योगसाधना अंतरंग योग

0
189
  • डॉ. सीताकांत घाणेकर

 

आपण सर्व वेळोवेळी आपल्या राज्यकर्त्यांकडून सूचना मिळतात त्यांचे पालन करू या. पण त्याचबरोबर शास्त्रशुद्ध योगसाधना करून आपल्या सर्व शक्ती वाढवू या- शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, आत्मिक तशीच रोगप्रतिकारशक्तीसुद्धा!

 

बालपणात आम्ही एक गीत रेडिओवर ऐकत होतो….

* पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा….

– त्या वयात बुद्धी परिपक्व नव्हती म्हणून त्या ओळींचा अर्थ जाणून घ्यावा असे वाटलेदेखील नाही. त्यानंतर तरुण वयात पदार्पण झाले. विज्ञान शाखेत प्रवेश केला. वैद्यकीय ज्ञान घ्यायला सुरुवात केली. प्रत्येक क्षेत्रात मानवाची नेत्रदीपक प्रगती बघितली व ते गीत केव्हाच विसरून गेलो.

आणि आता विश्‍वासमोर एक फार मोठे संकट एका सूक्ष्म व्हायरसमुळे ‘आ वासून’ उभे आहे – कोरोना व्हायरस. ह्यापूर्वीसुद्धा ‘सार्स’च्या रूपाने किंवा अन्य रोगांनी माणसांना सतावले होते.  पण यावेळी काही वेगळेच घडते आहे.

मोठमोठे बलाढ्य प्रगतीशील देश हतबल होताना दिसत आहेत. ते भयभीत झालेले दिसतात. मानवाची शांती ढळते आहे. नक्की काय उपाय आहे याचे संपूर्ण ज्ञान अजूनही प्राप्त झालेले नाही. अवश्य संशोधन जोरात चालू आहे. आशा ठेवू या.

दुःखाची गोष्ट म्हणजे त्या प्रगत देशांनाच सध्यातरी जास्त झळ बसलेली आहे. रोग्यांचे प्रमाण व मृत्यू तिथेच जास्त प्रमाणात आहेत. त्या मानाने भारतात रोगाचा प्रभाव कमी दिसतो. नक्की कारणे काहीही असू देत पण आपण दक्षता पाळायलाच हवी. पुढे काय होईल सांगता येत नाही.

खरे म्हणजे अशी नैसर्गिक संकटे विश्‍वात येतच राहतात- वादळे, भूकंप, दुष्काळ, पूर… पण ही सर्व अल्पकाळ असतात. शक्यतो रहदारी चालू असते. तसेच या सर्व घटना एका विशिष्ट भागातच घडतात. इथे तर संकट वैश्‍विक आहे. सगळीकडे ‘लॉकडाऊन’ आहे. म्हणजे आपले घर हेच आपले तुरुंग झाले आहे. काही अत्यावश्यक सेवा सोडून सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत.

खरे म्हणजे सर्व मानवतेने अशा सेवाधारी कामगारांचे आभार मानायला हवेत.  स्वतःचा जीव धोक्यात घालून ही सर्व मंडळी हे कार्य करत आहेत. त्यांचे ऋण कुणीही फेडू शकणार नाही. फक्त त्यांच्या आरोग्यासाठी आपण सर्व प्रार्थना करू शकतो.

अशावेळी माणसाला तत्त्वज्ञान सुचते. आपण ८ ते साडे आठ वर्षे योगसाधना या विषयाचा अभ्यास व चिंतन करताना मानवाचा जीवनविकास व कल्याणाचा सखोल विचार करत आहोत. आता कोरोनाच्या संदर्भात त्याची उजळणी करायला हवी.

प्रत्येक सूज्ञ व्यक्तीच्या मनात विचार येणे अत्यावश्यक आहे…

– हे सर्व असे का घडते? का घडले?

– तरच त्या व्यक्तीची सद्सद्विवेकबुद्धी जागत आहे असे म्हणायला हवे. आपण तर अनेक वेळा म्हटले आहे की मानवाची विनाशाकडे घोडदौड चालू आहे.

आपल्या भारतीय संस्कृतीत ऋषींनी, संतांनी, महापुरुषांनी निसर्गाला फार महत्त्व दिले होते. त्यांनी-

* जीव- जगत- जगदीश यांच्या परस्पर संबंधाबद्दल विचार केला होता.

* पंचमहाभूते – पथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश – यांना मातेच्या व ईश्‍वराच्या रूपात बघितले होते. त्यांची ते पूजा करत होते.

