योगसाधना – २५६ योगमार्ग – राजयोग स्वाध्याय – ८३

0
104

– डॉ. सीताकांत घाणेक

* जशी करणी… तशी भरणी!
हे चारच छोटे शब्द, पण त्यांत आमच्यातील प्रत्येकासाठी फार मोठी शिकवण दडलेली आहे. त्यासाठी शास्त्रशुद्ध स्वाध्याय आवश्यक आहे. पण आजच्या तथाकथित धकाधकीच्या जीवनात बहुतेक जनतेला ‘थोडादेखील वेळ नाही’.

 

प्रत्येक प्राण्याच्या जीवनात अनेक गोष्टी अत्यावश्यक असतात- त्यांतील एक म्हणजे आरोग्य. पण काही लोक विसरतात की आरोग्य चांगले राखण्यासाठी काही गोष्टी पाळणे गरजेचे आहे. तसेच मानवासाठी फक्त शारीरिक आरोग्यच नाही तर मानसिक, भावनिक, सामाजिक व आध्यात्मिक आरोग्यसुद्धा महत्त्वाचे आहे. या संदर्भात अभ्यास व चिंतन केले, तसे आचरण केले तर मानवाचा व विश्‍वाचा संपूर्ण जीवनविकास होईल. सर्वांना व सगळीकडे सुखशांती नांदेल.
मानवी जीवनाचा व विश्‍वाचा विचार केला तर विश्‍वकर्त्याची हीच भावना व इच्छा आहे- हे सर्व विश्‍व निर्माण करण्यामागेसुद्धा त्याची इच्छा असून काय उपयोग? त्यानेच निर्माण केलेल्या अत्यंत बुद्धिमान अशा मानवाने या विषयावर चिंतन करायला हवे. आजकाल विश्‍वाकडे सहज नजर टाकली तर असे काही योग्य दिशेने चालले आहे असे दिसत नाही. सर्व पैलूंनी आरोग्य बिघडले आहेच, पण दुःखाची व चिंतेची बाब म्हणजे आपला प्रवास विनाशाकडे चालला आहे, असे दृश्य दिसते. दुर्भाग्याने हा प्रवास अत्यंत जलद गतीने चालू आहे. अगदी घोडदौड चालू आहे, असे म्हटले तरी वावगे होणार नाही.
विश्‍वातील बुद्धिवंतांना व हितचिंतकांना याची जाणीव नाही असे नाही. प्रत्येक क्षणी कुठेतरी चर्चासत्रे आयोजित केली जातात. या समस्येवर उपाय शोधले जातात, सुचवले जातात. पण ज्या प्रमाणात या संदर्भात आचरण व्हायला हवे ते होताना स्पष्ट दिसत नाही. सारांश म्हणजे फक्त थोडे ठिगळ लावायचे कार्य चालले आहे, असेच चित्र आज दिसते आहे.
आपल्यासारखे सामान्य लोक विचार करतील या एवढ्या मोठ्या वैश्‍विक समस्येत मी काय करू शकणार? हा विचार अत्यंत घातक आणि नकारात्मक विचार आहे. अनेक व्यक्ती मिळून कुटुंब-समाज-देश-विश्‍व बनते. जर प्रत्येकाने असाच विचार केला तर विश्‍वाला तारणारा कुणीही नाही. कारण शास्त्रानुसार निसर्ग त्याच्या कायद्याप्रमाणेच चालतो. शिवाय सृष्टिकर्ता- ज्याला आपण भगवंत म्हणतो तो या संदर्भात हस्तक्षेप करीत नाही. ते एका वाक्यात संपूर्ण तत्त्वज्ञान समजावतात…
* जशी करणी… तशी भरणी!
हे चारच छोटे शब्द, पण त्यांत आमच्यातील प्रत्येकासाठी फार मोठी शिकवण दडलेली आहे. त्यासाठी शास्त्रशुद्ध स्वाध्याय आवश्यक आहे. पण आजच्या तथाकथित धकाधकीच्या जीवनात बहुतेक जनतेला ‘थोडादेखील वेळ नाही’. खरें म्हणजे या विषयाला तेवढे प्राधान्य दिले जात नाही म्हणून आम्ही त्यासाठी वेळ काढत नाही.
प्रत्येक व्यक्तीने आपले आचरण निसर्ग-नियमांप्रमाणे केले तर विश्‍वाची दिशा विध्वंसाकडून, विनाशाकडून विकासाकडे सहज वळेल! आपला ‘खारीचा वाटा’तरी प्रत्येकाने द्यायला हवा- राज्यकर्ते, सरकारी नोकर, धंदेवाईक, व्यावसायिक, श्रीमंत-गरीब, स्त्री-पुरुष, बालक-तरुण-वृद्ध, सुशिक्षित-अशिक्षित… फक्त गरज आहे ती म्हणजे इच्छाशक्तीची! काही गोष्टी आम्हाला सहज बोध करून देतात. त्यापैकीच एक म्हणजे रामायणातील खारीची गोष्ट!
