योगमार्ग – राजयोग

0
103

(योगसाधना – २४६)

(स्वाध्याय – १२)

– डॉ. सीताकांत घाणेकर

योगसाधना करता करता साधकाला हळूहळू जाणीव व्हायला लागते की मानवदेहाचे वेगवेगळे पैलू आहेत- शरीर, मन, बुद्धी, प्राण व आत्मा. जसजशी प्रगती होते तेव्हा कळते की या सर्व पैलूंमध्ये सर्वांत मुख्य म्हणजे आत्मा. तद्नंतर त्याच्या लक्षात येते की आत्मा म्हणजे परमेश्‍वराचाच अंश असल्यामुळे तो नित्यानंदस्वरूप आहे. तो पवित्र आहे. त्याची पवित्रता नियमित सांभाळून ठेवणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे. त्यासाठी सद्गुरूकडून नित्य ज्ञानाची आवश्यकता आहे. म्हणूनच नियमित स्वाध्याय हवा.

ज्ञान मिळविण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. त्याच्याद्वारेच ज्ञान वाढते. इथे स्वामी विवेकानंदांचे मत फार महत्त्वाचे आहे. ते म्हणतात- ‘शिक्षण म्हणजे भांडे भरायचे नसते तर आत ज्ञान आहे ते योग्य पद्धतीने व्यक्त करायला हवे.’ यासाठी उत्तम उपाय म्हणजे योगसाधना.
एका अनुभवी शिक्षकाने म्हटल्याप्रमाणे – ‘आजचे शिक्षण म्हणजे – घोका आणि ओका.’ अशा पद्धतीने घोकणार्‍या विद्यार्थ्याला परीक्षेत चांगले गुण मिळतील, पाहिजे त्या क्षेत्रात प्रवेशही मिळेल. पण आत्मज्ञान झाले नाही तर तो चांगला मानव होणार याबद्दल काहीही खात्री देता येत नाही. आजच्या विश्‍वाची हीच शोकांतिका आहे.
एकदा मानवाला आत्मज्ञान झाले की मग त्यांचे मन, बुद्धी सूक्ष्म अशा आत्मिक स्तरावर कार्य करायला लागतात. जगातील सर्व प्राण्यांच्या (फक्त मानवाच्या नव्हे) ःखाची त्या व्यक्तीला जाणीव व्हायला लागते. तो अतिशय संवेदनशील बनतो. इतर प्राण्यांच्या सुखात त्याला आनंद मिळतो व इतरांच्या दुःखाने तो दुःखी होतो. अनेक संतसत्पुरुषांच्या जीवनात अशा घटना वारंवार सांगितल्या जातात.
स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील दोन घटना या संदर्भात फारच बोलक्या आहेत.
* एक दिवस आपल्या शिष्यांसमवेत बसले असता स्वामीजी म्हणाले, ‘माझे सगळे अंग जळजळते. सर्वांना काळजी वाटली की असा कोणता रोग स्वामीजींना झाला की ज्यामुळे त्यांच्या शरीराची आग-आग होते. पण स्वामीजींनीच शंकानिरसन केले की हिंद महासागरात एका बोटीला आग लागली आहे. त्यातील अनेक माणसे भाजून निघताहेत. त्यांच्या शरीरातून निघणार्‍या कंपनांमुळे माझे शरीरदेखील जळत आहे असे मला वाटते.
* एके दिवशी म्हणजे बोलता बोलता स्वामीजींचे सर्व शरीर थरथरायला लागले. चौकशीअंती कळले की कुठेतरी भूकंप झाला व त्याचवेळी स्वामीजींवर असा हा विपरीत परिणाम झाला. थोर प्रेषित महामानवांच्या आयुष्यातील घटनाच वेगळ्या. आम्हांला किती समजतील माहीत नाही. आमच्यातील काही त्यांच्यावर विश्‍वासही ठेवणार नाहीत. उलट त्यांची टीका करतील, त्यांना ढोंगी ठरवतील.
