योगमार्ग – राजयोग

0
212

– डॉ. सीताकांत घाणेकर

(योगसाधना – २७५)
(स्वाध्याय – २३ )
दर दिवशी, प्रत्येक क्षणी आपण ज्या बातम्या वाचतो किंवा ऐकतो त्यांत वाईट बातम्यांचा भरणाच जास्त असतो. अपघात, लाचलुचपत, काळा पैसा, मारामार्‍या, खून, लढाया, आतंकवाद, बलात्कार, नैसर्गिक आपत्त्या…. वगैरे वाचून प्रत्येक जण बेचैन होतो. अशा विविध विषयांवर तज्ज्ञ व्यक्ती, विद्वान लेख लिहितात, चर्चा करतात, कायदे आणतात पण प्रत्यक्षात त्यांचा फारसा उपयोग झालेला आहे, असे दिसत नाही. आता माझी भूमिका अगदीच नकारात्मक नाही. अनेक सकारात्मक गोष्टी, घटना अवश्य घडतात. उलट मी तर असे म्हणेन की या सर्वांवर विचार केला जातो. म्हणून कदाचित या वाईट घटना कमी घडत असतील. नाहीतर त्यांचे प्रमाण आणखी पुष्कळ व भयानक राहिले असते. मुख्य म्हणजे असे का होते यावर विचार हवा. याला जबाबदार कोण? हे बघायला हवे. त्याची कारणे अनेक असतील पण त्यापैकी एक कारण म्हणजे-
* या सर्व विचारांची, कायद्याची व्यवस्थित सर्वतोपरी अंमलबजावणी होत नाही. याची अनेक उदाहरणे देता येतील. उदा. म्हणजे वाहन चालकांसाठी बनवलेले कायदे – सीटबेल्ट लावणे, गाडी चालवताना मोबाईलवर बोलू नये, वाहनाचा वेग, पार्किंग, पुढच्या वाहनाला ओलांडून गतीने व कायदा मोडून जाणे… इत्यादी.
दुःखाची गोष्ट म्हणजे असे कायदे मोडणारे तथाकथित सुशिक्षितच जास्त असतात. काही जणांच्या अंगात आपल्या श्रीमंतीचा, शक्तीचा, सत्तेचा मद असतो. शेवटी बळी जातो तो दुसर्‍या व्यक्तीचा. कधी कधी त्याला व त्याच्या वाहनातील व्यक्तीलाही अपघात होतो.
अशा सर्व घटनांचे मूळ कारण म्हणजे आज अनेकजण आत्मकेंद्री झालेले आहेत. दुसर्‍याचा ते थोडादेखील विचार करीत नाहीत. त्यांच्या लक्षातच येत नाही की आज जे त्यांच्यामुळे दुसर्‍यांचे वाईट घडते तसेच उद्या इतरांमुळे त्यांचेही वाईट घडू शकेल.
* दुसरे एक कारण म्हणजे बेकायदेशीरपणे वागणार्‍यांना शिक्षेचा अभाव किंवा अल्प शिक्षा किंवा गुन्ह्याच्या सिद्ध होण्यासाठी लागणारा दीर्घ कालावधी. परदेशात म्हणे अनेक गुन्ह्यांचा निकाल लवकर लागतो. तसेच तिकडे शिक्षाही जास्त कडक आहे. याचे एक कारण म्हणजे एक कारण म्हणजे बहुतेक देशांमध्ये रस्त्यांवर, सामाजिक ठिकाणी, दुकानांमध्ये बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे होत.
माझ्या एका मित्राने सांगितलेली एक घटना बोलकी आहे. अनेक वर्षांपूर्वी तो अमेरिकेत विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये राहून शिकत होता. एका रात्री तो व त्याचा मित्र गाडीतून बाहेर हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेले. त्यांनी जेवणाचे पार्सल गाडीतच आणले व तिथे जेवण घेतले. जेवणाच्या प्लेट्‌स्, चमचे बाहेर टाकायचे असतात. पण त्यासाठी थोडे दूर चालून जायला हवे होते. कारण कचरापेटी जरा दूर होती. म्हणून त्याने स्वतःच त्या वस्तू आपल्या बॅगमध्ये ठेवल्या- हॉस्टेलमधील पेटीत टाकण्यासाठी. पण त्याच्या मित्राने आपल्या टाकाऊ वस्तू सरळ रस्त्याच्या बाजूला फेकून दिल्या. माझ्या मित्राने जेव्हा त्याला त्याबद्दल विचारले तेव्हा तो सहजपणे म्हणाला, ‘‘आता रात्री कोण बघतो इथे?’’ आणि मग ते हॉस्टेलवर आले.
दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांच्या खोलीवर पोलीस आले व त्यांना विचारले की आपण आपल्या गाडीतून टाकाऊ वस्तू रस्त्यावर फेकल्या होत्या का? ते काही बोलायच्या आतच त्यांनी एक फोटो दाखवला. हा फोटो एका अमेरिकन बाईने आपल्या कॅमेर्‍यावरून घेतला होता. आता काही खोटे बोलता येईना. पोलिसांनी त्यांना सांगितले की तुम्हाला दोनशे डॉलर्स दंड भरावा लागेल.
तो मुलगा म्हणाला, ‘आम्ही विद्यापीठातले विद्यार्थी आहोत. माझ्याकडे दोनशे डॉलर्स नाहीत.’ पोलीस म्हणाले, ‘काही हरकत नाही. तुम्ही काही तास सामाजिक काम करा आणि दोनशे डॉलर कमवा. हे सामाजिक काम आम्ही तुम्हाला सांगू- उदा. झाडू मारायचा, टॉयलेट साफ करायचे वगैरे…’
