योगमार्ग – राजयोग

0
141

भारतीय तत्त्वज्ञान फार उच्च प्रतीचे आहे. तत्त्वज्ञानावर आधारित विविध कर्मकांडात्मक क्रिया व तंत्रे याच्यावर मुबलक साहित्य आहे. दुर्भाग्याने भारतावर निरनिराळ्या लोकांनी अनेक आक्रमणे केलीत. त्यातील काही जेत्यांनी तर आपले अनेक ग्रंथ, जे अत्यंत मौलिक होते, जाळून टाकले. त्याशिवाय आपणही आपल्या आळशीपणामुळे व अज्ञानामुळे अशा मौल्यवान ग्रंथांची हवी तशी काळजी घेतली नाही. आतासुद्धा आम्ही फार शहाणे झालो आहोत असे नाही, पण थोडी जाणीव झाली आहे. आशा करुया की गती वाढून साहित्याला व तत्त्वज्ञानाला चांगले दिवस येतील!
काही जाणकार व्यक्ती सांगतात की आपले अनेक चांगले ग्रंथ जर्मनीत आहेत व हे ग्रंथ त्यांनी जपून ठेवले आहेत. जर्मनीला भेट देणार्‍या एका व्यक्तीने मला सांगितले, की ज्या कागदावर हे साहित्य हजारो वर्षांपूर्वी लिहिले तो कागद फार जुना आहे. त्याला एका विशिष्ट तापमानाची गरज असते. त्याचा ते लोक सखोल अभ्यास करतात व विविध छोट्या छोट्या कंपार्टमेंटमध्ये गरजेचे तापमान ठेवतात. त्यामुळे ग्रंथ जास्त काळ टिकतात.
आपल्याकडे विचार न केलेलाच बरा. अनेक मोठमोठ्या ग्रंथालयांमध्ये पुस्तकं अशीच धूळ खात पडलेली असतात. बहुतेक ठिकाणी अशा पुस्तकांची काळजी घेतलेली दिसत नाही. कुठे कुठे तर पावसात भिजतात किंवा कडक उन्हामुळे खराब होतात. देवी सरस्वतीचा हा आदर आहे का??
अगदी शेवटी आमच्या देशावर इंग्रजांनी राज्य केले. त्यांनी तर आम्हाला शिकवण्यासाठी मॅकोलेंना भारतात आणले. जो भारत देश सर्व विश्‍वाला प्रत्येक क्षेत्रात मार्गदर्शक होता. ज्या देशात नालंदासारखी प्रख्यात विद्यापीठे होती त्या देशाची भाषा, शिक्षणपद्धती इंग्लंडसारखा एक छोटासा देश ठरवायला पुढे आला. अशा देशांला आपल्या भारतासारखी दीर्घ काळाची संस्कृतीसुद्धा नाही. आपल्या एवढे प्रत्येक क्षेत्रातले तत्त्वज्ञानही त्यांच्याकडे नाही.
त्याला अनेक लोकांनी विरोध केला पण स्वार्थी, संधिसाधु व्यक्तींनी इंग्रजांना पाठिंबा दिला, आपली देवभाषा संस्कृत, राष्ट्रभाषा हिंदी व विविध भारतीय भाषांची जागा इंग्रजीने घेतली. इंग्रज परत जाऊन ६०-७० वर्षे झालीत, आपली गुलामगिरी चालूच राहिली. उलट हल्ली जास्तच वाढली. देश – संस्कृती याचा अभिमानच उरला नाही.
मेकॉलेचे स्पष्ट मत होते की भारतात वेगवेगळ्या भाषा जरी असल्या तरी त्यांची संस्कृती एक आहे, जरी धर्म वेगवेगळे असले तरी ते एकोप्याने राहतात. त्यांच्यावर राज्य करण्यासाठी त्यांची संस्कृती नष्ट करायली हवी. त्याप्रमाणे इंग्रजांनी केलेदेखील. आतासुद्धा सर्वनाश चालूच आहे. अपवाद आहेत पण आज सर्वांना कितीतरी पट जास्त कार्य करायला हवे.
इस्राएलसारख्या देशाकडून आम्ही धडा घ्यायला हवा. आपल्याबरोबरच १९४७ मध्ये या देशाचा जन्म झाला. छोटासा देश. सर्व बाजूंनी अरब राष्ट्रे त्यांच्यावर आक्रमणे करतच असतात. लहान-मोठ्या लढाया चालूच असतात. पण या ज्यू लोकांनी आपली संस्कृती सांभाळली. त्यांची भाषा हिब्रू आहे. आपण संस्कृतला जशी देवभाषा मानतो तशीच ज्यू लोकांची हिब्रू भाषा आहे. आज तिथे शंभर टक्के लोक हिब्रू शिकतात, बोलतात. त्यांचे सर्व व्यवहार त्याच भाषेत चालतात.