मा. एनी बेझंट यांच्या जीवनातील देखील एक घटना आहे. बेझंट दर दिवशी आपल्या घरातून आश्रमात रेल्वेने जात असत. रेल्वे एका स्टेशनजवळ पोचताना त्यांना फार बेचैनी वाटायची. त्या स्टेशनवर गाडी थांबली की त्यांना फारच त्रास व्हायचा. गाडी परत स्टेशनपासून दूर पोचली की परत त्यांची मनःस्थिती सामान्य व्हायची.
एक दिवस त्यांनी म्हणे आपल्या गुरूला याबद्दल विचारलं. गुरू म्हणाले की उपाय अगदी सोपा आहे. ज्या स्टेशनवर तुला त्रास होतो तिथे उतर आणि कंपनांच्या शोधात जा. तिथेच तुझ्या प्रश्‍नांचे उत्तर तुला मिळेल. अन् बेझंटनी दुसर्‍या दिवशी त्याप्रमाणे केले. त्या गाडीतून खाली उतरला. कंपनांच्या दिशेने जाऊ लागल्या. हळूहळू कंपनं वाढू लागली. शेवटी जिथे त्यांना अत्यंत त्रास व्हायला लागला तिथे त्या थांबल्या. समोरचे दृश्य बघून त्या हादरल्या. तो होता कत्तलखाना. तिथे मारलेल्या जनावरांचे मांस, गायी, बकर्‍या टांगलेले होते. तसेच काही जनावरांची कत्तल चालली होती. तिथे फार दुर्गंधी होतीच. पण हे वातावरण आध्यात्मिक व्यक्तीला पोषक नव्हतं. महाभयंकर त्रासदायक होतं.
ऍनी बेझंट अत्यंत दुःखी अंतःकरणाने त्या जागेवरून परतल्या. त्यांच्या हृदयात त्या जनावरांबद्दल कळवळा होता. डोळ्यात अश्रू होते. त्यांनी गुरूंना त्याबद्दल सांगितले.
आमच्यातील प्रत्येक सामान्य व्यक्तीला येईल फक्त दुर्गंधी. शाकाहारी माणसाला थोडा त्रास होईल. पण मांसाहार करणार्‍याला? काहीही परिणाम होणार नाही कारण तो तर नियमित तिथे मांस खरेदी करायला जातो.
अशा या कंपनांचा विषय सूक्ष्म आहे. पण तो वैयक्तिक नाही. त्याला प्रमाण नाही. त्याची सत्यासत्यता पटवण्यासाठी सध्यातरी माझ्या माहितीप्रमाणे यंत्रे नाहीत.
विश्‍वात सगळीकडे भूकंप, त्सुनामी वाढतच आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहताना विविध कारणे आहेत. यात मुख्य कारणे मानवनिर्मित आहेत- अणुस्फोट, भूगर्भातील तेल काढणे, मोठमोठी धरणे बांधणे…वगैरे. पण एका संतांनी एक वेगळेच कारण दिले होते.
त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मानवाची क्रूरता याला जबाबदार आहे. मानव जनावरांची कत्तल करतो आणि तीदेखील अत्यंत निर्घृणपणे. त्यामुळेच धरणीमाता कंपन पावते. म्हणून भूकंप होतात. जसे आईसमोर तिच्या लहान मुलाला मारले तर तिची काय अवस्था होईल? ती थरथरायला लागेल.
एका आध्यात्मिक पैलूत प्रगती केलेल्या साधूची ही प्रतिक्रिया होती. बरोबर की चूक! सृष्टिकर्ता भगवंतच जाणे. कदाचित प्रगत विज्ञान या विषयावर संशोधन करून काही यंत्रे भविष्यात तयार करेलही.
या सर्व गोष्टींचा सखोल विचार केला तर एक गोष्ट लक्षात येईल की मानवाचे मूळ स्वरूप आध्यात्मिक असल्यामुळे त्याचे हृदय करुणामय आहे. पण त्यावर अज्ञानाचा व स्वार्थाचा जाड पडदा असल्यामुळे त्याला आत्मज्ञान होत नाही.
