योगसाधक होण्याचा संकल्प करूया!

0
282
  •  पंकज अरविंद सायनेकर

नियमित योगाभ्यासाद्वारे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. आसन अभ्यासाने शरीर तंदुरुस्त होते, स्नायू बळकट आणि लवचिक होतात. हाडांची योग्य वाढ होते, अवयव सुदृढ होतात. प्राणायामाद्वारे श्वासोच्छ्वास, हृदय, फुफ्फुसे बळकट होतात, फुफ्फुसांची ऑक्सीजन धरून राहण्याची क्षमता, कार्बन-डाय-ऑक्साईडला सहन करण्याची क्षमता वाढते.

भारतीय संस्कृतीमध्ये वैविध्य आहे. दक्षिणेपासून उत्तरेकडे किंवा पूर्वेपासून पश्चिमेकडे, पदोपदी विविधता दिसून येते. संस्कृतीमध्ये विविधता, विचारांमध्ये विविधता, वेगवेगळे संगीत, राहणीमान, जेवण-खाण इत्यादी. आम्ही म्हणतो, पावला-पावलावर भाषा बदलते. त्यामुळे वैविध्य असणे तर फारच साहजिक गोष्ट आहे. पण, हे वैविध्य जरी असले, तरी आम्ही ‘सर्व भारतीय एक आहोत’ असेच म्हणतो. विविधता मे एकता हा आमचा नारा आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ हे आम्हाला आमच्या संस्कृतीतून, आमच्या संस्कारातून मिळाले आहे. ही शिकवण आम्हाला अनेक संस्कृतींपैकी योग-संस्कृती शिकवते. योग, ज्या शब्दाचा अर्थ ‘जुळणे’ (योग हा शब्द यूज् या संस्कृत धातूपासून बनला आहे) असा आहे. जो मनाला जुळवतो, माणसांना एकत्र आणतो तो योग. कधी कोणी भेटला की लगेच आपण म्हणतो ना, आज योग होता भेटण्याचा, योगायोगाने भेट झाली, इत्यादी. पण योग म्हणजे नक्की आहे काय… याचा विचार केलाय का आम्ही? योग म्हणजे फक्त आसन प्राणायाम का? शरीराला वेगवेगळ्या पद्धतीने वाकवणे, श्वास रोखून धरणे म्हणजे योग काय? जगाच्या उत्पत्तीपासूनच योग हा एक गहन विषय आहे. कोणी याच्याकडे फक्त व्यायाम म्हणून बघतो, कोणी श्वासोच्छ्वासावरील नियंत्रण. कोणी म्हणतो की योग रोगाचा नायनाट करतो तर कोणी म्हणतात शरीरातील व्याधी योगाच्या मदतीने नाहीश्या होतात. योग एक जीवन पद्धती आहे आणि प्रत्येकाची जीवनशैली निश्चितच वेगवेगळी असते. प्रत्येक माणूस हा वेगळा आहे, प्रत्येकाची वृत्ती वेगळी आहे. विज्ञानातूनही हे सिद्ध झाले आहे की अगदी जुळी मुलंसुद्धा एकसारखी नसतात.

योग संस्कृती किंवा योग विद्या कधी सुरू झाली, कोणी सुरू केली, याचा निर्माता कोण याबद्दल कोणीच ठामपणे सांगू शकणार नाही. सृष्टीच्या उत्पत्तीवेळी योगविद्या अस्तित्वात आली, कोणी म्हणतात हिरण्यगर्भ योगाचे अभ्यासक होते तर काही म्हणतात की आदीदेवाने (शंकर) योग विद्या सुरू केली. कोणी म्हणतात की म. पतंजली योग संस्कृतीचे जनक आहेत तर कोण म्हणतो स्वात्माराम. हा संभ्रम जरी असला तरी आम्ही त्याकडे जास्त लक्ष न देता योगविद्या, योग सिद्धांत आत्मसात करण्यावर जास्त भर दिला पाहिजे. योग एक जीवन पद्धती आहे. योगदर्शनामध्ये (म. पतंजली संपादित) अष्टांग योग, राजयोग यावर भाष्य केले आहे. समाजात कसे वावरावे हे नियम शिकवतात, स्वतःचे आचरण कसे असावे हे यम शिकवतात. साधक कसा असावा, त्याने कर्तव्याचे पालन कसे केले पाहिजे, मनात निर्माण होणारे विचार, त्यांचे नियमन कसे करणे आणि अनेक गोष्टी म. पतंजली आपल्या योगदर्शनातून करतात. हठयोगातून आसनावर प्रभूत्व मिळवण्यासाठीचे प्रयत्न. राजयोग आणि हठयोग एकमेकांना धरून जातात. हठयोग शिकवणारे विविध ग्रंथ आहेत, जसे हठप्रदीपिका (हठयोगप्रदीपिका), घेरंड संहिता, हठरत्नावली, शिव संहिता इत्यादी. शरीरशुध्दीचे महत्व, शरीरशुध्दी कशी करावी, शुद्धी-क्रियांचा अभ्यास हठप्रदीपिकेमध्ये, घेरंड संहितेत दिला आहे. शरीर शुद्ध असेल तरच मन प्रसन्न होते. कल्पना करा, की आज ऑफिसला जाताना अंघोळ नाही केली तर? विचार सुद्धा करवत नाही. कारण अंघोळ केल्यावर एक प्रकारची उर्जा येते, शरीर ताजेतवाने होते आणि उत्साह येतो. म्हणून शरीरशुध्दी महत्वाची. शरीरशुध्दी झाली म्हणजे व्याधी होण्याचा संभव कमी होतो. त्याचबरोबर आंतरिक शुद्धीही तेवढीच महत्वाची. म्हणजे, पोट साफ असणे, मल-मूत्र विसर्जन, (धौती, बस्ती, शंखप्रक्षालन), श्वसनक्रिया सुरळीत असणे (नैतीच्या सहाय्याने करू शकतो). त्याचबरोबर वैचारिक शुद्धी जी त्राटकाच्या अभ्यासाने होते.

