योगमार्ग – राजयोग

0
121

– डॉ. सीताकांत घाणेकर
(योगसाधना – २७३)

(स्वाध्याय – २१ )
स्वाध्याय हा शब्द आपण बर्‍याच वेळा ऐकतो. त्याचा अर्थसुद्धा आम्हाला समजतो- ‘स्व’चा अभ्यास. कधी असे वाटते की स्वतःचा आणखी अभ्यास काय करायचा? ‘मी’ कोण आहे… हे मला माहीत आहे आणि इतरांनादेखील माहीत आहे. पण ही माहिती वरवरची झाली. म्हणजे फक्त या दृश्य शरीराची माहिती झाली.
पू. आठवलेजी सांगतात- ‘‘स्वाध्याय’’ म्हणजे ‘स्व’चा सर्वांगीण विचार, विकास. ‘स्व’च्या अभ्यासात पाच गोष्टी येतात ः शरीर-इंद्रिये-मन-बुद्धी-अहंकार. स्वाध्यायरुपी पाणी जर मानव जीवनाच्या सर्व अंगांना मिळाले तर मानव फुलतो, पुष्ट होतो, दरवळतो. स्वाध्यायी असा दरवळतो.
म्हणूनच या पुरुषाने साठ-सत्तर वर्षे नियमित साधना करून स्वाध्यायाचे विचार सर्व विश्‍वात पोचवले. आपला वैश्‍विक स्वाध्याय परिवार उभा केला. छोट्याशा रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले.
शास्त्रीजी म्हणतात की कुठलेही सत्कार्य सांभाळायला हवे. मायेने जपायला हवे. ही गोष्ट समजायला ते छान उदाहरणे देतात. * रोप लहान असताना त्या रोपाची गुरांपासून राखण करणे फार महत्त्वाचे असते. म्हणून त्याला कुंपण घालावे लागते. तसेच त्याची वाढ चांगली व्हावी म्हणून नियमित खत-पाणी घालावे लागते. अगदी तसेच स्वाध्याय कार्याचे आहे. सुरुवातीला अगदी थोडेच जण असतात. त्यांना फार जपावे लागते. प्रेम द्यावे लागते. आपल्या कार्यामागचे तत्त्वज्ञान, हेतू, भाव समजवावा लागतो. एकदा का त्या कार्याबद्दल आपुलकी निर्माण झाली की ते स्वयंप्रेरणेने कार्य करायला लागतात- निःस्वार्थ, निरपेक्ष, निराकांक्षी बनून…
* कार्याचा विस्तार होऊ लागतो. ते तरुण व्हायला लागते. प्रसार-प्रचार वाढत जातो. जसे तरुणांना त्या वयात सांभाळावे लागते तसे त्या कार्यालाही अत्यंत सांभाळावे लागते. तरुणांना स्वातंत्र्य हवे असते पण जर ‘‘स्वातंत्र्य’’ या शब्दाचा अर्थ कळला नाही तरुणांची वाटचाल स्वैराचाराकडे सुरू होते. म्हणून कार्याला यावेळीदेखील सांभाळावे लागते.
* जसे कार्य पुढे विस्तारत जाऊन त्याचा वटवृक्ष उभा व्हायला लागतो, तेव्हा समाजात अनेक तर्‍हेची वादळे, वावटळी येतात. त्यांपासूनदेखील वृक्षांचे रक्षण करणे आवश्यक असते. याचाच अर्थ सूक्ष्म नजरेने कार्याकडे लक्ष द्यावे लागते.
स्वतःच्या जीवनविकासाची दिशासुद्धा सूक्ष्म नजरेने अभ्यासावी लागते. नियमित स्वाध्याय, साधना, चिंतन करावे लागते. सुरुवातीला स्थूल गोष्टींवर (शरीर, इंद्रिये, इ.) नियंत्रण मिळवून पुढे जाऊन सूक्ष्म गोष्टी (मन, बुद्धी, इ.) व शेवटी आत्म्यापर्यंत वाटचाल करावी लागते. स्वाध्यायात वाटचाल करता करता आत्मनिरीक्षण करून खालील गोष्टी बघाव्या लागतात..
* मी ठरवलेल्या ध्येयाकडे माझी वाटचाल चालू आहे ना?
* माझ्या वासना, विकार नियंत्रणात आहे ना?
* यशामुळे माझा अहंकार वाढला नाही ना (अहंगंड)
* अपयशामुळे मला न्यूनगंड येत नाही ना?
* विश्‍वातील स्वतःचा संसार, समाज, जगसमस्यांमुळे मी खचून जात नाही ना?
* स्वाध्यायाद्वारे येणारी गुणसंपत्ती – कृतज्ञता – अस्मिता – तेजस्विता – भावपूर्णता – समर्पण भावना वाढते आहे ना?
शास्त्रीजींनी अत्यंत कष्टाने असे लाखो स्वाध्यायी बनवले आहेत. हे त्यांचे अनेक दशकांचे मोठे तप आहे. त्यांना मार्गदर्शन करताना ते सांगतात.
