योगसाधना – २६० योगमार्ग – राजयोग स्वाध्याय – ८७

0
120

– डॉ. सीताकांत घाणेकर

दुर्भाग्याने ही ‘दारु संस्कृती’ झपाट्याने सर्व समाजात पसरत आहे आणि अनेकांचे पिण्यावर नियंत्रण नाही. काहीजण म्हणतात की ते दारू घेतात याचे कारण म्हणजे सामाजिक प्रथा. पण इतर काही आहेत ते म्हणतात, ‘‘आम्ही मनःशांतीसाठी दारू घेतो’’.
खरेच मिळते का हो, मनःशांती दारूमुळे?

विश्‍वांत एकही असा प्राणी नाही ज्याला सुखशांतीची अपेक्षा नाही. मानवही एक प्राणीच आहे. त्यामुळे साहजिकच त्यालाही या घटकांची गरज आहेच. विधात्याने त्याला एक विशेष गोष्ट दिली आहे ती म्हणजे बुद्धी! पण म्हणतात ना ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’. त्यामुळे सर्व मानवांची बुद्धी वेगवेगळी असते. म्हणून प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत, क्षमता वेगळी असते. म्हणूनच आपण विश्‍वाकडे चौफेर नजर फिरवतो तेव्हा लक्षात येते की यामुळेच सुख-शांतीची प्रत्येकाची अपेक्षा वेगळी दिसते.
एका व्यक्तीला ज्या गोष्टीत सुख-शांती मिळते तशी दुसर्‍या व्यक्तीला त्यातच ती मिळेल याची बिलकुल शाश्‍वती नाही. विविध देशांत, संस्कृतीत सुख-शांतीच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. एवढेच नव्हे तर एकाच कुटुंबातसुद्धा विविध मते असू शकतात. यात वावगे काहीच नाही. सुशिक्षित, सुसंस्कृत व्यक्तींनी तरी या मुद्यावर थोडा विचार करणे आवश्यक आहे. असे केले तरच कुटुंबात, घरांत, समाजांत, विश्‍वांत सुख-शांती अनुभवाला येईल. पण सहसा असे घडत नाही. प्रत्येकाच्या संस्कारांप्रमाणे, बुद्धीच्या उंचीप्रमाणे वेगवेगळी मते असतात. म्हणूनच या मुद्याचा सखोल अभ्यास सूज्ञ मानवाने तरी करायला हवा. म्हणजेच या विषयावर स्वाध्याय हवा.
अनादि काळापासून आपले विचार दुसर्‍यावर लादण्याची वृत्ती दिसते- मग तो देश भारत असू दे किंवा परदेश असू दे. ते कुठलेही युग असू दे- सत्य, द्वापार वा कलियुग! याचे कारण म्हणजे व्यक्तीचा स्वार्थ व अहंकार. एक गोष्ट अवश्य आहे की प्रत्येक व्यक्ती अशीच असेल असे नाही. अनेक चांगल्या व्यक्तीदेखील जगाच्या इतिहासात सापडतात. त्यांनी स्वतःच्या सुखशांतीवर लाथ मारून समाजासाठी आपले जीवन घालवले. स्वातंत्र्य सैनिकांनी तर आपले जीवन देश, संस्कृतीसाठी समर्पित केले. स्वतःच्या जीवनाचे बलिदान दिले व तेही हसत हसत. त्यांना त्यातच सुखशांती मिळाली. या गटात अनेक साधुसंत सत्पुरुष आहेत. एवढेच नव्हे तर अवतारही आहेत.
योगसाधकाने ज्ञानयोगाचा सखोल अभ्यास केला तर अशी अनेक ज्वलंत उदाहरणे सापडतील. गरज आहे ती शास्त्रशुद्ध योगसाधनेची – सर्व मार्ग व पैलूंचा अभ्यास करण्याची.