माझ्या आयुष्यातील वैद्यकीय पेशात घडलेल्या काही घटना अशाच बोधप्रद आहेत. गोव्यात बहुतेकजण मांसाहारी आहेत. मासळी, कोंबडी, अंडी, मटन… पुष्कळ लोक खातात. तसेच थोडेजण गाय, डुक्कर यांचे मांस खातात.
* माझ्या मित्राच्या मुलीची ही पहिली गोष्ट. ते मांसाहारी आहेत. एक दिवस छोटीचा पाचवा वाढदिवस होता. सर्वांना सोयीस्कर म्हणून रविवारी ठेवला होता. वाढदिवसाला ‘‘चिकनचा’’ बेत असतोच. घरी मुलगी कटकट करते म्हणून आई म्हणाली, ‘डॅडींबरोबर बाजारात जा आणि चिकन घेऊन ये.’
दोघे बाजारात आले. दुकानदाराने सांगितले ‘पाच मिनिटे थांबा. मी लगेच चिकन देतो.’ त्याने पिंजर्‍यातील पक्षी काढले. सहज त्याने मान मुरगाळली. मोठ्या सुर्‍याने चामडी कापली व ती ओढून काढली. चिकन तयार!
कोंबड्या तिकडे ओरडतात आणि ती लहान मुलगी स्तब्ध होऊन बघते. डॅडी कुणाशीतरी बोलण्यात गुंग. मुलगी रडत म्हणते, ‘डॅडी बघा ना, तो कोंबडीला कसा मारतो. आणि ती रडायला लागली. अगदी ओक्साबोक्सी!
डॅडी म्हणाले, ‘अगं असे काय करतेस तू? तुझ्या वाढदिवसाला चिकन हवे ना? तुला चिकन आवडते ना?’ छोटी म्हणते, ‘पण हे काय करतो तो? असे चिकन करतात तर मला नकोच’. तिने वडिलांचा हात पकडला व म्हणाली, ‘चला, मम्मीकडे जाऊया.’
वरात परत घरी. आईने विचारले, ‘चिकन आणले नाही?’
वडील, ‘विचारा तुमच्या छोकरीला…’
छोटी छोकरी रडतच झोपी गेली. तिने तयार चिकन प्लेटमध्ये बघितले होते. मिटक्या मारून खाल्ले होते. तिला बिचारीला काय माहीत? तेव्हापासून ती शाकाहारी झाली.
* माझ्या ओळखीच्या दुसर्‍या कुटुंबातला एक आठ-दहा वर्षांचा मुलगा लहान बकर्‍याला ओढून मारताना बघून हादरला. वडिलांबरोबर बाजारात गेलेला हा मुलगा तर पळायलाच लागला. तो पुढे – वडील पाठीमागे. तो रस्त्यापर्यंत पोचला. शेवटी कुणीतरी मुलाला पकडले. लोकांना वाटले.. तो चोर म्हणून चोपणारच होते. तेव्हा वडलांनी मध्ये पडून खरी घटना सांगितली म्हणून तो सुटला. नाहीतर त्याचा खिमा झाला असता. तोसुद्धा शाकाहारी बनला.
ज्यावेळी अशा अनेक घटना वाचतो, बघतो त्यावेळी मी चिंतन करतो. विचार येतो की असा विचार करणारे थोडेच लोक का? त्यावेळी अनेक उत्तरे येतात- ते प्रेषित आहेत. त्यांची आध्यात्मिक प्रगती मागच्या जन्मात झालेली किंवा या जन्मात होत आहे. ते अतिसंवेदनशील आहेत…
काही लोक विचारतात- योगशास्त्र मांसाहाराविरुद्ध आहे का? – मी म्हणतो, ‘मी योगाचा विद्यार्थी आहे. तज्ज्ञ नाही. मला माहिती आहे त्याप्रमाणे भारतीय संस्कृतीमध्ये कुठलाही आग्रह ठेवलेला नाही. प्रत्येकाने आपल्या सद्सद्विवेक बुद्धीने विचार करून आपण कसे वागावे याबद्दल निर्णय घ्यायचा असतो.
पण एक गोष्ट खरी. स्वाध्याय नियमित करता करता थोडे थोडे आत्मज्ञान येते. व्यक्ती आपल्या मूळ आत्मस्वरूपाकडे वळते. त्याप्रमाणे वृत्ती व कृती बदलते.
आपणही योगसाधना करता म्हणजे स्वाध्याय करताच की! आपणास काय वाटते?