भगवत् गीतेतूनही योगर्षी श्रीकृष्ण आम्हाला असाच संदेश देतात. गीतेला तर योग उपनिषद असेही म्हटले आहे. ‘समत्वं योग उच्चते’, ‘योगः कर्मसु कौशलम् ‘ अशी व्याख्या गीतेमध्ये आढळते. समत्व म्हणजे योग. श्रीमंत गरीब, सुख दुःख, पाऊस ऊन वारा, काहीही आणि कोणत्याही परिस्थितीत समान अवस्था राखणे म्हणजे योग. कितीही मोठे संकट आले तर खचणार नाही. त्याचबरोबर आनंदाने हुरळून जाणार नाही अशी मनस्थिती तेव्हाच माणूस बाळगतो जेव्हा त्याचे मन काबूत असते. योगस्थः कुरू कर्माणि म्हणजेच, आपल्या कर्मामध्ये रममाण हो, असा संदेश श्रीकृष्ण देतात. कर्मयोग, भक्तीयोग, मंत्रयोग असे योगमार्ग गीतेमध्ये सांगितले आहेत. नवविधा भक्ती (श्रवण, कीर्तन, भजन, वंदन, दास्य, सख्य, पादसेवन) आम्हाला तेच शिकवते. हे आणि अशा कित्येक योगमागार्ंचा अवलंब आम्ही करू शकतो आणि इच्छित ध्येय किंवा उद्देश सफल करू शकतो.

नियमित योगाभ्यासाद्वारे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. आसन अभ्यासाने शरीर तंदुरुस्त होते, स्नायू बळकट आणि लवचिक होतात. हाडांची योग्य वाढ होते, अवयव सुदृढ होतात. प्राणायामाद्वारे श्वासोच्छ्वास, हृदय, फुफ्फुसे बळकट होतात, फुफ्फुसांची ऑक्सीजन धरून राहण्याची क्षमता, कार्बन-डाय-ऑक्साईडला सहन करण्याची क्षमता वाढते. सूर्यनमस्कार, दंडबैठका काढल्याने घाम येतो आणि त्यामुळे त्वचा टवटवीत होते. योगाभ्यास फक्त शारीरिक पातळीवरच नाही तर मानसिक, वैचारिक पातळीवरही तेवढाच प्रभाव टाकतो. आचार-विचार, आहार-विहार शुद्ध होतात. जी गोष्ट आपल्याला पाहिजे ती गोष्ट योगाभ्यासाद्वारे आम्ही मिळवू शकतो. हल्लीच्या काळात योग चांगलाच लोकप्रिय झाला आहे. जरी भारतीय संस्कृती असली तरी संपूर्ण जगात चांगल्या प्रकारे आत्मसात केला आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेंबर २०१४ ह्या दिवशी संयुक्त राष्ट्रसभेपुढे आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव मांडला आणि १९३ सदस्यांनी या प्रस्तावाला ११ डिसेंबर २०१४ रोजी मान्यता दिली. १७७ देशांनी पाठिंबा दर्शविला आणि पुढच्याच वर्षापासून, २१ जून हा दिवस २०१५ पासून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होऊ लागला. दोन दिवसांत आम्ही पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणार आहोत. तर, या योगदिनी आम्हीही योग आत्मसात करण्याचा संकल्प करूया आणि फक्त एक दिवसापुरता नव्हे तर जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याचा प्रयत्न करुया. थोडासा वेळ योग अभ्यास करण्यासाठी, स्वतःसाठी देण्याचा प्रयत्न करूया, प्रयत्न नव्हे तर संकल्प करूया आणि योगमयी होऊया.