योगमार्ग – राजयोग

0
244

— डॉ. सीताकांत घाणेकर

(योगसाधना – २७४)
(स्वाध्याय – २२ )
विश्‍वाकडे चौफेर नजर फिरवताना सहज लक्षात येते की बहुतेकजण भौतिकतेकडेच जास्त वळतात. धन-संपत्ती, पैसा हेच या लोकांचे ध्येय असते. कारण त्यांना वाटते की धन जवळ असले की माणसांना सर्वकाही मिळते. पण या सर्व वस्तू, गोष्टी फक्त भौतिकच असतात. त्यामुळे मानवाला खरी सुखशांती मिळेलच याची खात्री नाही. या सर्व गोष्टी आवश्यक आहेतच पण त्या मिळवण्याची साधनेदेखील बघायला हवीत. इतरांना फसवून, लुटून, मारून, लाच घेऊन जमवलेले धन चिरकाल सुख, मनःशांती देत नाही. प्रारब्धानुसार व निसर्गनियमांमुळे थोडा वेळ यश मिळेल, बाह्यसुख म्हणजे इंद्रियसुख मिळेल पण या गोष्टी दीर्घकाळ टिकत नाहीत. उलट क्षणिक यशामुळे अनेक जण शेफारून जातात. त्यांना वाटते- ‘लाथ मारीन तिथे पाणी काढीन’. त्यामुळे त्यांचा अहंकार, मद-मस्ती वाढतच जातात. शेवटी ते स्वतःचा नाश करून घेतातच पण इतरांचादेखील ओढवून घेतात. विश्‍वाचे, संस्कृतीचे अतोनात नुकसान करून जातात.इतिहासाचा अभ्यास केला तर अशी अनेक उदाहरणे दृष्टीस पडतात- त्यात रावणासारखे वेदशास्त्रपारंगत, शिवभक्त, तथाकथित ज्ञानी आहेत. तसेच धृतराष्ट्र, दुर्योधन, शकुनी, जरासंध यांच्यासारखे दुष्ट, स्वार्थी, मग्रूर, मदांध राज्यकर्ते आहेत. आजही सर्व जगाच्या इतिहासात अशा अनेक व्यक्ती दिसतात. त्यांचा स्वतःचा जीवनविकास तर होत नाहीच, पण त्यांच्यामुळे इतरांचाही विकास होत नाही.
या सर्व समस्यांवर अनेक उपायांबरोबरच एक अति उत्तम उपाय म्हणजे ‘स्वाध्याय’ व तोही शास्त्रशुद्ध, ऋषीप्रणित पद्धतीनुसार!
विविध महापुरुष या विषयाचे मार्गदर्शन करतात. त्यातील एक विश्‍वविख्यात व्यक्ती म्हणजे पू. पांडुरंगशास्त्री आठवले. त्यांनी तर स्वाध्याय या एकाच शब्दावर चिंतन, मार्गदर्शन व कृती करून ‘वैश्‍विक स्वाध्याय परिवार’ तयार केला. समाजातील विविध स्तरांमधून आलेले स्वाध्यायी या परिवारात निःस्वार्थी, निरपेक्ष, निराकांक्ष मनाने तत्त्वज्ञान बुद्धीने समजून नियमित प्रेमाने, भावाने, आत्मीयतेने कार्य करताना दिसतात.
एक पोस्टर या संदर्भात अत्यंत बोलके आहे…
* पैशाने (द्रव्य किंवा धन) काय मिळते अन् काय मिळत नाही?…
१. पैशाने करमणूक मिळेल पण सुखशांती मिळणार नाही.
२. पैशाने पुस्तक मिळेल, पण मेंदू मिळणार नाही.
३. पैशाने पलंग मिळेल, पण झोप मिळणार नाही.
४. पैशाने कटोरी मिळेल, पण साधू वृत्ती मिळणार नाही.
५. पैशाने बाह्य भपका मिळेल, पण सौंदर्य मिळणार नाही.
६. पैशाने अन्न मिळेल, पण भूक(अन्नकामना) मिळणार नाही
७. पैशाने घर मिळेल, पण वास्तू मिळणार नाही.
८. पैशाने ऐष-आराम मिळेल, पण संस्कृती मिळणार नाही.
९. पैशाने औषधे मिळतील, पण आरोग्य मिळणार नाही.
१०. पैशाने मंदिर मिळेल, पण भगवंत मिळणार नाही.
…. पण स्वाध्यायाने…
* स्वतःच्या इच्छेनुसार सर्वकाही मिळेल.*
इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ‘स्वाध्याय’ या शब्दाचा जप करून हे सर्व मिळणार नाही. तर स्वाध्यायाचे तत्त्वज्ञान समजायला हवे. त्यावर आधी चिंतन आवश्यक आहे. तदनंतर त्याप्रमाणे कृती, कर्म जरुरी आहे आणि तेसुद्धा नियमित! ऋषी म्हणतात- ‘स्वाध्यायान्मा प्रमदः|’
आज सर्व विश्‍वात पैशांनी श्रीमंत असे अनेक अब्जाधीश, कोट्यधीश असतील पण त्यांचे जीवन जवळून बघितलं तर त्यांच्याकडे वर सांगितल्याप्रमाणे अनेक गोष्टी नाहीत. त्यांना सुखशांती नाही. वरवर ते सुखी दिसतात, नव्हे ते तसे दाखवतात. पण त्यांना आंतरिक किंवा आत्मिक सुख किंवा शांती मिळत नाही. ते सदोदित भयभीत असतात. आज या सुखसोयी त्यांच्याजवळ आहेत, करमणुकीची साधने मी मिळवू शकतो पण ती दीर्घकाळ किंवा पुढील पिढीपर्यंत टिकेल किंवा नाही याचीच त्यांना चिंता आहे. या सर्व भौतिक वस्तू राजा हिरावून किंवा चोर-डाकू चोरून तर नेणार नाही ना?… सर्वकाही अनिश्‍चित!