आपण विचार करत होतो आहार या एका अतिमहत्त्वपूर्ण पैलूचा. यामध्ये भारतीय संस्कृतीचे चांगले दर्शन होते. त्यात प्रगती व अधोगती दोन्हीही बघायला मिळतात. पूर्वीचा भटक्या मानव जंगली जनावरांसारखा फक्त मांसाहार करत होता. मग त्याचा ऋषि-कृषि संस्कृतीशी संबंध आला. द्रष्ट्या ऋषींकडून त्याला मानवी संस्कृतीचे ज्ञान उपलब्ध झाले. धान्य व शाकभाज्या उत्पन्न करण्यात तो निष्णात झाला. साहजिकच त्याचा कल शाकाहाराकडे वळला. म्हणजेच त्याची प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली.
दुर्भाग्याने काही व्यक्ती परत मांसाहाराकडे वळले. जिभेला मांसाची चटक लागली. सुरुवातीला फक्त मासळी खाणारा हा मानव मांस खाऊ लागला. आधी कोंबडी, मग बकरा, अंडी व तद्नंतर गाय, डुक्कर, काही ठिकाणी तर कुत्रा, साप, कासव… असे अनेक प्राण्यांचे मांस खाल्ले जाते. मानवाने शरीर शाकाहारासाठी बनवले आहे. त्यादृष्टीने विचार केला तर हे पाऊल अधोगतीकडे चालले आहे असे वाटते. हल्लीच्या काळात तर पाश्‍चात्त्य संस्कृतीचा जबरदस्त पगडा भारतीय जनमानसावर पडला आहे. त्यामुळे कोणत्याही समारंभाला- वाढदिवस, लग्नाचे रिसेप्शन इतर अनेक बैठकांमध्ये मांसाचे भक्षण सहज होते. मांसापासून बनवलेले जिन्नस जेवणात नसतील तर अनेकांना आवडत नाही. काही नाराज होतात तर काहींना राग येतो. तसेच या मांसाहारात अनेकवेळा ताळमेळ नसतो. मासळीचे किती तुकडे खावेत… कोंबडीच्या किती तंगड्या (लेग पीस)… त्यामुळे अनेकांना त्या वस्तू मिळत नाहीत. अशा वेळी मनात प्रश्‍न येतो की काय आम्ही समारंभात भेटतो ते फक्त जेवणासाठी की जुने संबंध दृढ करण्यासाठी अथवा नवे संबंध, ओळखी प्रस्थापित करण्यासाठी?
खरे म्हणजे – भेटणे – हे मुख्य आहे आणि भेटल्यानंतर एकत्र बसून गप्पागोष्टी करत जेवणे हे साहजिकच आले. पण आजच्या धकाधकीच्या जीवनांत भेटण्याला आम्ही तेवढे महत्त्व देत नाही. केव्हा केव्हा खाण्याचा अतिरेक कसा होतो याचे एक उदाहरण पाहू.
* एका लग्नाच्या रिसेप्शनला ‘स्वीट डीश’ म्हणून बासुंदी केली होती. जेव्हा काहीजण बासुंदी खायला गेले तेव्हा त्यांना सांगितले गेले की बासुंदी संपली. अशा घटना घडल्या की काही लोकांना लगेच राग येतो. त्यांनी जाऊन यजमानाला ही गोष्ट सांगितली. त्यालादेखील राग आला. त्याने जेवण बनवणार्‍या कॉन्ट्रॅक्टरला जाब विचारला- ‘बासुंदी संपली कशी?’
तो कॉंट्रॅक्टर अनुभवी होता. त्याने स्पष्ट सांगितले, ‘‘आपण ५०० लोकांचे जेवण बनवायला सांगितले होते. त्याप्रमाणे मी ५०० वाट्या बासुंदी बनवली. वीस-पंचवीस जास्तच होत्या. कारण आपण असे गृहित धरतो की एक व्यक्ती एकच वाटी बासुंदी खाणार! पण आमच्या आमंत्रितांनी तर २-२, ३-३ वाट्या बासुंदी खाल्ली. त्यांना मी तर अडवू शकत नाही. तसेच बासुंदी संपली म्हणून इतरांसाठी बासुंदी आणखी बनवू शकत नाही. आइस्क्रीम असते तर ते जास्त प्रमाणात असते. तरी आपण मला क्षमा करा. माझी काही चूक झाल्यास मला मार्गदर्शन करा.’’ अशा वेळी जाब विचारायला गेलेल्या यजमानाची व इतरांची काय अवस्था झाली असेल याची आम्ही कल्पना करू शकतो.
