योगमार्ग – राजयोग

0
131

– डॉ. सीताकांत घाणेकर
(योगसाधना – २७०)
(स्वाध्याय – १८)
‘स्वाध्याय’- हा फक्त तीन अक्षरी शब्द नसून त्याचा विस्तार फार मोठा आहे. यामध्ये जीवनाचे अगाध व सखोल तत्त्वज्ञान आहे. म्हणूनच परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले ‘स्वाध्याय एक आगळे व्रत’ असे मानतात. ह्या व्रतामुळे एक आगळी वेगळी गुण-संपत्ती नियमित शास्त्रशुद्ध स्वाध्याय करणार्‍याला प्राप्त होते.
कृतज्ञता, अस्मिता, तेजस्विता आणि भावपूर्णता शास्त्रीजी आपल्या स्वाध्याय परिवाराला समजावतात. ‘‘असे सुगंधी बनलेले जीवनपुष्प प्रभुचरणी समर्पण करण्यातच मानवी जीवनाची धन्यता आहे’’ हेही स्वाध्याय सांगतो.
त्याचा अर्थ वरील चार सद्गुण आत्मसात करून आपल्या जीवनात आचरणात आल्यावर एक पाचवा गुण आपोआप येतो तो म्हणजे- ‘समर्पण’. खरे म्हणजे भारतीय वैदिक तत्त्वज्ञानात हा समर्पणाचा गुण क्षणोक्षणी अनुभवाला येतो. हा देखील मानवी जीवनाच्या विविध क्षेत्रात- कौटुंबिक सामाजिक, राजकीय, धार्मिक, आध्यामिक… कौटुंबिक जीवनाकडे नजर टाकली तर तिथे अनेकजण समर्पण करतात. पण सर्वांत जास्त समर्पण करणारी व्यक्ती जर कुणी असेल तर ती स्त्री. सुरुवातीला ती घराची लेक म्हणून जन्माला येते. त्यावेळी घरातील अनेक कामे करण्यासाठी आपल्या घरातील इतर स्त्रियांना मदत करते. आजच्या युगात त्याचबरोबर ती शिक्षण देखील घेते. अनेकवेळा पुरुषांबरोबरच अनेक क्षेत्रात ती पदार्पण करते. तरुणपणी तिचा विवाह होतो. हे तिचे समर्पण तर अत्यंत कौतुकास्पद आहे. आपले लाडके माहेर सोडून ती आपल्या घरात म्हणजे सासरी जाते, प्रेमाचे लागेबांधे मागे सोडून आपल्या नव्या संसारात ती आनंदाने रमते.
अनेकवेळा ह्या विषयावर बोलताना पांडुरंगशास्त्री भावप्रधान होतात. त्यांच्या डोळ्यात भावाश्रू तरळताना सूक्ष्म नजरेला दिसतात.
सुरुवातीला हा भावपूर्ण मुद्दा माझ्या लक्षातच आला नव्हता. कारण माझा विवाह झाला तेव्हा मी समर्पण केले नाही, ते केले माझ्या पत्नीने. कारण समाज-प्रथाच तशी आहे. स्त्री ही नवर्‍याच्या घरी जाते. पण ज्या दिवशी माझ्या एकुलत्या एक मुलीचे लग्न झाले आणि संध्याकाळी ती आपल्या सासरी जायला निघाली त्यावेळी इतरांबरोबर मलाही अश्रू व हुंदके आवरता आले नाही.
त्यावेळी.. ‘गंगा यमुना डोळ्यात उभ्या का……जा मुली जा दिल्या घरी सुखी राहा’.., हे संगीत चालू होते. यावेळी भावविभोर होऊन अनेक स्त्रिया, आई, आजी ह्या देखील रडतात तेव्हा स्त्रियांचे समर्पण म्हणजे काय ते मला कळले.
जगातील सर्वच स्त्रिया आपल्या नव्या संसारात एवढ्या रमतात की, संसाराशिवाय त्यांना इतर कशातही रस नसतो. जसा वेळ निघून जातो आणि प्रगती होते तसे तिला विविध पात्रे साकारावी लागतात. यामध्ये पत्नी, आई, वहिनी, सासू, आजी पण प्रत्येक ठिकाणी ती आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडताना दिसते.
अनेकवेळा आपण पाहतो की, घरातील स्त्रिया ह्या इतरांसोबत जेवायला बसत नाहीत. त्या घरातील इतर मंडळींना जेवण वाढतात. कोणाला काय पाहिजे काय नको याकडे त्यांचे बारीक लक्ष असते. काही वेळा त्यांना जेवणही मिळत नाही त्या उपाशी झोपतात पण त्यांची याबद्दल कोणाकडेही तक्रार नसते.
गरोदर काळातही त्या अनेक प्रकारचा त्रास सहन करून नऊ महिने बाळाला आपल्या उदरात वाढवतात. अनेक प्रसूतीवेदना सहन करून त्या आपल्या बाळाला जन्म देतात. त्यानंतर त्या आपल्या बाळाला समर्पित भावनेनेच दूध पाजतात. तसेच मुलाचा सांभाळही आत्मीयतेनेच करताना दिसतात. आपलं मूल आजारी पडलं तर त्यांचा जीव कासावीस होतो. अनेकवेळा त्या आपल्या तान्हुल्यासाठी रात्रभर जागून सांभाळ करतात.