ही गोष्ट ऐकल्यावर तो मुलगा म्हणाला, ‘सामाजिक काम नको, मी दंड भरेन’. आणि त्याने तो भरला.
सारांश काय तर आज कुणीतरी गुन्हा करताना पकडणारा व दंड घालणारा किंवा शिक्षा करणारा वागतो. तो स्वयंशासित नाही.
* तिसरे एक कारण म्हणजे आमच्यासारखे तथाकथित शिक्षित लोक अशा विविध विषयांवर कार्य करत नाहीत. यासाठी थोडा तरी वेळ काढून समाजाला सद्विचार देण्याचे कार्य प्रत्येक व्यक्तीने करायला हवे.
यासाठीच नियमित स्वाध्याय करणे आवश्यक आहे. नाहीतर प्रत्येक व्यक्ती भौतिक विषयात व इंद्रियसुखातच रमून राहील. धनाच्याच मागे धावेल. म्हणूनच धनसंपत्तीमुळे काय मिळेल व मिळणार नाही व स्वाध्याय केल्यामुळे काय मिळेल याची स्पष्ट कल्पना प्रत्येक माणसाला सुखशांतीसाठी अत्यावश्यक आहे आणि हाच विषय आपण बघत आहोत.
* पैशाने बाह्य भपका मिळेल पण सुंदरता मिळणार नाही. – आपल्यापैकी बहुतेक जण ज्यावेळी सुंदरतेवर विचार करतो किंवा बोलतो त्यावेळी ती सुंदरता बाह्य म्हणजे शरीराची असते. आंतरिक म्हणजे मनाची, बुद्धीची, आत्म्याची नसते. बाह्य सुंदरता असली तर चांगलेच पण त्याबरोबर इतर सौंदर्य नसेल तर मानवी जीवन व्यर्थ आहे. असा माणूस समाजावर ओझं बनतो.
इतिहास सांगतो की रावण दिसायला फार सुंदर होता. वेदशास्त्रपारंगत व शिवभक्त होता. पण त्याच्याकडे भावनिक सुंदरता नव्हती. एवढा तथाकथित धार्मिक असूनही त्याच्यातील आध्यात्मिक पैलू विकसित झाले नव्हते. म्हणून एवढा विद्वान, भक्त व लंकेचा राजा असूनसुद्धा राक्षस ठरला. इतिहासकार साक्षी आहेत. ते सांगतात की रावणाची लंका सोन्याची होती ही गोष्ट प्रतीकात्मक आहे हे समजायला हवे. याचा अर्थ असा की तिथे भौतिक समृद्धी होती. आज देखील विश्‍वांत काही तथाकथित सुधारीत देश असे आहेत. त्यातले काही राजकारणी स्वार्थी असतात. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी कोणत्याही स्तराला जातात. याचे एक अत्यंत दुःखदायक उदाहरण म्हणजे – अमेरिका – जिने दुसर्‍या जागतिक युद्धामध्ये भयानक असा ऍटमबॉंब जपानमधील नागासाकी व हिरोशिमा या शहरांवर टाकून भयंकर क्रूर असा विध्वंस केला. हे कृत्यच महाभयंकर आसुरी वृत्तीचे होते. बिचारे जपानी लोक…त्यावेळी असंख्य माणसे मृत्युमुखी पडली आणि आजसुद्धा कर्करोगासारख्या रोगाने पीडित आहेत. भौतिक संपत्तीने एवढा प्रगत देश आजही विविध रोगांनी पछाडलेला आहे. पण एक चांगली गोष्ट म्हणजे त्यांनादेखील योगसाधना व अध्यात्म या विषयांचे महत्त्व पटले आहे. तिकडे अनेक व्यक्ती याचा अभ्यास करतात.
बाह्य सुंदरतेचा विचार करताना आणखी एक व्यक्तिमत्त्व लक्षात येते ते ऋषी अष्टवक्राचे. ही व्यक्ती म्हणे आठ ठिकाणी वाकडी होती पण विद्वत्ता फार होती. जनकाच्या दरबारात ते गेले असताना दरबारातील विद्वान त्यांना बघून हसले. लगेच तेही हसायला लागले. ते का हसतात याबद्दल विचारले असता ते सहज म्हणाले, ‘मला आश्‍चर्य वाटते की महाराज जनकासारख्या विद्वान राज्यकर्त्याच्या दरबारात फक्त ‘चांभार’ भरलेले आहेत, जे फक्त बाह्य सुंदरता बघतात. (कारण चांभार जनावराची कातडीच बघतो.)
पाश्‍चात्त्य तत्त्ववेत्ता- सॉक्रेटीससुद्धा अगदी कुरूप होता पण फार हुशार होता. जनतेबद्दल त्याला प्रेम, कळकळ होती. म्हणजे त्याला भावनिक व बौद्धिक सुंदरता होती. त्या वेळच्या राज्यकर्त्यांनी त्याच्यावर खोटे आरोप करून त्याला विष (हॅम्लॉक) देऊन मारून टाकले. पण त्यांच्या विचारांची सुंदरता आजदेखील जगाला प्रकाशित करते.
आपल्यातील प्रत्येकाने ज्याला जीवनविकास करायचा आहे त्याने विचार केला पाहिजे की मला फक्त भौतिक सुंदरता हवी की इतर सूक्ष्म सुंदरता हव्या! या सर्व स्वाध्याय केल्याने मिळतात. म्हणून नियमित ‘स्वाध्याय’ आवश्यक आहे.