सारांश – इतरांना दोष देण्यापूर्वी कुठल्याही घटनेला आपण स्वतः व आपले लोक किती जबाबदार आहोत… याचा विचार सूज्ञ माणसाने करणे आवश्यक आहे.
हल्ली आणखी एक पाश्‍चात्त्य पद्धत भारतात फार जलद गतीने प्रचलीत होत आहे- ती म्हणजे समारंभाला दारू देणे व पिणे. ज्या समारंभात दारू नसते तो समारंभ अनेकांना पसंत नसतो. – मग तो वाढदिवस (छोट्या पाळण्यातल्या मुलाचा) असो, मुंज-लग्नाचे रिसेप्शन असो!
अनेक पाश्‍चात्त्य देशात कडाक्याची थंडी असते. त्यामुळे शरीराला उष्णता मिळविण्यासाठी दारू हा त्यांच्या दैनंदिन आहाराचा अविभाज्य घटक आहे. शिवाय दारू घेण्यावरही नियंत्रण असते. बेवडा होईपर्यंत ती प्यायची नसते. आमच्या बालपणात दारू पिणे हे सज्जनांचे लक्षण नव्हते, खास करून हिंदू समाजात. त्यामुळे जे काही मोजके हिंदू दारू पित होते त्यांच्याबद्दल इतरांच्या मनात थोडा राग असे.
अनेक ख्रिश्‍चन मात्र दारू पित असत पण तीही अगदी मर्यादित. बहुतेकवेळा पुरुष दारू घेत… व्हिस्की, फेणी… वगैरे. काही महिला बियर, वाईन घेत असत.
काही जणांचा गैरसमज असे की गोव्यात सगळेच जण दारू पितात. याचे एक कारण म्हणजे जेव्हा गोव्याबाहेरील लोक आपल्या घरी येतात तेव्हा त्यांना दारू पाजण्याची प्रथा हल्ली सुरू झाली आहे.
बालपणात अनेक ख्रिश्‍चन मुले आमच्याबरोबर शिकत असत. आम्ही एकमेकांच्या घरी जात असू. त्यावेळी संध्याकाळच्या वेळी एक दृश्य नियमित दिसत असे.
* वयस्कर पुरुष एका ग्लासात दारू घालून पीत असत. फेणी असली तर ती पाण्यासारखी दिसत असे. पण आश्‍चर्य म्हणजे की आपण पाणी घटाघटा पितोे तसे ते पीत नसत. छोटा छोटा घोट घेत असत. त्यावेळी मला माहीत नव्हते की ती दारू होती. म्हणून अज्ञानाने मी एक दिवशी त्यांना विचारले, ‘‘आपण पाणी असे का पिता?’’ तेव्हा ते हसायला लागले व म्हणाले, ‘‘बाळा हे पाणी नाही, ही काजूची फेणी आहे. तुमच्या घरी ही पद्धत नाही म्हणून तुला माहीत नाही. पण काही हरकत नाही.’’
दुर्भाग्याने ही ‘दारु संस्कृती’ झपाट्याने सर्व समाजात पसरत आहे आणि अनेकांचे पिण्यावर नियंत्रण नाही. काहीजण म्हणतात की ते दारू घेतात याचे कारण म्हणजे सामाजिक प्रथा. पण इतर काही आहेत ते म्हणतात, ‘‘आम्ही मनःशांतीसाठी दारू घेतो’’.
खरेच मिळते का हो, मनःशांती दारूमुळे? त्यापेक्षा योगसाधनेतील भक्तियोग, धारणा, ध्यान केल्याने कितीतरी पटींनी जास्त मनःशांती मिळते. तसेच ही गोष्ट भारतीय संस्कृतीला धरून आहे. यामुळे सर्व पैलूंनी मानवाचा विकास होतो.