* वानरगण रामाचा सेतू बांधण्यात व्यस्त होते. झाडावर बसून एक छोटीशी खार हे सगळे दृश्य बघत होती. हे सर्व काय चालले आहे हे समजण्यासाठी ती खार वानराना याबद्दल विचारू लागली. तिला जेव्हा सीतामातेबद्दल समजले त्यावेळी तिला फार दुःख झाले. तिनेदेखील ठरवले की या दैवी कार्यात मी माझा वाटा देईन. तिला तर मोठे दगड उचलणे शक्यच नव्हते. म्हणून तिने आपल्या पाठीवर थोडी माती घेतली व ती त्या त्या दगडांमध्ये टाकू लागली.
वानरांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा ते हसायला लागले. तिची मस्करी करायला लागले. काहीजण तर तिच्यावर ओरडलेदेखील. कारण या गडबडीत ती छोटी खार चिरडण्याचीही शक्यता होती. बाचाबाची व भांडण सुरू झाले. पण खार काही ऐकेना. ती म्हणाली, ‘‘तुम्ही तुमच्या अफाट शक्तीने काम करा. मी माझ्या शक्तीनुसार करीन’’. वानरही ऐकेनात.
प्रभू रामचंद्रांनी खार व वानरांना आपल्याकडे बोलावून सर्व प्रकरण समजून घेतले. त्यांना त्या एवढ्याशा प्राण्याचे कौतुक वाटले.- ‘‘मूर्ती लहान पण कीर्ती महान!’’ त्यांनी त्या खारीचे भगवंतावरील प्रेम जाणले. त्या खारीला त्यांनी उचलून घेतले व अत्यंत आत्मियतेने त्या खारीच्या पाठीवरून बोटे फिरवायला लागले. म्हणूनच पाठीवर तीन पट्टे दिसतात.
बालपणी घरांतील वयस्कर किंवा गुरुजी अशा गोष्टी तिखट-मीठ लावून प्रेमाने सांगत असत. आपल्यातील अनेकांनी अशा छान छान गोष्टी ऐकल्या आहेत. पण झाले काय, आज गुरुजीही नाहीत, आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळीही देवाघरी गेलीत. आणि आम्ही..? मोठे झालो आणि आपल्या कामात गुंतलो..! गोष्ट पुस्तकात राहिली आणि आम्ही सर्व विसरलो. केव्हा केव्हा विचारही करतो… ‘‘हा काय मूर्खपणा? वानर, खार, केव्हा एकमेकांकडे बोलतात का? रामांना देवाचा अवतार मानले तरी त्यांची भाषा प्राण्यांना कशी समजली?… अशा हजार शंका-कुशंका!
सारांश काय?…
जसे गुरुजी म्हणायचे तसेच घडले. * नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारें! आपण तथाकथित बुद्धिमान, सुशिक्षित विसरतो की गोष्टीतील सत्यासत्यता पाहायची नसते तर त्यातून काय बोध घेण्यासारखा आहे त्यावर विचार करायचा असतो.
हजारो वर्षांपूर्वी भारतीय तत्त्ववेत्ते म्हणजे ऋषी-महर्षी, संत-महापुरुष यांनी अशा अतिमहत्त्वपूर्ण विषयांवर विचार केला, अभ्यास.. चिंतन केले. त्यातील काही गोष्टी तत्त्वज्ञानाच्या स्वरूपाने सांगितल्या तर काही गोष्टीरूपात समजावल्या.
जेव्हा आपण आरोग्य या विषयावर विचार करतो तेव्हा एक गोष्ट तरी समजू शकतो की आम्ही विश्‍वाचा विचार जरूर करावा पण आपण आमच्या स्वतःच्या छोट्याशा विश्‍वाबद्दल तरी बघू या. ‘आमचा खारीचा वाटा उचलू या!’’
योगशास्त्रामध्ये या संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन उपलब्ध आहे. म्हणून योगसाधकांनी चार पैलूंवर चिंतन करायला हवे…
* आहार-विहार-आचार-विचार!
भारतियांसाठी आनंदाची व अभिमानाची गोष्ट म्हणजे संयुक्त राष्ट्रांनी २१ जून हा जागतिक योग-दिवस म्हणून मानला आहे. त्यासाठी ध्येय आहे- * जागतिक ऐक्य व शांतीसाठी योग!
संयुक्त राष्ट्रातील विद्वानांना जगाची चिंता करू दे. आपण आपल्यासाठी ध्येय ठरवू या.
* आरोग्यं धन संपदा!
– आरोग्याच्या सर्व पैलूंनी प्रगती करू या. म्हणूनच योगसाधनादेखील सर्व मार्गांनी व पैलूंनी करणे गरजेचे आहे.