शास्त्रीजी म्हणतात की, ह्या सर्व गोष्टी करताना स्त्रिया संसाराशी अगदी समरस होत असतात. आणि मुलाला नाव देण्याची वेळ येते तेव्हा मात्र, आपल्या पतीचे देतात. या सर्व घटनांचा विचार केला तर स्त्रियांचे समर्पण लक्षात येते. त्या खर्‍याच महान कर्मयोगी आहेत असे वाटते. म्हणूनच आपल्या ऋषींनी म्हटले की, ‘यत्र नारीस्तु पूजन्ते तत्र रमते देवता’ जिथे नारीला पूज्य मानले जाते, तिथे देवताही रमतात.
स्वामी विवेकानंदांनीही पाश्‍चात्त्यांना भारतीय तत्त्वज्ञानाचे महत्त्व समजावून सांगताना हेच सांगितले. हा क्रांतिकारक विचार भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया आहे. त्यामुळे सुसंस्कार आवश्यक आहेत. सर्वांना सुसंस्काराची गरज आहे. पण मुलींना ते जास्त असावेत. कारण मुली ह्या दोन घरे सांभाळतात. योग्य संस्कार नसतील तर दोन कुटुंबाचा नाश होईल. ज्यावेळी मुलगी लग्न झाल्यावर सासरी जाते आणि काही काळानंतर भांडणे होतात त्यावेळी त्या मुलीलाच दोष दिला जातो. त्यानंतर माहेरच्या लोकांना बोल दिले जातात. यावेळी माहेरच्या लोकांना दोषी ठरवले जाते. त्यामुळे दोन घरे तुटतात. म्हणून मुलीला संस्कार देणे गरजेचे आहे.
जगाकडे चौफेर नजरेने पाहिले तर समर्पणाचा हा गुण लुप्त होत चालल्याचे दिसत आहे. आपल्या देशातही ॠषीप्रेरित विचारवंतांनी उभी केलेली संस्कृती अगदी मोजक्याच ठिकाणी दृष्टीत पडते. आज स्त्रियांवर होणारे अत्याचार पाहिले तर ही गोष्ट सहज लक्षात येते-
* स्त्रीभ्रृणहत्या- स्त्रीगर्भाचा गर्भपात.
* लहान मुलींचे खून.
* तरुणींवर बलात्कार.
* हुंडाबळी, पत्नीला मारहाण…
या सर्व घटनांचा अभ्यास केला तर अनेक वेळा लक्षात येते की, या अत्याचारांच्या मुळाशी स्त्रियाच असतात. जी स्त्री आपल्या मुलीवर प्रेम करते तीच स्त्री आपल्या सुनेला छळते. तर जी मुलगी आपल्या आईवर प्रेम करते ती, आपल्या सासूवर अन्याय करताना दिसते.
आजच्या भौतिकतेला जास्त महत्त्व देण्याच्या स्पर्धेत आज एक नवाच शब्द उच्चशिक्षित महिलांमध्ये जास्त करून मोठ्या थाटात ऐकायला मिळतो – डीआयएन्‌सी – ‘डबल इन्कम, नो चिल्ड्रन..’
अशा स्त्रिया एवढ्या करिअर प्रेमी असतात की, त्यांना मुलांना जन्म देऊन संसारात अडकणे पसंत नसते. त्यासाठी त्या लग्न करण्याआधीच होणार्‍या पतीला याबाबत कल्पना देतात. जर ही गोष्ट पतीला मान्य असेल तरच त्या लग्नाला तयार होतात. अनेक उच्चशिक्षित स्त्रिया किंवा मोठ्या पगारावर काम करणार्‍या स्त्रिया या अधिकतर हॉटेलमध्ये जेवण करताना दिसतात.
असाच एक उच्च शिक्षित मुलीचा कारनामा ऐकला. एका मुलाचे लग्न ठरत होते. पूर्वीच्या काळी नवरामुलगा प्रश्‍न विचारत होता. मात्र, याठिकाणी त्या मुलीने नवर्‍या मुलाला प्रश्‍न विचारला की, तुझ्या घरी किती ‘डस्ट बिन्स’ आहेत. यावर तो नवरामुलगा आश्‍चर्यचकित झाला. तो म्हणाला की ‘बाहेर अंगणात एक, स्वयंपाक घरात एक ओल्या व एक सुक्या कचर्‍यासाठी अशा दोन – मिळून तीन-चार असतील’. हे उत्तर ऐकल्यावर मुलगी भडकली आणि ओरडलीच – ‘अरे मूर्खा, तुला- एवढ्या शिकलेल्या मुलाला- डस्ट बीनचा गर्भितार्थ माहीत नाही? अरे, डस्टबीन म्हणजे घरात असणार्‍या वयस्कर, म्हातार्‍या व्यक्ती… कचर्‍याच्या पेटीसारख्या!!’
यापुढे आणखी धक्कादायक समस्या म्हणजे-
* आजची मुलगी ही लग्न होतानाच नवर्‍याला अट घालते की, ‘आपले लग्न झाले तर आई-वडील आमच्या सोबत राहणार नाहीत. गरज लागलीच तर माझे आई-वडील आमच्या सोबत राहतील’.
खरेच, असे नियमित घडले तर प्रत्येकजण मुलाऐवजी अशी मुलगीच देवाकडे मागेल.
अशा सर्व गोष्टी वाचल्या, कानावर पडल्या तर मनाला अत्यंत दु:ख होते. मात्र, याचे दु:ख करून काही उपयोग नाही. अशा समस्यांवर चिंतन करून उपाय शोधायला हवा. तरच मानव सुखी होईल. यासाठी प्रत्येकाने सुधारण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे व त्यासाठीच हवा नियमित स्वाध्याय!