* स्वाध्यायाचे फलित म्हणजे स्वयंशासित, प्रभुप्रेमी, आत्मश्रद्धावान, पुरुषार्थप्रिय, शास्त्रविचार स्वीकारणारा कृतज्ञ बुद्धीचा, आत्मौपम्य दृष्टिकोनाचा, तेजस्वी, संस्कृती प्रेमी, भावद्रवित जीवन लाभलेला समाज, तो आम्हा स्वाध्यायींना तयार करायचा आहे.
* जेथे कृतीपेक्षा वृत्तीला, वस्तूपेक्षा विचाराला, भोगापेक्षा भावाला, स्वार्थापेक्षा समर्पणाला, व्यक्तीपेक्षा संघाला, सम्यतेपेक्षा संस्कृतीला, परिणामापेक्षा प्रयत्नाला, शक्तीपेक्षा सत्त्वाला, तर्कापेक्षा तत्त्वाला आणि धनापेक्षा धर्माला प्रतिष्ठा असेल असा समाज आम्हाला बनवायचा आहे.
हे सर्व मुद्दे वाचले की कळायला लागते की प्रत्येक मुद्याला अर्थपूर्ण अशी उत्तम व उच्च विशेषणे आहेत. या सर्व गोष्टी फक्त वाचून किंवा ऐकणे उपयोगाचे नाही तर प्रत्येक स्वाध्यायीच्या आचरणात यायला हव्या. त्यासाठी शास्त्रीजींनी दाखवलेल्या मार्गाने जाऊन त्यांनी बनवलेल्या आचारसंहितेप्रमाणेच स्वाध्याय कार्य करायला हवे. तेव्हाच अपेक्षित परिणाम दिसतील आणि समाज आपल्या ईशप्राप्तीच्या ध्येयापर्यंत पोचेल. अन्यथा समाज आपल्या ईशप्राप्तीच्या ध्येयापर्यंत पोचेल. अन्यथा न समजता फक्त कर्मकांड केले तर प्रगती होणार नाही. उलट विपरीत परिणाम दिसतील.
योगसाधना, स्वाध्याय… ही अनेक शास्त्रे दुधारी शस्त्रांसारखी आहेत. शास्त्रशुद्ध अभ्यास करून त्याप्रमाणे केले तर उत्तम परिणाम दिसतील नाहीतर उलटेच होईल. त्यामुळेच नियमित योगसाधना, स्वाध्याय… अत्यंत आवश्यक आहेत. याचा दृष्टिकोन समजणे महत्त्वाचे आहे.
स्वाध्यायी म्हणूनच म्हणतात- ‘‘संस्कृतीच्या पुनरुत्थानासाठी स्वाध्याय मंत्ररूपी मशाल हातात घेऊन पू. पांडुरंगशास्त्री आठवलेंची.. आमच्या पू. दादांची.. सिंहगर्जना आहे-
‘‘कृण्वन्तो विश्‍वं आर्यम्!’’
– त्याला साथ देण्यासाठी, ती साकार करण्यासाठी त्यांच्या जीवनप्रेरक मार्गदर्शनाखाली, उपासनेच्या भावाने, जीवनविकासाच्या दृष्टीने, प्रभूला ओळखण्याची मनोकामना धरून आम्ही गावोगावच्या मानव समाजाजवळ वेदमान्य विचार सांगण्यासाठी जात असतो. काळाची गरज किंवा माझे कर्तव्य म्हणून नाही तर प्रभुप्रिती, प्रेम व भाव घेऊन त्या समर्थाच्या सृष्टीला कर्तृत्ववान बनून स्पर्श करतो. भक्तीला सामाजिक शक्ती मानतो.
‘‘जग बदलण्याचा, सुधारण्याचा आम्हाला नाद नाही. नियमित स्वाध्यायाने कार्यावर प्रेम ठेवून, एका सूत्राने प्रेमनिष्ठ संघ निर्माण करण्यासाठी सर्वांनी चालावे, आळस टाकून उठावे असे आम्हास वाटते. दृढ निश्‍चयाची तलवार, प्रभुप्रेमाची ढाल आणि आत्मविश्‍वासाच्या शक्तीबरोबर ईशश्रद्धेची मशाल धरून संस्कृतीचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आम्ही कृतनिश्‍चयी आहोत.’’
पू. पांडुरंगशास्त्री युगपुरुष आहेत. त्यांचे विद्वत्तापूर्वक, भावपूर्ण शब्द प्रेरणादायक आहेत पण त्यापेक्षा अधिक म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याच मायेने व उबेने वाढलेले स्वाध्यायी व त्यांचा स्वाध्याय परिवार त्यांचे ज्ञानपूर्ण शब्द वाचून कल्पना येते ती शास्त्रीजींच्या तपाची. म्हणून हे लक्षात ठेवायला हवे-
‘‘स्वाध्यायान्मा प्रमदः|’’- स्वाध्याय करण्यास आळस करू नये.