* मानवाबरोबर पशु- पक्षी- प्राणी- जीवजंतू… यांचे महत्त्व समजून त्यांचा योग्य उपयोग केला होता. त्याचबरोबर त्यांचा सांभाळ केला होता. त्यांना प्रेम दिले होते.

* नाले- नदी- सागर- महासागर- वृक्ष- वनस्पती… यांचा आदर केला.

* मानव जीवनाचा हेतू समजून त्याला सर्वांगीण जीवन विकासाचे ध्येय दिले होते.

* तपश्‍चर्या, ध्यान- धारणा करून मानवाच्या कल्याणासाठी विविध ज्ञानपूर्ण साहित्य तयार केले होते… वेद, उपनिषदे, योग, संहिता… एकापेक्षा एक सरस.

* मानवाने कसे शहाणपणाने वागावे यासाठी दोन प्रमुख महाकाव्ये- रामायण व महाभारत, तसेच भागवत, पुराणे… यांची उत्पत्ती केली होती.

आणि मुख्य म्हणजे ईश्‍वराला तो विसरला नव्हता. त्या सर्वशक्तिमान भगवंताचा स्वतःचा पुत्र समजून त्याची भक्ती केली होती. त्याच्यावर दृढ श्रद्धा ठेवली होती. थोडादेखील उद्धटपणा केला नव्हता. रावण, हिरण्यकश्यपू, कंस, जरासंध, धृतराष्ट्र, दुर्योधन, दुःशासन, शकुनी… असे अनेक योद्धे- महायोद्धे देवभक्त होते पण त्यांचा अहंकार वाढला होता. त्यांचा नाश झाला.

आणि आजचा मानव काय करतो आहे? त्याला स्वतःच्या ज्ञानाचा, शक्तीचा मद चढला. तोदेखील उद्धट झाला. आत्मकेंद्री, स्वार्थी बनला. मानवता विसरला. महाभयंकर आयुधे, शस्त्रे, … अणुबॉंबसारखी .. बनवायला लागला. विज्ञानाचा दुरुपयोग करायला लागला. निसर्गावर अत्याचार करून स्वतःवरच संकट ओढवून आणायला लागला. स्वतःच्या स्वार्थासाठी पशु-पक्षांवर प्रयोग करायला सुरुवात केली. उदा. ‘ऑक्सीटोसीन हॉर्मोन’ वापरून गाईच्या दूधात वाढ करणे, ‘कॅल्शियम कार्बाइड’ वापरून भाज्या- फळे पिकवणे. नैसर्गिक खते व जंतुनाशके न वापरता घातक रसायने वापरणे. मानवाने शाकाहार सोडला व मांसाहाराकडे वळला. गोव्यात तर ‘फार्मालीन’ हे रसायन मासळीसाठी वापरतात हे सर्वांनाच माहीत आहे.

सर्व तर्‍हेची व्यसने माणसाला जडली- दारु, सिगरेट, तंबाखू. गोव्याचे आर्थिक व्यवहार तर कॅसिनोवरच चालतात, असे म्हटले जाते. निसर्गरम्य गोव्यात पर्यटन हा चांगला व्यवसाय होता. पण तिथेदेखील अनैतिक व्यवहार सुरू झाले.  पूर्वी खाणधंदा हा गोव्याचा कणा होता. पण तिथेसुद्धा अमर्याद व्यवहार सुरू झाले. गैरव्यवहार झाले…

या सगळ्याचे विविध परिणाम प्रत्येकाला माहीत आहेत. पण असे म्हटले जाते की राजसत्तेचाच या सर्व गोष्टींमध्ये सहभाग आहे. राज्यकर्त्यांचा याला पाठिंबा आहे.  अशा गोष्टी फक्त गोव्यात नव्हे तर जगातील विविध देशात चालू आहेत.

नैतिक शिक्षण नसल्यामुळे मानव भोगातच भूषण मानू लागला. भोगमयी जीवनाला प्रतिष्ठा आली. आरोग्य बिघडायला लागले. ‘आरोग्यं धनसंपदा’- हे तो विसरला.

या विविध विषयांवर आपले चिंतन झालेले आहे. कारणे माहीत झालेली आहेत. योगसाधनेत यावर उपायदेखील बघितले होते.

स्वामी विवेकानंदांनी म्हटले होते की मानवाच्या प्रगतीसाठी गरज आहे ती – पाश्‍चात्त्यांच्या विज्ञानाची व पौर्वात्यांच्या आध्यात्मिकतेची! पण बहुतेक जणांनी अध्यात्म म्हणजे नक्की काय ते समजून घेतलेच नाही.