भगवंताने दिलेला मेंदू त्याच्याकडे असेल पण तो व्यवस्थित काम करीत असेल याची खात्री नाही. कदाचित आज चांगला कार्यरत असेल पण वृद्धत्वामुळे किंवा काही रोगांमुळे हा मेंदू कसा काम करेल याबाबत विचार करूनच त्याचा ताणतणाव वाढत आहे.
अनेक श्रीमंतांचे पलंग-गादी मऊ-मऊ असतात. त्यांच्या शयनकक्षांमध्ये सर्व सुखसोयी असतात- पंखा, वातानुकूलित यंत्र, पडदे, संगीत साधनं, टीव्ही, फुलं व इतर उत्कृष्ट सजावट… पण… त्यांना शांत झोप येईल याची खात्री नाही. अनेकजण तर झोपेच्या गोळ्या घेऊनच झोपण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतरही त्यांची झोप चांगल्या प्रतीची असेल याची खात्री नाही. विश्‍वातील सर्वांत श्रीमंत मानले गेलेले राष्ट्र म्हणजे – अमेरिका. असे म्हटले जाते की तिथे दर चार व्यक्तींपैकी एक व्यक्ती झोपेच्या गोळ्या घेऊनच झोपते. यात फक्त अमेरिकनच आहेत असे नाही तर इतर राष्ट्रांचेसुद्धा लोक आहेत- अगदी भारतीय सुद्धा!
भारतीय संस्कृतीत शयनगृहाला मंदिराची उपमा दिली आहे म्हणून त्याला शयनमंदिर म्हणतात. पण आजच्या या भौतिक जगात बहुतेकांना या उत्कृष्ट भारतीय संस्कृतीचा प्रामाणिक अभ्यास करावा, असे वाटतच नाही.
ज्यांच्याकडे पैसा आहे त्याला भीक मागण्यासाठी चांगली कटोरी मिळेल पण साधुवृत्ती म्हणजे सज्जनवृत्ती मिळणार नाही. पूर्वी साधू कटोरी घेऊन ‘भिक्षा’ मागत होते. ती ‘भीक’ नव्हती. भिक्षा आणि भीक या दोन शब्दांमध्ये पुष्कळ फरक आहे. त्या भिक्षेमागे विशिष्ट तत्त्वज्ञान, विशिष्ट भाव होता. त्या प्रथेमागे सूक्ष्म उच्च विचार होता. साधू म्हणजे भीक मागणारा भिकारी नव्हता… भिकारी हा काही कामना करणारा, आळशी असतो. साधू समाजाला सद्विचार देण्याचे काम करीत असतात. ते त्याला दिलेले ‘दान’ असायचे, ‘दक्षिणा’ असायचे, म्हणून ते मानधन असे. विद्यार्थिदशेत ते ‘माधुकरी’ मागायला पाच घरी जात असत आणि मिळेल ती आणि तेवढी भिक्षा घेऊन येत असत.
शाळेत असताना आम्हाला या विषयावर एक छान भावपूर्ण कविता होती. अनेक वर्षांनंतर आता फक्त दोन ओळी आठवतात…
* ‘गरीब बिचारा माधुकरी, दुःख तयाला जन्मभरी|
कडक उन्हाने जीव घाबरे, गालावरूनी घाम ओघळे॥
या साधूजवळ कपडेसुद्धा मर्यादित असत. तो लंगोटी नेसलेला असे व त्याच्या खांद्यावर एक पंचा असे.
* ‘ॐ भवती भिंक्षाम् देही’.. असे म्हणत तो दारादारांत फिरत असे. जे काही मिळेल त्यात समाधान मानत असे. कारण तो विद्यार्थी दशेत म्हणजे ‘ब्रह्मचर्याश्रम’ या पहिल्या आश्रमात होता.
पू. पांडुरंगशास्त्री म्हणतात की आजचा विद्यार्थी हा वित्तार्थी, सुखार्थी झालेला आहे. आईवडीलही मुलांना हॉस्टेलमध्ये ठेवताना सर्व सुखसोयी बघूनच ठेवतात- गरम पाणी, चांगला बिछाना, चवदार जेवण, वगैरे वगैरे!
यात काही गैर नाही पण विद्यार्थी दशेत ज्ञानार्जन मुख्य आहे. त्याच्यावर जास्त लक्ष द्यायला हवे. मला तर वाटते त्यामुळेच आजचा विद्यार्थीसुद्धा ‘कटोरी’ घेऊन नोकरीसाठी विविध कंपन्यांमध्ये किंवा राजकारण्यांकडे फिरत असतो. आणि राजकारणी… त्यांचीसुद्धा कटोरी फार मोठी असते… नोकरीच्या मोबदल्यासाठी… यालाच लाच म्हणतात.
भगवे वस्त्र घातलेला प्रत्येक व्यक्ती साधू असत नाही तर तशी वृत्ती असावी लागते- ज्ञान, समाजसेवाभाव, कृतज्ञता, करुणा असे अनेक सात्त्विक गुण असावे लागतात. असे साधू आज आहेत का?