्या पूर्वजांच्या घरी, आपल्या मूळ गावात थोडे दिवस परत येतात. आधी घरची साङ्गसङ्गाई, मग गणेशपूजनाची तयारी. या व्यवस्थेसाठीच पुष्कळ काम करावे लागते. नंतर नातेवाईक, मित्र, गावकरी यांचे स्वागत करणे किंवा त्यांच्याकडे जाणे… या सर्व गोष्टींमध्ये दिवस भराभरा निघून जातात. गणपती विसर्जनानंतर परतीचा प्रवास सुरू होतो. त्यावेळी मन – हृदय जड होते. परत भेटीसाठी आणखी एक वर्ष वाट पहावी लागते.
बहुतेक करून गणपतीचे वास्तव्य दीड दिवसाचे असते. पण विविध कुटुंबामध्ये त्यांच्या परंपरेनुसार हे वास्तव्य कधी कधी अडीच-पाच-सात-नऊ-अकरा-एकवीस दिवसांचेसुद्धा असते. आता तर गावातील व शहरातील लोक सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा करतात. तेथे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतात. लहान-मोठ्यांसाठी विविध स्पर्धा, कथाकथन, भक्तीसंगीत, नाटके, नृत्य, भजन, माटोळी स्पर्धा, इत्यादी इत्यादी. आनंदाची गोष्ट म्हणजे सर्वधर्मीय व्यक्तींचा त्यात सहभाग असतो. काही ठिकाणी नाटकाबरोबर तियात्रदेखील करतात. या वर्षी तर अनेक ठिकाणी कोंकणी नाटके सादर झालीत. आपला उत्साह वाढवण्यासाठी ङ्गटाके, आतिषबाजी, रोषणाई.. यांचा सर्रासपणे उपयोग केला जातो.
विसर्जनाच्या दिवशी तर नाचत-नाचत, वाजत-गाजत गणपतीभक्त रस्त्यांवर जणुकाय दिंडीच काढतात.
मानव समूहाला भक्तिभावाद्वारे एकत्र आणण्यासाठी असे उत्सव आवश्यक असतात. पण सर्वतोपरी निरीक्षण केले तर लक्षात येते की इथे कर्मकांडे व मजेचाच भाग जास्त असतो. परस्पर प्रेम व भावाची वृद्धी कमीच दिसते. याचे कारण म्हणजे अशा उत्सवांमागील ऐतिहासिक, भावनिक, आध्यात्मिक… पैलूंचा हवा तेवढा अभ्यास केला जात नाही.
हल्लीचीच गोष्ट बघूया- थोर स्वातंत्र्य सेनानी बाळ गंगाधर टिळक यांनी ब्रिटिशांच्या राजवटीत समाजाला एकजूट करून देश व संस्कृती प्रेम शिकवण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता पण आज या उत्सवाचे स्वरूप काय झाले आहे. अनेक भागात गुंड लोक हप्ता घेतात, तसे गरीबांकडूनही बळजबरीने देणगी घेतात. सगळीकडे दिवसभर सिनेसंगीताचा गोंगाट, आतिषबाजीमुळे हवा व आवाज प्रदूषण व रस्त्यावर कचरा, रस्त्यांवर वाहनांची गर्दी… केव्हा केव्हा विविध गटांमध्ये भांडणे – काही ठिकाणी दारु पिऊन विसर्जनाच्या दिवशी नाचणे वगैरे.
सारांश – मानव संस्कृती कमी व आसुरी संस्कृती जास्त. प्रत्येक सुज्ञ व्यक्तीने या विषयावर विचार करणैे अत्यंत आवश्यक आहे. समाज धुरीणांनी तर जास्त चिंतन व तत्सम कार्यवाही करायला हवी.
श्रीगणेश चतुर्थीचा अभ्यास करताना अनेक मुद्दे लक्षात घ्यायला हवेत…
* इतिहास तज्ज्ञांनांच्या मते पाचव्या शतमानापूर्वी हत्तीमुख गणेशाचा संदर्भ मिळत नाही. हुप्त काळात पहिला संदर्भ मिळतो. तसेच गजानन हे अनार्यांचे दैवत. नंतर आर्यांनी स्विकारलेले.
