योगमार्ग – राजयोग

0
121

– डॉ. सीताकांत घाणेकर
(योगसाधना – २७१)

(स्वाध्याय – १९ )

भारतात अनेक शास्त्रे विकसित झाली. त्यात एक प्रमुख शास्त्र म्हणजे योगशास्त्र! योग हे एक शास्त्र आहे याची जाणीव प्रत्येक योगसाधकाला असायला हवी. मुख्य म्हणजे ज्यांना मानवजीवनाचे रहस्य समजून घेऊन या अतिमौल्यवान अशा जीवनाचा विकास साधायचा आहे. म्हणूनच या शास्त्राचा थोडा तरी अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतरच शास्त्रशुद्ध पद्धतीने योगसाधना करायला हवी.
साधक जसजसा प्रगती करतो, त्याच्या लक्षात येते की योग म्हणजे फक्त शारीरिक पैलू नाही. तो त्याचा एक घटक आहे. अन्य घटकांमध्ये मानसिक, भावनिक, बौद्धिक व आध्यात्मिक घटक असून हे पाचही घटक तितक्याच महत्त्वाचे आहे. ही जाणीव झाल्यावरच त्याचा प्रवास सुरू होतो- स्थूलाकडून सूक्ष्माकडे व नंतर सूक्ष्माकडून अतिसूक्ष्माकडे!
स्थूल वस्तू समजणे सोपे पण ‘सूक्ष्म’ ही संकल्पना समजणे थोडे कठीण कारण सूक्ष्म वस्तू दिसत नाही. त्याचा अनुभव घ्यावा लागतो. अतिसूक्ष्म तर अनुभूतीनंतरच समजते. हे अनुभव व ही अनुभूती नियमित योगाभ्यास केल्यानेच मिळू शकते. म्हणूनच अखंड योगसाधना करणे गरजेचे आहे. शास्त्रकार सांगतात…
* परमेश्‍वर ‘सत्‌चित्‌आनंद’ आहे. सत् म्हणजे जो सतत आहे तो. या सत्‌चा आपल्याला आनंद घ्यायचा आहे तर त्यासाठी सूक्ष्मातच जायला हवे. कारण आनंद दाखवता, मोजता येत नाही. जेवढे आपण वस्तूच्या जवळ जातो, जास्तीत जास्त ज्ञानेंद्रियांचा उपयोग करतो तेवढा आपला अनुभव वाढतच जातो.
* उदाहरणार्थ – आपण एखाद्या छान फुलाकडे बघतो. त्याचा रंग, आकार, रचना आपल्याला फार आवडते. म्हणजे आपण फक्त डोळ्यांचा म्हणजे दृष्टीचाच उपयोग करतो. जर त्या फुलाबद्दल जास्त अनुभव घ्यायचा असेल तर त्याच्याजवळ जायला हवे व इतर ज्ञानेंद्रियांचा उपयोग करायला हवा. त्या फुलाला स्पर्श केला तर ते किती मऊ, कोमल आहे ते समजते. तदनंतर त्याचा वास घेतला तर त्याचा सुगंध माहिती होईल. आपले अनुभव एवढेच. कारण आपण स्थूलातच आहोत. प्रत्येक फुलाचे अनुभव वेगळे- रंग, आकार, विस्तार, स्पर्शज्ञान, सुगंध- उदा. जाई, जुई, चाफा, रातराणी…या सर्वांचा अनुभव घेतल्यानंतर प्रत्येकाच्या मनाला, चित्ताला आनंद होतो.
आपण जेव्हा त्या फुलाकडे बघत असतो तेव्हा त्या फुलाच्या मध्यभागातून काही छोट्या मुंग्या किंवा मधमाश्या बाहेर पडताना आपल्याला दिसतात. त्यांना आत काय मिळाले?- तर मधुर, गोड मध! कारण हे प्राणी आपल्यापेक्षा सूक्ष्म आहेत. आपण स्थूल आहोत. आमचे शरीर सूक्ष्म होऊ शकत नाही. पण सत्‌चित्‌आनंद घ्यायचा असेल तर तो आनंद चित्ताने घ्यायचा असतो आणि त्या संदर्भात आम्ही सूक्ष्म बनू शकू व आनंदाचा अनुभव घेऊ शकू!
जीवनात अनेक गोष्टी सूक्ष्म असतात ज्यांचा थेट अनुभव घेणे कठीण असते. उदाहरण म्हणजे…
* हवा – तिचा प्रत्यक्ष अनुभव घेणे शक्य नाही. पण ती आहे याची जाणीव होते. हवेमुळेच तर प्राणिमात्र, जीवसृष्टी जिवंत आहे. त्या हवेच्या तापमानात बदल झालेला आपल्याला कळतो- थंड वा गरम!
* परमेश्‍वर – त्याचा प्रत्यक्ष अनुभव येत नाही पण त्याचा साक्षात्कार झाला की मग परमेश्‍वर काय आहे ते कळते.
जीवनविद्या संस्थेचे प्रेरणास्रोत पू. वामनराव पै या संदर्भात छान सोपे उदाहरण देतात.
* कोळसा पेटलेला आहे हा आपल्याला दिसतो. पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव त्याला हात लावल्यावर, आपला हात भाजल्यावर आपल्याला येतो.
* वाळवंटात मृगजळ असते. तिथे पाणी असल्याचा आपल्याला भास होतो. पण जवळ गेल्यावर प्रत्यक्षात तिथे पाणी नसतेच.