इस्राएलमध्ये म्हणजे पाऊस वर्षातून एक-दोन इंचच पडतो. पण ते पावसाचे पाणी लोक सांभाळून ठेवतात. त्यांची शेती-बागायत थिंबक सिंचनावर चालते. म्हणजे प्रत्येक झाडाच्या मुळात आवश्यक तेवढे पाणी घालायचे. नैसर्गिक साधनांचा ते व्यवस्थित वापर करतात. प्रत्येक घरात सूर्य ऊर्जा, सोलर एनर्जी वापरली जाते. असेही ऐकले आहे की इस्राएल भाजी व फळे इतर देशात निर्यात करतात. हे असे आशादायक व सुखदायक चित्र पहायला मिळते. याचे एक प्रमुख कारण म्हणजे ज्यू नागरिकांचे देशप्रेम व संस्कृती प्रेम.
आणि आमच्याकडे पाऊस मुबलक प्रमाणात पडूनही आपले पाणी समुद्रात वाया जाते. दर वर्षी अनेक ठिकाणी पाण्याची टंचाईच असते. दुष्काळ असतो. इथे गोव्यात तर आम्हाला शेती करण्याचा आळस व तिरस्कार, त्यामुले आम्ही शेजारच्या राज्यांतून भाजी व फळे आणतो. तरुण पिढी अपेक्षित प्रमाणात शेतीकडे वळताना दिसत नाही.
काही राजकारणी व तथाकथित विद्वान तर आपल्या तत्त्वज्ञानाचा आधार घेऊन समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. त्यातील एक विषय म्हणजे वर्णाचा! ते सांगतात की चातुर्वर्ण्य स्वतः भगवान श्रीकृष्णाने निर्माण केलेत. गीतेत श्‍लोकातही ते सांगतात…..
* चातुर्वर्ण्यं मया सृष्टं….
– मी चातुर्वर्ण निर्माण केलेत. पण हे धूर्त लोक अर्धसत्यच सांगतात. त्यांना भगवान कृष्णाबरोबर हवा निर्माण करायची आहे. श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम अवतार आहे. निरनिराळ्या क्षेत्रात त्याचे मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त आहे. हीच गोष्ट बाकीच्यांना नको आहे. आपली कृष्णाबद्दलची श्रद्धा ते कमी करण्याचा प्रयत्न पडतात.
आमच्यातील अनेक सामान्य लोक स्वतः गीतेचा अभ्यास करत नाहीत. तो अभ्यास केला तरच आम्हाला पूर्णसत्य कळेल. संपूर्ण श्‍लोक…..
चातुर्वर्ण्य मया सृष्टं गुणकर्म विभागशः
तस्य कर्तारमपि मां विद्धयाकर्तारमव्ययम् (गीता ४.११)
ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र या चार वर्णांचा समूह – गुण आणि कर्म यांच्यानुसार मी विभागलेला आहे. अशा रीतीने त्या सृष्टीरचना इत्यादी कर्मांचा मी कर्ता असूनही मला अविनासी परमात्म्याला तू वास्तविक अकर्ताच समज.
पहिल्या ओवीचा अभ्यास करता असे लक्षात येईल की वर्ण हा जन्मानुसार न ठरता गुण व कर्माप्रमाणे ठरतो. आपल्या अज्ञानामुळे व विपरीत ज्ञानामुळे आपण वर्ण जन्माप्रमाणे ठरवतो. आपण विचार करायला हवा की भगवंताला अशी वर्णव्यवस्था अपेक्षित आहे काय?
त्याशिवाय गीतेत त्यापुढील अध्यायात प्रत्येक वर्णाची व्याख्या, गुण व कर्म सांगितले आहे. कुठल्याही ठिकाणी घरी, कार्यालयात, समाजात कामाची वाटणी कर्तृत्वशक्ती व ज्ञानाप्रमाणे केली जाते. तशीच ही वर्णव्यवस्था होती. आज आपण बघतो तो वर्णभेद – कोण मोठा तर कोण लहान. वैदिकांना व भगवंताना हा भेद अपेक्षित नव्हता. पण स्वार्थी वृत्तीचे लोक अशी कृती करतात. कारण त्यामुळे त्यांना त्यांचा स्वार्थ साधता येतो. पण त्यामुळे समाजाचा व देशाचा नाश होतो याची खंत त्यांना नसते.
सारांश एवढाच की कुठलेही शास्त्र त्यातले तत्त्वज्ञान समजून अंमलात आणले तरच त्याचा फायदा होईल, नपेक्षा भयंकर नुकसान होईल.
मला धास्ती वाटते ती हीचकी जर योगशास्त्राचा व्यवस्थित अभ्यास केला गेला नाही तर योगाची स्थितीही तशीच होईल. योग हा एक शारीरिक व्यायाम ठरेल. आज अमेरिकेमध्ये ‘पॉवर योगा’ म्हणून योग शिकवला जातो. आमच्याकडेदेखील तसेच काहीसे चाललेले आहे. योगसाधक तरी विचार करतील का?