* आद्य मानव भटक्या व मांसाहारी असा जंगली होता. त्याला आपल्या ऋषींनी प्रेमाने कृषीसंस्कृतीकडे वळवले. या संस्कृतीतूनच गणपती जन्म अभिप्रेत आहे.
* गणपती हा शब्द दोन शब्दांतून आलेला आहे. गण आणि पती. गण म्हणजे समूह आणि पती म्हणजे प्रमुख. पूर्वी भारतात अनेक समूह होते. प्रत्येक समूहाला स्वतःचे असे एक कुळचिन्ह असे. त्यातील एक कुळ ङ्गारच शक्तिमान होते. त्यांचे कुळचिन्ह होते हत्ती. हे कुळ शक्तिमान व सक्षम असल्यामुळे त्यांचे आधिपत्य इतर कुळांनी स्वीकारले. त्याचबरोबर त्यांच्या चिन्हांचे पूजनही करायला लागले. त्यामुळेच हत्तीमुख देवाची संकल्पना रूढ झाली.
* गणपतीचे वाहन – उंदीर, मूषक. याबद्दल सांगितले जाते की दुसर्‍या गणांचे चिन्ह होते उंदिर. हा गण दुर्बल होता. म्हणून त्यांनी शक्तिमान गटाचे दास्यत्व स्वीकारले. त्यामुळे उंदीर गणपतीचा दास झाला.
* हा उत्सव भाद्रपद शुद्ध चतुर्थी या दिवशी साजरा करायला सुरुवात होते. याचा ऋतुचक्राशी संबंध जोडला आहे. उन्हाळ्यात पाऊस नसल्यामुळे सृष्टी कोरडी झालेली असते. तद्नंतर पाऊस सुरू होतो. दोन-तीन महिने पर्जन्यामुळे सर्व सृष्टी हिरवीगार झालेली असते. सगळीकडे पाने-ङ्गुले-ङ्गळे आलेली दिसतात. डोंगर हिरवेगार होतात. ठिकठिकाणी धबधबे, नाले भरून वाहताना दिसतात. नद्या पाण्याने तुडुंब भरून जातात. शेतांत दाणे पिकतात. सगळीकडे वातावरण प्रसन्न दिसते. समृद्धी दिसते.
सारांश- भूमीमातेची नवनिर्मिती दिसते. सृजन प्रक्रियेचे सुरेख दर्शन होते. त्याच वेळी पार्वतीला (पर्वताची मुलगी) मुलगा होतो. तोच गणपती. एका कथेनुसार पार्वतीने आपल्या शरीरावरील मळापासून एक मुलगा तयार केला ज्याच्यावर ती आंघोळीला गेली असता कुणालाही आत येण्याची परवानगी देऊ नये अशी जबाबदारी टाकली होती. कदाचित म्हणूनच गणपतीची मूर्ती मातीपासून बनविण्याची प्रथा आहे. यात अर्थपूर्ण भाव आहे. विसर्जनानंतर मूर्तीची माती परत धरतीकडेच जाते. त्यामुळे निसर्गाचे प्रदूषण होत नाही, उलट संगोपन होते.
हल्ली प्लास्टर ऑङ्ग पॅरीसच्या मूर्ती चांगल्या दिसतात म्हणून बनविल्या जातात. पण त्यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होतो. कायद्याने त्यांच्यावर बंदी आहे, पण लोकशिक्षण जरुरी आहे. खरे ज्ञान झाल्यावर व्यक्ती आपोआप कायद्याचे पालन करणार ही अपेक्षा आहे.
असा हा सुंदर – आकर्षक – सर्वांच्या आवडीचा गणपती. असे ज्ञान मिळाल्यानंतर ईश्‍वर प्रणिधान सहज प्रेमपूर्वक होणार.