* आकाशात पावसाच्या दिवसात ढगांमध्ये छान असे सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसते. पण प्रत्यक्षात तिथे काहीच नसते.
तसाच परमेश्‍वर एवढा सूक्ष्म आहे की त्याचा साक्षात्कार झाल्यानंतरच तो काय आहे हे समजते. म्हणूनच नियमित शास्त्रशुद्ध योगसाधना करायला हवी.
अष्टांग योगातील नियमांमध्ये स्वाध्याय या पैलूमध्ये ‘समर्पण’ हा एक उच्च कोटीचा सूक्ष्म भाग आहे. महापुरुषांच्या, सत्‌पुरुषांच्या सतत संपर्कात आलो की हे समर्पण कोणत्या पातळीवर अभिप्रेत आहे याचा अनुभव येतो. या महापुरुषांपैकीच एक म्हणजे वैश्‍विक स्वाध्याय परिवाराचे प्रेरणास्रोत पू. पांडुरंगशास्त्री आठवले.
‘समर्पण’ या स्वाध्यायाद्वारे येणार्‍या गुणसंपत्तीबद्दल बोलताना ते श्रीमद्भगवद्गीतेतील नवव्या अध्यायातील २२ व्या श्‍लोकाचा आधार घेतात…
* अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते|
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्‌॥
– जे अनन्यभावाने माझे चिंतन करीत मला भजतात, अशा माझ्याशी नेहमी एकनिष्ठ राहणार्‍या व्यक्तींचा योगक्षेम मी चालवतो.
आजच्या कलियुगात तरून जाण्यासाठी असा अनन्यभाव व चिंतन अत्यंत आवश्यक आहे. इथे भगवंताचे स्वतःचेच वचन व आश्‍वासन आहे…
अशा एक निष्ठ भक्ताचा योगक्षेम मी चालवतो. योगेश्वर श्रीकृष्णाचे हे वचन शास्त्रीजींच्या ‘अयाचक’ व्रताशी निगडित आहे. स्वाध्यायी म्हणतात-
‘‘पू. दादा आणि त्यांच्या रक्तात भिनलेली अयाचक वृत्ती ही स्वाध्यायी प्रवृत्तीची तसेच पू. दादांचे धोरण नाही. त्याचप्रमाणे अयाचकता हे तत्त्व नाही. कारण धोरणात धरसोडीला स्थान आहे तर तत्त्वात कोरडेपणा आहे. तसेच अयाचकता हे स्वीकारलेले व्रतही नाही. तो पू. दादांचा भक्तीचा परिपाक आहे. म्हणून त्यांच्यात एक वेगळाच सुगंध आहे, गोडी आहे. खरे पाहता त्यात पावित्र्य आहे. पू. दादांची प्रभूवरील निष्ठा व दृढतम विश्‍वास पाहायला मिळतात. भगवानच या सर्व कार्याला स्वतःच्या प्रेमळ नजरेने सांभाळीत आहे, अशी त्यांची धारणा आहे. प्रभूशिवाय दुसरा कोणी दाता नाही, असे ते मानतात. पू.दादांच्या अविच्छिन्न ईशश्रद्धेचा येथे पुनरुच्चार आहे.
स्वामीजींच्या अशा व्रताचे रहस्य समजून घेऊन स्वाध्यायी आपले नियमित कार्य करतात. ते पुढे म्हणतात, ‘वैयक्तिक अयाचकतेची तेजस्विता राहू शकते. एखाद्या दात्याच्या नावाशिवाय किंवा पडछायेच्या स्पर्शाशिवाय अनेक संस्था चालवणे दुष्कर आहे. जवळजवळ अशक्यच! वित्तप्राप्तीसाठी आडमार्गाने येथे कोणाला सूचना केली जात नाही किंवा एखादी संधी साधून भार हलका करण्याचा विचारही केला जात नाही. आजच्या असुरक्षित युगात पू. दादांची ‘अयाचकता’ हे जणू विश्‍वातील पंधरावे आश्‍चर्यच वाटते.’
ठाण्यातील तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या उद्घाटनावेळी १९५८ मध्ये डॉ. राधाकृष्णन् आले होते. त्यांनी पू. दादांना विचारले- ‘मागितल्याशिवाय तुमचे काम चालते कसे? माझा अनुभव असे सांगतो की विसाव्या शतकात मोठ्या लोकांजवळ गेल्याशिवाय कार्य चालत नाही. हजार वर्षांच्या इतिहासात असा प्रयोग कोणी केलेला नाही’!
त्यावेळी शास्त्रीजींनी नम्रपणे सांगितले होते, ‘मी दोन दृष्टींनी या कार्याकडे पाहतो- १. माझे काम प्रभूला आवडत नसेल तर ते तो चालवणार नाही. आणि
२. मी प्रभूशी अनन्यचित्त नसेन कर हे काम चालणार नाही.
या घटनेला आज साठ वर्षं झालीत. तरीही पू. पांडुरंगशास्त्रींच्या स्वाध्याय परिवाराचे कार्य उड्या मारीत, नेटाने आणि अविरत पुढे धावते आहे.
(संदर्भ – ‘स्वाध्याय- एक आगळे व्रत’ – एषा पन्था एतत्कर्म)
अशा सकारात्मक घटना वाचल्या, ऐकल्या की नियमित स्वाध्यायाची आवश्यकता पटते. तसेच असे कार्य करण्याची इच्छा होते.