एक आशेचा किरण काही वर्षांपूर्वी आला– वैश्‍विक योगदिन (२१ जून) यामुळे. त्या दिवशी युनायटेड नेशन्समध्ये त्या दिवसाचे ब्रीदवाक्य दिले होते- योग फॉर हार्मनी अँड पीस.

‘सहभाग, समरसता व शांतीसाठी योग’. पण अपेक्षित घडताना मात्र दिसत नाही. योग फक्त शारीरिक व्यायामासारखा केला जातो. त्यातील तत्त्वज्ञान समजून घेतले जात नाही. अपवाद अवश्य आहेत.

या सदरात आपण पुष्कळ अभ्यास केला होता. योगच्या विविध पैलूंवर विचार केला होता…..

* योगाच्या व्याख्या

* योगमार्ग – ज्ञान, भक्ती, कर्म, अष्टांग योग (राजयोग)

* पंचकोश – अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय – अष्टांगयोगामध्ये सर्व अंगांवर सखोल चिंतन केले होते.

१. यम – अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह (सद्वर्तनाचे आदेश)

२. नियम- शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्‍वर प्रणिधान (आत्मशुद्धीसाठी आत्मशासनाचे आदेश).

३. आसन – फक्त शारीरिक व्यायाम नाही तर (स्थिरम् सुखम् आसनम्)

४. प्राणायाम – प्राणशक्तीवर नियंत्रण (केवळ श्‍वासाचे व्यायाम नाही)

५. प्रत्याहार – उपभोगाच्या विषयापासून इंद्रियांवर नियंत्रण.

– ज्ञानेंद्रिये ः डोळे (रूप), कान (शब्द), नाक (गंध), जीभ (रस), कातडी (स्पर्श).

– कर्मेंद्रिये ः हाक, पाय, जीभ (वाचा), उत्सर्जन क्रिया (मलमूत्र विसर्जन), जननेंद्रिये.

६. धारणा, ७. ध्यान, ८. समाधी… ही तीन अंतरंग योगातील आहेत. त्यावर विचार चालू आहे. त्याचबरोबर प्राणायाम आणि शुद्धिक्रिया कपालभाती. आपण पुष्कळ वेळा श्रीमद्भगवद्गीतेचासुद्धा अभ्यास केला – विविध श्‍लोकांचा- कारण गीता म्हणजे संपूर्ण योगशास्त्रच आहे. त्याशिवाय गीतेला महत्त्व आहे कारण ती स्वतः सृष्टिकर्ता भगवान श्रीकृष्णाच्या मुखारविंदातून मानवतेच्या कल्याणासाठी अर्जुनाला निमित्त करून सांगितली आहे.

गीतेत विविध योग आहेत. पण तिथे फार मौलिक गुह्यज्ञान म्हणजे आत्मज्ञान आहे. मोह-माया, सांसारिक पाशात न पडता आत्मज्ञान वापरून आत्ममुक्ती कशी मिळवावी त्याबद्दल संपूर्ण माहिती आहे.

भगवंताला आपणच घडवलेल्या विश्‍वाची, आपल्या प्रिय पुत्रांची चिंता आहे, म्हणून भारतात तो अवतार म्हणून स्वतः आला व येतो. त्याशिवाय विश्‍वातील इतर राष्ट्रात विविध रूपात आला- येशु ख्रिस्त, पैगंबर…

पण आपण काय केले? वेगवेगळे धर्म उभे करून परस्परांत भांडणे सुरू केली. त्याशिवाय वेळोवेळी शेकडो संतमहापुरुषांनी येऊन जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले. प्रेम व शांतीने कसे जगावे हे प्रात्यक्षिकही दाखवले- स्वतः कष्ट सोसून, संकटांचा सामना करत… पण दुर्भाग्य या पराधीन मानवपुत्राचे. तो जरादेखील शहाणा होत नाही. कारणे अनेक असतील….

षड्‌रिपु – काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार, मायेचा प्रभाव.

कदाचित भगवंताने कोरोनाच्या रूपात मानवाला शहाणपण शिकवण्यासाठी पाठवले असेल. आपण सर्व वेळोवेळी आपल्या राज्यकर्त्यांकडून सूचना मिळतात त्यांचे पालन करू या. पण त्याचबरोबर शास्त्रशुद्ध योगसाधना करून आपल्या सर्व शक्ती वाढवू या- शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, आत्मिक तशीच रोगप्रतिकारशक्तीसुद्धा!

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी म्हटल्याप्रमाणे… ‘‘ज्यांना कोरोना होतो त्यांच्यावर आपण करुणा करुया, तसेच आमच्यासाठी कार्य करणार्‍यांसाठी भगवंताची करुणा मागू या!